जोकोविच चॅम्पियन!

0
112

सर्बियाच्या नोवाक जोकोविचने रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. जोकोविचने ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमचा अंतिम सामन्यात पराभव केला. जोकोविचचे ऑस्ट्रेलियन ओपनचे हे आठवे विजेतेपद ठरले. याआधी त्याने २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६ आणि २०१९ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू असलेल्या जोकोविचने चार तास चाललेल्याा अंतिम सामन्यात सामन्यात थिमचा पाच सेटमध्ये ६-४, ४-६, २-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. याआधी जोकोविच आणि थिम यांच्यात १० लढती झाल्या होत्या. त्यापैकी सहा वेळा जोकोविचने तर ४ वेळा थिमने बाजी मारली होती. पहिला सेट जिंकत जोकोविचने विजयाच्य दिशेने मार्गक्रमण केले होते. परंतु, थिमने पुढील दोन्ही सेट जिंकत जोकोविचच्या घोडदौडीला ब्रेक लावला. तिसरा सेट एकतर्फी गमावल्यानंतर जोकोविचने आपली रणनीती बदलताना चौथा सेट सहज खिशात घातला. अखेरच्या सेटमघ्येही दोन्ही खेळाडूंमध्ये झुंज रंगली. थिमने आपल्या ठेवणीतल्या काही खास फटक्यांच्या जोरावर जोकोविचची कसोटी पाहिली. मात्र सरतेशेवटी जोकोविचने आपला सर्व अनुभव पणाला लावत विजेतेपदावर आपली मोहर उमटवली. ३२ वर्षीय जोकोविचचे कारकिर्दीमधील हे १७वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. थिमचे ही तिसरी ग्रँडस्लॅम अंतिम फेरी होती. याआधी २०१८ आणि २०१९मध्ये तो फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पोहोचला होता. पण पहिल्या दोन्ही वेळेप्रमाणे यावेळेसही त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.