खासगी बसमालक संघटनेची तिकीट दरवाढीची मागणी

0
35

>> रस्ता कर माफ करण्याचीही सूचना

अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेने तिकीट दरवाढीची मागणी केली आहे. त्याचबरोबर संघटनेने वाढत्या डिझेल दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर बसमालकांना रस्ता कर माफ करावा अशीही मागणी केली आहे.

अखिल गोवा खालगी बसमालक संघटनेने काल आपल्या वरील मागणीसाठी येथील वाहतूक खात्याच्या कार्यालयासमोर निदर्शनेही केली.

अदखिल गोवा खासगी बसमालकांना सरकारकडून इंधन व विमा सबसिडीचे पैसे येणे असून ते लवकरात लवकर देण्याची मागणी यावेळी या संघटेनेने केली.

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी आहे. मागील जवळ जवळ वर्षभर राज्यात कोरोना महामारी सुरू असून त्याचा फटका बस व्यावसायिकांनाही बसला. बर्‍याच ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरू झाल्याने कंपन्यांत काम करणारे कामगार किंवा इतर नागरिक घरीच काम करू लागले. त्यामुळे बसच्या प्रवासी वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. त्याचप्रमाणे क्षमतेच्या ५० वाहतुकीचे बंधन बसवर घालण्यात आले.

आधीच प्रवासी कमी त्यात ५० टक्के क्षमतेने बस चालवण्याचा आदेश त्यामुळे बसेसचे खूप मोठे नुकसान झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. आज कोरोना महामारीचा फटका सर्वच व्यवसायांना बसला. मात्र देशातील पेट्रोल व डिझेलचे दर काही कमी झाले नाहीत. उलट ते वाढतच गेले. प्रवासी कमी आणि डिझेलचे दर जास्त अशी उलट प्रक्रिया सुरू झाल्याचा फटका आम्हाला बसल्याचे काही बसमालकांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे प्रवासी कमी झालेले आहेत. त्यामुळे बसच्या फेर्‍याही कमी झालेल्या आहेत. त्यामुळे सध्या बसच्या सर्वच फेर्‍या नुकसानात माराव्या लागत आहेत. या सर्वच बाबींचा विचार करून सरकारने तिकीट दरात वाढ करून द्यावी अशी मागणी संघटनेने काल केली.