जीवनाच्या समग्र विकासाचे साधन ः योग

0
157

येत्या शुक्रवार दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. या संकल्पनेचे प्रणेते पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी चंडिगढ येथे भारतीय योग संकल्पनेविषयी विचार प्रकट केले होते. त्याचा हा संपादित अंश ः

संयुक्त राष्ट्रांद्वारे अनेक आंतरराष्ट्रीय दिवस साजरे केले जातात. पण संयुक्त राष्ट्रांद्वारा साजर्‍या होणार्‍या एवढ्या सार्‍या दिवसांपैकी क्वचितच एखादा दिवस जनआंदोलन बनला असेल. जगातल्या प्रत्येक कोपर्‍यातून एवढा पाठिंबा, स्वीकृती प्राप्त करणार्‍यामध्ये, आंतरराष्ट्रीय योग दिवसाची बरोबरी आणखी कुठला दिवस करु शकत नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कार्यक्रम होतात. संयुक्त राष्ट्रांचा जागतिक कर्करोग दिन असतो, जागतिक आरोग्य दिन असतो, जागतिक मानसिक आरोग्य दिन असतो, असे अनेक असतात. आरोग्याशी संबंधित अनेक दिवस संयुक्त राष्ट्रांद्वारे साजरे केले जातात. पण ज्याचा थेट संबंध आरोग्याशी आहे, शारीरिक-मानसिक-सामाजिक तंदुरुस्तीशी आहे, तो योग आज इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांच्या चळवळीत कसा रुपांतरित झाला आहे? मला असे वाटते की, आपल्या पूर्वजांची त्यांनी आपल्याला दिलेल्या वारशाची ताकद आहे. या वारशाची ओळख काय आहे? ती करून घेऊया.

शिस्तीचे अधिष्ठान

मला असे वाटते की योगासने म्हणजे एक प्रकारे जीवनातल्या शिस्तीचे अधिष्ठान आहे. कधी कधी लोक आपल्या कमी क्षमतेमुळे हे पूर्णपणे समजून घेऊ शकत नाहीत. कधी कधी लोकांना वाटते, योगातून काय मिळणार आहे? हे संपूर्ण विज्ञान देण्याघेण्यासाठी नाही. काय मिळणार आहे, यासाठी योग नाही. मी काय सोडू शकेन, मी काय देऊ शकेन, कुठल्या कुठल्या गोष्टींपासून मी मुक्त होऊ शकेन, यासाठी योग आहे. हा मुक्तीचा मार्ग आहे. हा मिळवण्याचा मार्ग नाही.
सगळे संप्रदाय, धर्म, भक्ती, पूजापाठ या गोष्टीवर जोर देतात की मृत्यूनंतर इहलोकातून निघून जेव्हा परलोकात पोहचू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे. आपण जर अशा प्रकारे पूजा-पाठ केले, ईश्वराची साधना-आराधना केली तर आपल्याला परलोकात ते मिळेल. योग परलोकासाठी नाही. मृत्यूनंतर काय मिळेल याची वाट योग दाखवत नाही म्हणूनच हे धार्मिक कर्मकांड नाही. इहलोकात आपल्या मनाला शांती कशी मिळेल, शरीर कसे निरामय राहील, समाजात एकसूत्रता कशी राहील यासाठी योग शक्ती देतो. हे परलोकाचे विज्ञान नाही. हे इहलोकाचे विज्ञान आहे. या जन्मात काय मिळेल, त्याचे विज्ञान योग आहे.

शरीर, मन, बुद्धीचे सुसूत्रीकरण

शरीर, मन, बुद्धी, आत्मा सुसूत्रपणे काम करु शकतील याचे प्रशिक्षण योग देतो. आपण जर स्वत:कडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल आपण चाललो न चाललो, आपण ताजेतवाने असू वा आळशी, थकलेले भागलेले असू की उत्साही, आपले शरीर कसेही असू शकते. शरीर जसे नेऊ तसे येते. पण मन, मन कधी स्थिर राहत नाही. ते चहूकडे फिरत असते. बसलेले इथे असाल, पण अमृतसरची आठवण आली की मन तिथे जाते. आनंदपूर साहब आठवले तर तिथे पोहोचते. मुंबईची आठवण आली तर तिथे जाते. एखाद्या मित्राची आठवण आली तर मन त्याच्याकडे जाते. मन अस्थिर असते. शरीर स्थिर असते. मनाला स्थिर कसे करायचे आणि शरीराला गतिमान कसे करायचे, ते योग शिकवतो. म्हणजेच आपल्या मूलभूत प्रकृतीमध्ये परिवर्तन आणण्याचे काम योग करतो. ज्यात मनाला स्थिर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि शरीराला गतिमान करण्याचे प्रशिक्षणही मिळते. यात संतुलन साधले गेले तर जीवनात, ईश्वराने दिलेले जे हे शरीर आहे ते आपल्या सर्व संकल्पांच्या पूर्ततेसाठी उत्तम माध्यम ठरु शकते.

