चुरस!

0
242

नीतिशकुमारांच्या जेडीयूपेक्षा स्वतः भारतीय जनता पक्षाने दाखवलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये बहुमताचा आकडा पार करून पुन्हा सत्तेवर येण्याची जोरदार तयारी चालवली आहे, तर तेजस्वी यादव यांच्यासारख्या तरुण नेत्याने दिलेल्या नवसंजीवनीच्या बळावर राष्ट्रीय जनता दल प्रणित महागठबंधननेही तोडीस तोड लढत दिली असल्याचेही निवडणूक निकाल दाखवीत आहेत.
मतदानोत्तर पाहण्यांनी महागठबंधनला दिलेला जनतेचा एकहाती कौल फोल ठरला आहे. ‘मतदानोत्तर पाहण्यांचे निष्कर्ष हे नेहमीच बरोबर येतात असे नाही’ हे आम्ही सोमवारच्या अग्रलेखात बिहारच्या मागील विधानसभा निवडणुकीवेळच्या खोट्या ठरलेल्या पाहण्यांचा हवाला देत बजावले होते. या पाहण्यांनी राजदप्रणित महागठबंधन बिहारमध्ये सुस्पष्ट बहुमतानिशी सत्तेवर येईल असा दावा छातीठोकपणे केला होता, परंतु निवडणूक अशी एकतर्फी झालेली दिसत नाही.
तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी जी कडवी झुंज दिली ती निश्‍चित दखल घेण्याजोगी आहे. आपल्या पक्षाला सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचा जोरदार प्रयत्न तेजस्वी यादव यांनी अखेरपर्यंत चालवला, जे अर्थातच सोपे नव्हते. एखाद्या वादळाप्रमाणे तेजस्वींनी बिहार यावेळी ढवळून काढले आणि रोजगारासारखे मूलभूत मुद्दे ऐरणीवर आणले. त्यांचा हा प्रयत्न कॉंग्रेससारख्या सहयोगी पक्षांच्या निराशाजनक कामगिरीमुळे बहुमतापर्यंत नेण्यास जवळजवळ अयशस्वी ठरताना दिसत असला खरे असले, तरी राजदची ही वैयक्तिक कामगिरी निश्‍चितच लक्षवेधी आणि अनेक प्रादेशिक पक्षांना आत्मविश्वास मिळवून देणारी आहे. भाजपच्या वैयक्तिक कामगिरीचे कौतुक करतानाच, भाजपने जवळजवळ निकालात काढलेल्या राजदचे राजकीय अस्तित्व पुन्हा एकवार दाखवून देण्याचा आटोकाट प्रयत्न तेजस्वी यादव यांनी एकहाती केला आणि भ्रष्टतेचा शिक्का भाळी बसलेल्या आपल्या पित्याच्या पक्षाला त्यांनी या निवडणुकीत जवळजवळ नवसंजीवनीच मिळवून दिली आहे याचे श्रेयही त्यांना दिले गेले पाहिजे.
बिहारमधील बहुतेक मतदारसंघांतील लढती विलक्षण चुरशीच्या झाल्या आहेत. कित्येक मतदारसंघांमधील उमेदवारांचा विजय हा जेमतेम पाचशे – हजार मतांच्या फरकाने झालेला आहे हेही लक्षात घेणे जरूरी आहे. त्यामुळे सामना अखेरपर्यंत अटीतटीचा आहे.
जेडीयूची लोकप्रियता पूर्वीपेक्षा घटली आहे हे मतदानोत्तर पाहण्यांचे म्हणणे बरोबर असले तरी भारतीय जनता पक्ष स्वतःही एक पर्याय म्हणून बिहारमध्ये चमकदार कामगिरी करू शकतो ही शक्यता त्यांनी गृहित धरली नव्हती. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जेडीयूच्या नीतिशकुमार यांचे नाव भाजपने पुढे केलेले असल्याने नीतिश यांच्या घसरलेल्या टक्क्याचा फटका भाजपलाही बसेल असे गृहितक तमाम टीव्ही पंडितांनी मांडले होते, परंतु प्रत्यक्षात भाजपाने स्वतःच्या कामगिरीत कुठे कसूर ठेवलेली दिसली नाही. रालोआला बिहारमध्ये पुन्हा सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचे श्रेय यावेळी नीतिशकुमारांना नाही, तर भाजपला असेल. चिराग पासवान यांच्या शेवटच्या क्षणी बाहेर पडण्याने जी हानी झाली ती जेडीयूची झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही विधानसभा निवडणूक झाली. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवणे भाग पडले. परिणामी मतमोजणीही उशिरापर्यंत रखडली. त्यामुळे हा अग्रलेख लिहीपर्यंत सर्व निकाल काही हाती आलेले नाहीत, परंतु तुल्यबळ लढती सर्वत्र सुरू आहेत. सर्वांत मोठा पक्ष बनण्यासाठी भाजप आणि राजदमध्ये जी कडवी चढाओढ लागली आहे ती तर कमालीची आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा हा निकाल हा खरोखर मूलभूत मुद्द्यांशी निगडित राहिला की जातीपातींच्या पारंपरिक राजकारणानुसार ठिकठिकाणी मतदान झाले हे अधिक सखोलपणे पाहावे लागणार आहे. त्यासाठी सर्व निकाल हाती येईपर्यंत थांबणे भाग आहे.
नीतिशकुमार यांनी बिहारच्या रणधुमाळीमध्ये शेवटी शेवटी आपला आत्मविश्वासच गमावला होता. शेवटच्या प्रचारसभेमध्ये तर ते आपली ही शेवटची निवडणूक असेल असे जाहीर करून मोकळे झाले. त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी तर टीव्हीवर काल दुपारीच आपल्या पक्षाचा पराजय मान्य करून टाकला होता. याउलट कॉंग्रेसने यावेळी मतदानोत्तर पाहण्यांच्या भरवशावर सत्तास्थापनेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्या दोन निरीक्षकांना बिहारमध्ये पाठवून दिले होते. आशा निराशेचा हा खेळ हे या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. मतमोजणी अखेरीस निकालांत पुरेशी स्पष्टता आली नाही, तर निवडणुकोत्तर घडामोडींना महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे चुरस कायम आहे एवढे खरे!