Home Featured सत्तेत आल्यास कलम 39-अ रद्द करू : आप

सत्तेत आल्यास कलम 39-अ रद्द करू : आप

0

आगामी 2027 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास दोन महिन्यांच्या आत नगरनियोजन खात्याचे (टीसीपी) कलम 39-अ रद्द केले जाईल आणि या कलमाखाली मंजूर केलेल्या सर्व जमीन रूपांतरणांची सखोल छाननी करून आवश्यक तेथे ती रद्द करण्यात येतील, असे आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी पक्ष कार्यालयात काल घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले.

नगर नियोजन खात्याच्या कलम 39-अ अंतर्गत गोव्यातील सुमारे 53 लाख चौरस मीटर जमिनीचे रुपांतर करण्यात आले आहे. कोरगाव, सांकवाळ, जुने गोवे, पार्से आणि थिवी या गावांमध्ये सर्वाधिक जमीन रुपांतरणे झाली असून पेडणे तालुका हा कलम 39-अ अंतर्गत जमीन रुपांतरणांचा केंद्र बिंदू बनला आहे, असे नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.
आपचे सरकार आल्यास गोव्याचे पर्यावरण, शेतीची जमीन आणि पारंपरिक उपजीविका यांचे संरक्षण करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. कलम 39-अ हे मूळतः क्षेत्रनिहाय नकाशांमधील किरकोळ दुरुस्त्यांसाठी आणण्यात आले होते. मात्र उपलब्ध आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की पर्यावरणदृष्ट्‌‍या संवेदनशील जमिनींचे मोठ्या प्रमाणावर वसाहती क्षेत्रात रूपांतर करण्यासाठी या तरतुदीचा व्यापक वापर करण्यात आला आहे, असेही नाईक यांनी सांगितले.