ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कवी गजानन रायकर यांचे निधन

0
72

स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ कवी, साहित्यिक, माजी आमदार गजानन रायकर यांचे काल गुरूवार दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी गोवा वैद्यकीय इस्पितळात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

बुधवारी रायकर यांचा रक्तदाब वाढल्याने इस्पितळात दाखल केले होते. तेथ उपचार सुरू असताना काल त्यांचे निधन झाले. आज शुक्रवार दि. २४ रोजी सकाळी ११ वा. मडगाव स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आके पांडवा कपेल येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्‍चात पुत्र पराग, सून, नातवंडे असा परिवार आहे.

रायकर हे मराठी व कोकणी कवी होते. त्यांची गीते नामवंत गायकांनी गायिली आहेत. त्यांचे सात काव्यसंग्रह, दादुली हा कथासंग्रह, मजुराचे राज्य हे नाटक आदी पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. गोवा मुक्तीनंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला होता.

थोर स्वातंत्र्यसेनानी हरपला

  • श्रीपाद नाईक
    थोर स्वातंत्र्यसैनिक, लेखक, फोंड्याचे पहिले आमदार गजानन रायकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायी व क्लेशकारक आहे. गोवा मुक्ती संग्रामातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण असेच होते. गोवा मुक्ती चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेल्या कविता स्फूर्तीचा वणवा पेटवणार्‍या होत्या. त्यांच्या जाण्याने एक थोर स्वातंत्र्यसेनानी हरपला. अशा शब्दांत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गोमंतक साहित्य सेवक मंडळाची श्रद्धांजली
कविवर्य गजानन रायकर यांच्या निधनाने गोव्यातील एका प्रतिभावान कविला आम्ही मुकलो आहोत. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या कार्यकरिणीवर त्यांनी काम केले होते. त्यांच्या जाण्याने गोमंतकीय साहित्य क्षेत्रात पोकळी जाणवेल, अशी गोसासे मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.