टीम इंडिया सिडनीत दाखल

0
246

यूएईतील इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या पर्वाचा धडाका संपल्यानंतर टीम इंडिया बुधवारी थेट दुबईमार्गे ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर रवाना झाली. काल गुरुवात प्रशिक्षक रवी शास्त्री, खेळाडू व सहाय्यक कर्मचारी २० तासांच्या प्रवासानंतर सिडनीत दाखल झाले आहेत.

संघ सिडनीला रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह पीपीई किट आणि मास्क घातलेल्या भारतीय संघाची छायाचित्रे पोस्ट केली होती. त्यानंतर बोर्डाने भारतीय संघ सिडनी विमानतळावर दाखल झाल्याची छायाचित्रेही पोस्ट केली.

आगामी वनडे मालिकेची तयारी सुरू करण्यापूर्वी खेळाडू ऑस्ट्रेलियामधील जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश करतील. त्यानंतर ते सरावास सुरुवात करणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारतीय संघ ३ एकदिवसीय, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोरोना महामारीच्या संक्रमणामुळे मार्च महिन्यात लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अर्धवट रद्द करावी लागल्यानंतर सुमारे ९ महिन्यांच्या कालावधीनंतर टीम इंडिया आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.

२७ नोव्हेंबरला सिडनीतील पहिल्या वनडेने भारताच्या या दौर्‍याला प्रारंभ होणार आहे. टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासमवेत मायदेशी परतणार आहे.