टीम इंडियाचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश

0
154
Indian players celebrate with the trophy after winning the fifth Twenty20 cricket match between New Zealand and India at the Bay Oval in Mount Maunganui on February 2, 2020. (Photo by MICHAEL BRADLEY / AFP)

>> पाचवा टी-ट्वेंटी सामना ७ धावांनी जिंकला

पाचव्या व शेवटच्या टी-ट्वेंटी सामन्यात न्यूझीलंडचा ७ धावांनी पराभव करत टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश संपादन केले. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमधील भारताचा हा सलग आठवा विजय होता. भारताने विजयासाठी दिलेले १६४ धावांचे आव्हान यजमान संघाला पेलवले नाही. त्यांना २० षटकांत ९ बाद १५६ धावांपर्यंतच मजल मारता आली. जसप्रीत बुमराह सामनावीर तर लोकेश राहुल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

आपला शतकी टी-ट्वेंटी सामना खेळणारा अनुभवी रॉस टेलर आणि आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेला यष्टिरक्षक फलंदाज टिम सायफर्ट यांनी अर्धशतके झळकावत न्यूझीलंडच्या विजयासाठी चांगले प्रयत्न केले, मात्र सलग तिसर्‍या लढतीत केलेली हाराकिरी व भारतीय गोलंदाजांना वरचढ होण्यास दिलेली संधी न्यूझीलंडच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.

भारतीय गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. अवघ्या १७ धावांत न्यूझीलंडचे आघाडीचे ३ फलंदाज माघारी परतले होते. मात्र यानंतर टिम सायफर्ट आणि रॉस टेलर यांनी चौथ्या यष्टीसाठी ९९ धावांची भागीदारी रचत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने फिरवले. नवव्या षटकाअखेर न्यूझीलंडचा संघ ३ बाद ६४ असा चाचपडत होता. यावेळी आवश्यक धावगती ९.०९ अशी होती. दुबेने दहाव्या षटकात ३४ धावांची खैरात करत आवश्यक धावगती ६.६० पर्यंत खाली आणली. ६० चेंडूंत केवळ ६६ धावांची न्यूझीलंडचा आवश्यकता होती व त्यांचे ७ गडी शिल्लक होते. मात्र नवदीप सैनीने सायफर्टला शरीरवेधी चेंडूवर सॅमसनकरवी माघारी धाडत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली. अर्धशतकवीर सायफर्ट माघारी परतल्यानंतर, न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजांनी निराशा केली. ३ बाद ११६ वरून त्यांची ८ बाद १३३ अशी घसरगुंडी उडाली. टेलरने एका बाजूने बाजू सांभाळत आपले सातवे टी-ट्वेंटी अर्धशतक झळकावले, मात्र ‘वाईड’ चेंडूशी छेडछाड करण्याच्या नादात राहुलकडे सोपा झेल देत तो सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ईश सोधीने शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या षटकात दोन षटकार खेचत सामन्यात रंगत आणली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी दबावाखाली संयम राखत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी व शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ तर ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्यात १६३ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीला विश्रांती देत भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहितकडे संघाचे नेतृत्व सोपवले. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र डावाची सुरुवात चांगली झाली नाही. अखेरच्या षटकांमध्येही न्यूझीलंडने टिच्चून मारा करत भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. न्यूझीलंडकडून कुगलेनने २ तर हॅमिश बेनेटने १ बळी घेतला.

