ज्ञानाने अष्टशक्ती विकसित करा योगसाधना – ४८१ अंतरंग योग – ६६

0
537
  • डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधनेतील ‘अंतरंग योग’ या पैलूवर विचार करताना आपण वेळोवेळी प्रत्येक उत्सवामागील असलेले गूढ तत्त्वज्ञान समजण्याचा विचार करीत आहोत. सध्या विषय आहे तो म्हणजे नवरात्रीचा व त्यातील अष्टशक्तींचा.

ब्रह्मांड फार विस्तृत आहे, मोठे आहे. त्यामानाने आपण मानव फार लहान आहोत. फक्त शारीरिकदृष्ट्याच नाही तर बुद्धीच्या मानानेदेखील लहान आहोत. विश्‍वाचे तत्त्वज्ञान अत्यंत गूढ आहे. एका कुठल्याही प्रकांड पंडितालासुद्धा हे ब्रह्मांड किती समजले आहे, हा संशोधनाचा विषय आहे.

सृष्टीच्या आदिकाळापासून या रहस्याच्या आकलनासाठी विविध ज्ञानी व्यक्तींनी विविध क्षेत्रात अभ्यास, मनन-चिंतन, प्रयोग केले. त्यात मोठमोठे वैज्ञानिक आहेत. त्यांनी भौतिक ज्ञान मिळवून बुद्धीचा विकास केला तर ऋषि-महर्षींनी आध्यात्मिक ज्ञानासाठी फार मोठी तपश्‍चर्या केली. भौतिक गोष्ट दाखवता, बघता येते. मग ती समजणे प्रत्येकाला सोपे होते. पण आध्यात्मिक क्षेत्रात तसे काही करता येत नाही. कारण त्यांत स्थूलापेक्षा सूक्ष्म गोष्टीच जास्त असतात. त्यामुळे सामान्य व्यक्तींना परस्पर आकलन होणे कठीणच नव्हे तर अनेकवेळा अशक्यच असते. पण हे जीवनविकासासाठी आवश्यक असलेले ज्ञान तर सर्वांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. याचा विचार करूनच आपल्या भारतीय ऋषींनी अनेक सण- उत्सव सुरू केले. त्याच्या जोडीला एक विशिष्ट देवदेवता दाखवली. मग तत्त्वज्ञान समजण्यासाठी काही गोष्टी, कथा सांगितल्या. त्याचबरोबर सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाली. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला- बाल, तरुण, वृद्ध – स्त्रिया आणि पुरुष.. सर्वांनाच थोडी मौजमस्ती करायला मिळाली व आनंद मिळाला.
योगसाधनेतील ‘अंतरंग योग’ या पैलूवर विचार करताना आपण वेळोवेळी प्रत्येक उत्सवामागील असलेले गूढ तत्त्वज्ञान समजण्याचा विचार करीत आहोत. सध्या विषय आहे तो म्हणजे नवरात्रीचा व त्यातील अष्टशक्तींचा.

माउंट अबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय या संस्थेनुसार या अष्टशक्ती आहेत व प्रत्येक शक्तीसोबत वेगवेगळी देवी आहे…
१. विस्तार संकीर्ण करण्याची शक्ती – पॉवर टू विथड्रॉ- पार्वती.
२. समेट करण्याची शक्ती – पॉवर टू पॅकअप – दुर्गा.
३. सहन करण्याची शक्ती – पॉवर टू टॉलरेट – जगदंबा.
४. सामावून घेण्याची शक्ती – पॉवर टू ऍडजस्ट – संतोषी मां.
५. परखण्याची शक्ती – पॉवर टू जज – गायत्री.
६. निर्णय घेण्याची शक्ती – पॉवर टू डिसाइड – सरस्वती.
७. सामना करण्याची शक्ती – पॉवर टू फेस – महाकाली.
८. सहयोग करण्याची शक्ती – पॉवर टू को-ऑपरेट – लक्ष्मी.
हे गूढ ज्ञान समजण्यासाठी विविध कथा प्रतीक रूपात आहेत. त्यात तीन प्रचलीत कथा आहेत- मधु व कैदभ असुर

