जीसीझेडएमपी मसुद्याबाबत ८ जुलै रोजी जनसुनावणी

0
117

>> दोन्ही जिल्ह्यांत होणार जाहीर सादरीकरण

गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या (जीसीझेडएमपी) मसुद्याला अंतिम रूप देण्यासाठी गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए) येत्या ८ जुलै रोजी जाहीर जनसुनावणी घेणार आहे. उत्तर गोव्यासाठी कांपाल येथील परेड मैदानावर, तर दक्षिण गोव्यासाठी मडगाव येथील एसजीपीडीए मैदानावर मसुदा सादरीकरण होणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार हे सादरीकरण नव्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दोन्ही ठिकाणी सकाळी १० वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. ज्यांना या सुनावणीत सहभागी होऊन आपली मते मांडायची आहेत, त्यांनी सेरलेरीींरश्रूेपशऽसारळश्र.लेा या ई-मेलवर किंवा उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात ३० जूनपर्यंत लेखी द्यावे. त्यासाठी स्वत:ची ओळख पटवणारी कागदपत्रे सादर करावीत. याशिवाय सादरीकरण स्थळी देखील सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नावनोंदणी करता येईल. विविध खाती, आस्थापने, स्थानिक नागरिक, बिगर सरकारी संघटना यांना गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या मसुद्याविषयी त्यांच्या काही हरकती किंवा सूचना असतील, तर संबंधित जिल्हाधिकारी अथवा सीझेडएमपीच्या सदस्य सचिवांकडे मांडाव्यात. तसेच आभासी पद्धतीने देखील या जनसुनावणीत भाग घेता येईल, असेही जीसीझेडएमएने कळवले आहे.

२४ तास सुनावणी घेण्याची तयारी : नीलेश काब्राल
जीसीझेडएमपी मसुद्याबाबत सादरीकरण पावसाळ्यात होत असल्याने मंडप उभारण्यात येणार आहे. सर्व लोकांना आपल्या सूचना किंवा हरकती मांडता याव्यात, यासाठी गरज भासल्यास ही सुनावणी २४ तास घेण्याची तयारी असल्याचे पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी स्पष्ट केले आहे.