रोहितने स्वतः तिसर्‍या स्थानावर फलंदाजीस उतरण्याचा निर्णय घेत युवा फलंदाज संजू सॅमसनला पुन्हा एकदा सलामीला संधी दिली. पण त्याने निराशा केली. केवळ २ धावा काढून कुगलेनच्या गोलंदाजीवर सॅमसन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा दमदार सलामीला मुकली. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दुसर्‍या गड्यासाठी ८८ धावांची भागीदारी केली. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देणार असे वाटत असतानाच राहुल ४५ धावांवर बेेनेटच्या एका जास्त उसळलेल्या चेंडूवर माघारी परतला. राहुल माघारी परतल्यानंतर भारताची धावगती मंदावली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रेयस अय्यरवर दबाव टाकत त्याला हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. दरम्यान, रोहित शर्माने दरम्यानच्या काळात आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमावण्यात भारताचे फलंदाज अपयशी ठरले. ६० धावांवर खेळत असताना रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. याचा फायदा घेत न्यूझीलंडने भारतावर आणखी दबाव टाकला. शिवम दुबेही फटकेबाजी करण्याच्या नादात माघारी परतला. अखेरीस मनीष पांडे आणि श्रेयस अय्यरने भारताला १६३ धावांपर्यंतचा पल्ला गाठून दिला.

धावफलक
भारत ः लोकेश राहुल झे. सेंटनर गो. बेनेट ४५ (३३ चेंडू, ४ चौकार, २ षटकार), संजू सॅमसन झे. सेंटनर गो. कुगलेन २, रोहित शर्मा जखमी निवृत्त ६० (४१ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार), श्रेयस अय्यर नाबाद ३३ (३१ चेंडू, १ चौकार, २ षटकार), शिवम दुबे झे. ब्रुस गो. कुगलेन ५, मनीष पांडे नाबाद ११ (४ चेंडू, १ चौकार, १ षटकार), अवांतर ७, एकूण २० षटकांत ३ बाद १६३
गोलंदाजी ः टिम साऊथी ४-०-५२-०, स्कॉट कुगलेन ४-०-२५-२, हॅमिश बेनेट ४-०-२१-१, ईश सोधी ४-०-२८-०, मिचेल सेंटनर ४-०-३६-०
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल पायचीत गो. बुमराह २, कॉलिन मन्रो त्रि. गो. सुंदर १५, टिम सायफर्ट झे. सॅमसन गो. सैनी ५० (३० चेंडू, ५ चौकार, ३ षटकार), टॉम ब्रुस धावबाद ०, रॉस टेलर झे. राहुल गो. सैनी ५३ (४७ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), डॅरेल मिचेल त्रि. गो. बुमराह २, मिचेल सेंटनर झे. पांडे गो. ठाकूर ६, स्कॉट कुगलेन झे. सुंदर गो. ठाकूर ०, टिम साऊथी त्रि. गो. बुमराह ६, ईश सोधी नाबाद १६, हॅमिश बेनेट नाबाद १, अवांतर ५, एकूण २० षटकांत ९ बाद १५६
गोलंदाजी ः वॉशिंग्टन सुंदर ३-०-२०-१, जसप्रीत बुमराह ४-१-१२-३, नवदीप सैनी ४-०-२३-२, शार्दुल ठाकूर ४-०-३८-२, युजवेंद्र चहल ४-०-२८-०, शिवम दुबे १-०-३४-०

सुपरमॅन ‘संजू’
संजू सॅमसनला अखेरच्या सामन्यात रोहित शर्माऐवजी सलामीला येण्याची संधी देण्यात आली, मात्र केवळ दोन धावा काढत सॅमसन माघारी परतला. सलग दुसर्‍या सामन्यात संजू सॅमसनला अपयश आले. मात्र क्षेत्ररक्षणात सॅमसनने आपलें १०० टक्के योगदान दिले. भारताने मिळविलेल्या निर्भेळ यशापेक्षा संजूच्या क्षेत्ररक्षणाची चर्चाच सोशल मीडियावर गाजत आहे. शार्दुल ठाकूर याने टाकलेल्या डावातील आठव्या षटकात रॉस टेलरने या षटकात एक गगनचुंबी फटका लगावला. हा फटका पाहिल्यानंतर चेंडू सीमारेषेपार जाणार असा अंदाज होता. मात्र मिडविकेट सीमारेषेवर उभ्या असलेल्या संजू सॅमसनने ‘सुपरमॅन’सारखी हवेत मुसंडी मारत चेंडू आत ढकलला आणि संघासाठी उपयुक्त ४ धावा वाचवल्या.

