झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून दिल्लीकडे निघालेल्या खासगी चार्टर एअर अँब्युलन्स विमानाचा सोमवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात विमानाच्या दोन वैमानिकांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याचे काल स्पष्ट झाले. हे विमान झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसरिया पंचायत परिसरात कोसळले होते.
डीजीसीएने या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. 23 फेब्रुवारी रोजी रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडचे बीचक्राफ्ट सी90 विमान रांची-दिल्ली मार्गावर एअर अँब्युलन्स उड्डाण करत होते. विमानाने सायंकाळी 7.11 वाजता रांचीहून उड्डाण केले. कोलकाता एटीसीशी संपर्क प्रस्थापित केल्यानंतर सायंकाळी 7.34 वाजता दक्षिण-पूर्व वाराणसी परिसरात रडार आणि रेडिओ संपर्क तुटला. त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
या अपघातात एका जोडप्याचाही मृत्यू झाला आहे, त्यांनी हे चार्टर विमान भाड्याने घेण्यासाठी 8 लाखांचे कर्ज घेतले होते. झारखंडच्या चांदवा गावात राहणारे संजय कुमार (41) यांच्या हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ते गेल्या सोमवारी भाजले होते. तेथेच त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. पुढील उपचारांसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी कर्ज काढले. मालमत्ता आणि जमीन विकून नातेवाईकांकडून कर्ज घेतले. तसेच, झारखंडमधून दिल्लीत हलवण्याकरता त्यांना एअर ॲम्ब्युलन्सची गरज होती. दिल्लीस्थित चार्टर सेवा रेडबर्ड एअरवेजच्या बीचक्राफ्ट सी 90 विमानसेवा भाड्याने घेण्याकरता त्यांनी 8 लाखांचे कर्ज काढले. झारखंडमधून संजय, त्यांची पत्नी अर्चना आणि ध्रुव नावाचा नातेवाईक या विमानातून दिल्लीत येत होते. त्यांच्याबरोबर पायलट-इन-कमांड कॅप्टन विवेक विकास भगत आणि सह-पायलट कॅप्टन सवराजदीप सिंग, डॉ. विकास कुमार आणि सचिन कुमार मिश्राही होते. त्या सर्वांचा मृत्यू झाला.