जेम्सची अपराजित घोडदौड रोखण्याचा कॉप्पेल यांचा प्रयत्न

0
168

हीरो इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) केरळा ब्लास्टर्सची अडखळती वाटचाल अचानक थांबली असून त्यांनी सातत्य राखले आहे. अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळविण्याच्या दिशेने त्यांनी आगेकूच सुरु केली आहे. डेव्हीड जेम्स मुख्य प्रशिक्षक म्हणून परतल्यानंतर अपराजित मालिका राखलेल्या ब्लास्टर्सला रोखण्याचा स्टीव कॉप्पेल यांच्या जमशेदपूर एफसीचा प्रयतन राहील. बुधवारी हा सामना होत आहे.

ब्लास्टर्स फॉर्मात आल्यामुळे या लढतीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईत १-० असा विजय मिळविलेल्या ब्लास्टर्सचा आत्मविश्वास उंचावला आहे. आधीचे प्रशिक्षक रेने म्युलेस्टीन यांच्याकडे सूत्रे असताना इयन ह्युमला मैदानावर उतरण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत होती. आता जेम्स यांच्याकडे सुत्रे येताच त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. जेम्स यांच्यामुळे ब्लास्टर्सने आक्रमक खेळ सुरु केला आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर जमशेदपूरचा संघ दडपणाखाली ब्लास्टर्सच्या आक्रमणाचा कसा सामना करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

कॉप्पेल यांनी यापूर्वी ब्लास्टर्सला मार्गदर्शन केले होते. आता ते जमशेदपूरचे मार्गदर्शक आहेत. अशा लढतीचा शेवट वादग्रस्त होऊ नये म्हणून पंचांची कामगिरी उच्च दर्जाची व्हावी लागेल, असे कॉप्पेल यांनी स्पष्टपणे सांगितले.
सामन्याबद्दल ते म्हणाले की, जेम्स दाखल झाल्यापासून ब्लास्टर्स संघावर त्यांचा लक्षणीय प्रभाव पडला आहे. तीन आठवड्यांपूर्वी आम्ही जशी तयारी केली असती त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने लढतीला सामोरे जाऊ.

ब्लास्टर्समध्ये परतल्यापासून जेम्स यांनी एक बरोबरी व दोन विजय अशी कामगिरी करीत अपराजित मालिका राखली आहे. संघाच्या वाटचालीबाबत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, विजय महत्त्वाचे आहेत. १-० असा स्कोअर मला आवडतो, कारण त्यामुळे तुम्ही सदैव जागरुक राहता. मुंबईविरुद्धचा सामना शारिरीक आणि मानसिक पातळीवर दमछाक करणारा ठरला, पण संघाचे मनोधैर्य उंचावले असून खेळाडू या लढतीसाठी आतूर आहेत. एखाद्या संघाच्या क्षमतेचे भाकित वर्तविणे अवघड असते, पण जमशेदपूर संघाकडे भरपूर क्षमता आहे आणि सामना जोरदार चुरशीचा होईल.