  • हे असुर एवढे शक्तिशाली होते की त्यांनी देव-देवतांना बंदी बनवले. त्यावेळी श्रीनारायण मोहनिद्रेत होते. म्हणून ब्रह्माने आदिकन्या प्रगट केली व तिने त्या असुरांचा नाश केला.
    २. महिषासुराने स्वर्गातील सर्व देवतांना पराजित केले. त्यावेळी त्रिदेवांनी- ब्रह्मा, विष्णू, महेश- यांनी आदिशक्ती निर्माण केली. तिला आठ हात होते. प्रत्येक हातात वेगवेगळे शस्त्र होते. ती त्रिनेत्री होती. तिने महिषासुराचा वध केला.
    ३. सूर्यवंशात शुम्भ-निशुम्भ नावाचे असुर जन्मले. त्यांचा प्रधान कार्यकर्ता रक्तबिंदू, सेनापती धूम्रलोचन व मुख्य साहाय्यक चण्ड-मुण्ड होते. त्यांचा विनाश करण्यासाठी भगवान शिवाने आदिकुमारी प्रकट केली. तिने विकराल रूप म्हणजे महाकालीचे रूप घेऊन आपल्या शक्तीने त्या सर्वांचा नाश केला.
    या सर्व कथांतील फक्त वरवर शब्दार्थ न बघता त्यातील भावार्थ, गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थ बघणे आवश्यक आहे. त्यातील रूपक बघायला हवेत.
  • रक्तबिंदूच्या रक्ताच्या थेंबापासून एक नवा असुर तयार होत असे. कारण त्यातच त्याचे बीज होते. म्हणून आदिशक्तीने त्याच्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू न देता त्याचा नाश केला. म्हणजे बीजापासून नाश केला.
  • मधु म्हणजे क्रोध व कैदभ म्हणजे द्वेष हे मनोविकार.
  • महिष म्हणजे अविवेकी, मंद बुद्धी – म्हशीसारखा.
  • धूम्रलोचन म्हणजे ईर्ष्या व वाईट दृष्टीचे प्रतीक.
  • शुम्भ-निशुम्भ म्हणजे हिंसा व द्वेष.
    यातील सारांश बघायला हवा.
  • हे विविध असुर म्हणजे प्रत्येकातील षड्‌रिपु- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व अहंकार.
  • त्रीनेत्री देवी – तिसरा नेत्र ज्ञानाचा.
  • ज्ञान वापरून अष्टशक्तींना विकसित करायचे हा या सर्व कथांचा सार.