टीम इंडियाने
करून दाखवले!
पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश संपादन करणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. यापूर्वी एकाही देशाला पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचही सामने जिंकणे शक्य झाले नव्हते. या मालिकेपूर्वी भारताचा न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटीमधील जय-पराजयाचा रेकॉर्ड ३-८ असा खराब होता. परंतु, मालिकेतील पाचही सामने जिंकत भारताने ८-८ अशी बरोबरी साधली.

रोहितने टाकले कोहलीला मागे
रोहित शर्माने काल आपले २१वे टी-ट्वेंटी अर्धशतक झळकावले. या व्यतिरिक्त चार शतकेदेखील त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे टी-ट्वेंटीमध्ये २५ किंवा त्यापेक्षा जास्तवेळा ‘पन्नाशी’ ओलांडलेला पहिला खेळाडू म्हणून रोहितने आपले नाव नोंदविले आहे. विराट कोहलीच्या नावावर २४ अर्धशतके आहेत. परंतु, त्याला अजूनही शतक झळकावता आलेले नाही.

रोहित-राहुलचा विक्रम
टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकत्र खेळताना सर्वांत कमी डावात एक हजार धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी काल रविवारी आपल्या नावे केला. या दोघांनी पाचव्या टी-ट्वेेंटी लढतीत ८८ धावांची भागीदारी रचली. यासह त्यांनी एकत्र ‘हजारी’ होण्याचा मान मिळविला. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमध्ये या दोघांनी केवळ १८ डावांत १०१९ धावा केल्या आहेत. ५९.९४च्या सरासरीने व १०.१६च्या धावगतीने या द्वयीने धावा जमवताना तीन शतकी व पाच अर्धशतकी भागीदार्‍या केल्या आहेत.

हिटमॅन जायबंदी; राहुल कर्णधार
टीम इंडियाने या सामन्यासाठी आपला नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती दिली. कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले. परंतु, फलंदाजी करताना डाव्या पोटरीचा स्नायू दुखावल्याने दुर्दैवाने त्याला मैदान सोडावे लागले. त्यामुळे यष्टिरक्षक फलंदाज लोकेश राहुलने उर्वरित सामन्यात संघाचे नेतृत्व केले.

सर्वाधिक पराभव न्यूझीलंडचेच!
आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात अधिक पराभव झालेला संघ म्हणून न्यूझीलंडच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. काल भारताविरुद्ध पाचव्या टी-ट्वेंटीत झालेला पराभव न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमधील ६५वा होता. श्रीलंका (६४) यांना किवी संघाने मागे टाकले. यानंतर वेस्ट इंडीज (६३), बांगलादेश (६२), पाकिस्तान (५७) यांचा क्रमांक लागतो.

शिवम दुबेच्या एका षटकात ३४ धावा
शिबम दुबेने टाकलेले डावातील दहाव्या षटकात न्यूझीलंडने ३४ धावा चोपल्या. टी-ट्‌ेंटी क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वांत महागडे षटक ठरले. टिम सायफर्टने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकून तिसर्‍या चेंडूवर चौकार लगावत पहिल्या तीन चेंडूंवर १६ धावा जमवल्या. चौथ्या चेंडूवर सायफर्टने एक धाव घेतली. ‘फ्रंटफूट नो बॉल’ ठरलेला पाचव्या चेंडूवर रॉस टेलरने चौकार लगावला. यानंतर पुढील दोन्ही चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावत टेलरने दुबेची धुलाई केली.

बूम बूम बुमराह!
टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय टी-ट्‌ेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७ षटके निर्धाव टाकणारा पहिला गोलंदाज ठरला. श्रीलंकेच्या नुवान कुलसेकरा याचा ६ निर्धाव षटकांचा विक्रम बुमराहने काल मोडला. यानंतर प्रत्येकी ५ निर्धाव षटकांसह हरभजन सिंग, अजंथा मेंडीस, ट्रेंट जॉन्सटन, मोहम्मद आमिर (पाकिस्तान), मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) व नावीद (युएई) यांचा क्रमांक लागतो.