पुकोवस्की, ग्रीन, स्वॅपसन, नेसर, एबॉटला संधी

0
229

>> भारताविरुद्धच्या कसोटींसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

विल पुकोवस्की व कॅमेरून ग्रीन यांच्यासह लेगस्पिनर मिचेल स्वॅपसन व मध्यमगती गोलंदाजी करणारे अष्टपैलू मायकल नेसर व शॉन एबॉट यांचा भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आला आहे. क्वीन्सलँडच्या तीन शेफिल्ड शिल्ड लढतीतींल ५ डावात केवळ ५७ धावा करू शकलेल्या ज्यो बर्न्स याने संघातील जागा राखली आहे.

कोरोनासंबंधीच्या नियमांमुळे ऑस्ट्रेलियाने ‘जंबो’ संघ निवडला आहे. बर्न्स व पुकोवस्की या दोघांची ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघातही निवड करण्यात आली आहे. भारताविरुद्धच्या दोन सराव लढतींतील कामगिरीच्या जोरावर दोघांपैकी एकाची पहिल्या कसोटी संघात डेव्हिड वॉर्नरसह सलामीची जागा पक्की होईल. २२ वर्षीय पुकोवस्की याच्या नावावर सलग दोन द्विशतकांची नोंद आहे. प्रथमश्रेणी कारकिर्दीत प्रथमच डावाची सुुरुवात करत कारकिर्दीतील सर्वोत्तम नाबाद २५५ धावांची खेळी त्याने नुकतीच केली आहे. अष्टपैलू ग्रीन याचा ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघातही समावेश आहे. पाठीच्या दुखण्यातून सावरल्यानंतर त्याने दोन आठवड्यांपूर्वीच पुन्हा गोलदाजीला सुरुवात केली आहे. या मोसमाच्या सुरुवातीलाच त्याने कारकिर्दीतील सर्वाधिक १९७ धावांची खेळी साकारली होती.

लेगस्पिनर स्वॅपसन हा जानेवारी महिन्यात एससीजीवर न्यूझीलंडविरुद्धच्या झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघात होता. शेफिल्ड शिल्डमधील ३ सामन्यांत त्याने २१.१७च्या सरासरीने २३ बळी घेतले आहेत. यात सलग तीनदा डावात पाच बळींचा समावेश आहे. क्वीन्सलँडकडून खेळताना ११ चेंडूंत ३ बळी घेत त्याने दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्यात मोलाचे योगदान दिले होते. प्रमुख फिरकीपटू नॅथन लायन याचा ‘बॅकअप’ म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. फिरकीला अनुकूल एससीजीवर कांगारूंनी दोन फिरकीटूंसह उतरण्याचा निर्णय घेतल्यास त्याला संधी मिळू शकते. नेसर व एबॉट यांना कसोटीचा अनुभव नाही. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स व जेम्स पॅटिन्सन यांचे बॅकअप म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येत आहे. शेफिल्ड शिल्डमध्ये एबॉट भन्नाट फॉर्ममध्ये असून टास्मानियाविरुद्ध त्याने आपले पहिलेवहिले प्रथमश्रेणी शतक झळकावत स्टार्कसह १८९ धावांची भागीदारी रचली होती. शेफिल्ड शिल्डच्या पहिल्या टप्प्यात त्याने १७.९२च्या सरासरीने १४ बळीदेखील घेतले आहेत. नेसर हा मागील दोन वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघाचा भाग असला तरी ‘अंतिम ११’मध्ये त्याला संधी मिळालेली नाही. त्याने यंदाच्या शेफिल्ड शिल्डमध्ये टास्मानियाविरुद्ध शतक झळकावत गोलंदाजीत ३२ धावांत ५ बळी घेतले होते.

ऑस्ट्रेलिया कसोटी संघ ः शॉन एबॉट, ज्यो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मायकल नेसर, टिम पेन, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वॅपसन, मॅथ्यू वेड व डेव्हिड वॉर्नर.
ऑस्ट्रेलिया ‘अ’ ः शॉन एबॉट, ऍश्टन एगार, ज्यो बर्न्स, जॅकसन बर्ड, आलेक्स केरी, हॅरी कॉनवे, कॅमेरून ग्रीन, मार्कुस हॅरिस, ट्रेव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, निक मॅडिन्सन, मिचेल मार्श, मायकल नेसर, टिम पेन, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, मार्क स्टीकेटी, विल सदरलँड व मिचेल स्वॅपसन.