अष्टशक्तीतील पहिली शक्ती…
१. विस्तार संकीर्ण करण्याची – मागे हटण्याची शक्ती आपण कासवाच्या रूपात पाहिली.
२. समेट करण्याची शक्ती- दुर्गा
प्रत्येकाच्या जीवनात वाईट प्रसंग, विविध समस्या येतात. त्यात विविध तर्‍हा आहेत- शारीरिक, मानसिक, भावनिक. त्यातील काही प्रमुख म्हणजे – अपशब्द, अपमान, विश्‍वासघात… या घटना कौटुंबिक आहेत, सामाजिक आहेत, कामाच्या ठिकाणी घडणार्‍या आहेत. आपण त्या सहसा सोडून देत नाही. कारण आपले संस्कारच तसे आहेत. आपण त्यांना घट्ट पकडून ठेवतो. त्यामुळे भयंकर मानसिक त्रास होतो. आरोग्यावरही परिणाम होतो. याचे एक कारण म्हणजे आपला अहंकार. व्यक्तीला स्वाभिमान असणे आवश्यक आहे पण अहंकार त्रास देतो. अशावेळी ही शक्ती लाभदायक ठरते.
प्रजापिताच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण अशावेळी आत्मिक पैलूवर विचार करायचा. आत्मा परमात्म्याचे संतान, त्याचे गुण आहेत- पवित्रता, शांती. या शांतीसाठी त्याला क्षमा करण्याची शक्ती वाढवायला हवी. ‘झाले गेले विसरून जा’, असे आपण अनेकवेळा म्हणतो. ते करणे तसे सोपे नाही. कारण आपण शारीरिक बंधनात असतो. अशा वेळी ‘देही’ अवस्थेतून ‘विदेही’ स्थितीत जायचा अभ्यास हवा.
आपण कर्मसिद्धांताप्रमाणे विचार करू शकतो. आपला आत्मा विविध शरिरात जन्म घेऊन आलेला असतो. कदाचित पूर्वीच्या जन्मात आपल्या आत्म्याने दुसर्‍या आत्म्याशी चुकीचा व्यवहार केला असेल. म्हणून या जन्मात आपल्याला हे भोग मिळाले आहेत.
दुसर्‍या तर्‍हेने विचार करताना हेही लक्षात ठेवायला हवे की कुणाचा मृत्यू केव्हा येणार हे कुणालाही ठाऊक नसते. तेव्हा जाण्याच्या आधी जुने हिशोब पूर्ण करून गेलेले बरे म्हणजे पुढच्या जन्मात परत भोग, समस्या नकोत.
इतिहासाकडे नजर टाकली तर असे दिसून येते की अनेक राजामहाराजांनी यशस्वी माघार घेण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे सर्वनाश टळलेला आहे. ह्याउलट ज्यांनी अहंकारामुळे माघार घेतली नाही, त्यांनी स्वतःचा, आपल्या सैन्याचा, जनतेचा सर्वनाश घडवून आणलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे यांच्या इतिहासात अशा काही घटनांची नोंद आहे.
या शक्तीची देवी आहे दुर्गा. तिचे वाहन आहे सिंह – राग, अहंकाराचे प्रतीक. तसेच तिने पायाने असुराला दाबून ठेवले आहे. बोध हाच की अशावेळी या विकारांवर आपण विजय मिळवणे आवश्यक आहे. आपण देवीचे भजन करतो. ध्यान करतो. याचे कारण म्हणजे हे गुण आपल्यात यावे म्हणून.
३. सहनशक्ती – जगदंबा –
प्रत्येकाच्या जीवनात अनेक प्रसंग येतात जेथे मनाविरुद्ध विविध घटना घडतात. तेव्हा मानसिक त्रास होतात. मनाची शांती ढळते. पण अनेकवेळा आपण असहाय्य असतो. सहनशक्ती ढळल्यामुळे आपण प्रतिकार करतो. पण नंतर लक्षात येते की आपण गरजेपेक्षा जास्तच राग केला. त्याचा अर्थ शांत राहून अन्याय सहन करणे नव्हे तर शांत राहून दुसर्‍या व्यक्तीला समजवायचा प्रयत्न करणे.
काही व्यक्ती आयुष्यभर सहन करतात. शेवटी म्हणतातसुद्धा- आता किती सहन करू? माझ्या सहनशक्तीचा आता अंत झाला आहे. म्हणून या शक्तीची देवी आहे जगदंबा. म्हणजे जगाची ‘अम्बा’- ‘आई’.
आपली आई किती सहन करते? आधी ९ महिने गर्भाशयात सांभाळ, प्रसुतीवेदना, तद्नंतर बाळाच्या रोजच्या गरजा, सांभाळ, शिक्षण… मग त्याचा संसार. आणि आपण? आईचा हा गुण सोडाच, तो आपल्यात येत नाहीच. पण लग्न झाल्यावर आईला वृद्धाश्रमात ठेवतो कारण तिचे त्या वयातील वागणे आम्हाला व पत्नीला सहन होत नाही.
एक छान सोपे उदाहरण म्हणजे फळ मिळवण्यासाठी आपण वृक्षावर दगड मारतो. वृक्ष फळ देतो पण त्याला झालेले दुःख सहन करतो.

  • नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी आपण जगदंबेची आराधना करून ही मातेची शक्ती आपल्यात यावी ही मागणी करणे अपेक्षित आहे.
    प्रजापिताच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व शक्ती मिळवण्यासाठी नियमित ध्यान – तेही ‘अमृतवेळे’स म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर अत्यावश्यक आहे. त्या शांत समयी जेव्हा पर्यावरणात कंपने कमी असतात तेव्हा ध्यान चांगले होते. तसेच त्यांच्या ध्यानपद्धतीत परमात्मा शिवाशी योग साधायचा असतो. कारण आत्म्याला शक्तीची फार गरज असते. प्रेमपूर्वक, शांतीपूर्वक ध्यान केले तर आत्मशक्ती वाढते. अनेकांचे असे अनुभव आहेत. प्रयत्न करून बघा. यश नक्की मिळेल.
    खरेंच, आजच्या या कलियुगात हे ज्ञान अत्यावश्यक आहे. स्वतःच्या जीवनविकासासाठी तसेच आत्मशक्ती वाढवण्यासाठी.
    (संदर्भ ः प्रजापिता ब्रह्माकुमारी यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम. भारत के त्यौहारों की आध्यात्मिक व्याख्या (पुस्तक))