योग आस्तिक व नास्तिकांसाठी

या अर्थाने योग आस्तिक आणि नास्तिक माणसांसाठीही आहे. जगात कुठेही खिशात पैसे नसताना आरोग्य विमा मिळत नाही. पण योग शून्य पैशात आरोग्य विमा देतो. तो गरीब-श्रीमंत भेद करत नाही. विद्वान-अडाणी असा भेद तो करत नाही. गरिबातील गरीब व्यक्तीही आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीही योग सहजपणे करु शकते. यासाठी कुठल्याही वस्तूची गरज नाही. एक हात पसरण्यासाठी कुठेही जागा मिळाली की माणूस योग करू शकतो आणि आपले शरीर व मन तंदुरुस्त राखू शकतो. भारतासारखे गरीब देश, जगातले गरीब देश, विकसनशील राष्ट्र यांनी जर प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्याची काळजी घेण्यावर भर दिला तर आरोग्यावर होणारा खर्च ते वाचवू शकतात आणि त्याचा योग्य उपयोग करू शकतात. प्रतिबंधात्मक आरोग्याच्या काळजीचे जितके उपाय आहेत त्यात योग एक सरळ, स्वस्त आणि प्रत्येकाला उपलब्ध असलेला मार्ग आहे.

स्व – क्षमता वाढवा

योगाला जीवनाशी जोडले पाहिजे. अनेक लोक असतील, जे आज लवकर उठून टीव्ही पाहत असतील किंवा दिवसभरात त्यांना हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळेल. मी जगभरातल्या लोकांना विनंती करतो, तुम्ही स्वत:साठी, स्वत:ला जोडण्यासाठी, स्वत:ला ओळखण्यासाठी, स्वत:ची क्षमता वाढवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की वाट पाहू नका. या जीवनात योगाला तुमच्या जीवनाचा भाग बनवा. काहीच कठीण काम नाही. फक्त ते करण्याची गरज आहे.
आपण योगाबाबत चर्चा करतो. ब्राझीलमध्ये एक धर्ममित्र योगी होते. त्यांचा असा दावा होता की योगाची १००८ आसने आहेत आणि त्यांनी प्रयत्न करुन ९०८ आसनांची त्यांच्या क्रियांची छायाचित्र काढली होती. ते ब्राझीलमध्ये जन्मलेले होते आणि योगाप्रति समर्पित होते. आज जगाच्या प्रत्येक भागात योग प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. जर योग आकर्षणाचा, प्रतिष्ठेचा विषय असेल तर ज्या महापुरुषांनी,ऋषिमुनींनी आपल्याला हे विज्ञान दिले, त्यांच्याप्रतीही आपली ही जबाबदारी बनते की, तो योग्य स्वरुपात आपण जगभरात पोहोचवला पाहिजे. आपल्याला क्षमतावृद्धी करायला पाहिजे. भारतातून उत्तमोत्तम योगशिक्षक तयार झाले पाहिजेत.

योगा प्रोटोकॉल

गुणवत्तेसाठी भारत सरकारची जी परिषद आहे, दर्जा परिषद, तिने योगाचे प्रशिक्षण कसे असावे, योगाचे शिक्षक कसे असावेत त्यासाठी काही नियम निश्चित करण्याच्या दिशेने काम सुरु केले आहे. भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेसोबत संपूर्ण जगभरात योगाचा प्रोटोकॉल, वैज्ञानिक पद्धत यावर काम करायला सुरुवात केली आहे. देशभरात योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कशी व्यवस्था असावी, जगात योगाचे योग्य रुप कसे पोहोचेल, त्याची शुद्धता कायम राखण्यासाठी काय करावे, या संदर्भात काम सुरु आहे. यासाठी नव्यानव्या संसाधनांचीही आवश्यकता आहे.
तुम्ही पाहिले असेल, आजकाल मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, स्त्रीरोगतज्ञ गर्भार महिलांना गर्भारपणात योग करण्यासाठी आग्रह धरतात त्यांना योगशिक्षकाकडे पाठवतात, कारण प्रसूतीदरम्यान या योगिक क्रिया सर्वाधिक उपयोगी ठरतात. सांगण्याचे तात्पर्य असे की, जसजसा काळ जातो, जसजशा गरजा असतात त्यानुरुप संशोधन करुन बदल करणे गरजेचे असते.

योगाने जोडले जाऊ

आज आपण खूप व्यस्त झालो आहोत. स्वत:बरोबर आपण ना दुसर्‍याला जोडू शकत, ना आपण स्वत:साठी जगू शकत. आपण आपल्यापासूनच तुटत चाललो आहोत. आपण आणखी कोणाशी जोडले जाऊ न जाऊ पण योगामुळे आपण आपल्याशी जोडले जातो. म्हणूनच योग आपल्यासाठी शारीरिक, अध्यात्मिक आणि सामाजिक चेतनेचा केंद्रबिंदू झाला आहे. शरीरस्वास्थ्य तो देतो, अध्यात्मिक अनुभूतीसाठी मार्ग तो तयार करू शकतो आणि समाजाबरोबर संतुलित आचरण करण्याचे शिक्षण तो देतो म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की, योगाला वादात अडकवू नका. तो सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आणि इहलोकाच्या सेवेसाठी आहे. परलोकासाठी संप्रदाय आहेत, धर्म आहेत, परंपरा आहे, गुरुमहाराज आहेत बरेच काही आहे. योग इहलोकासाठी, क्षमता वाढवण्यासाठी आहे म्हणूनच आपण आपल्याला योगाशी जोडले पाहिजे. सगळे लोक योगाप्रती समर्पित नाही होऊ शकत. पण स्वत:शी जोडण्यासाठी योगाशी जोडले जाणे हा एक उत्तम मार्ग आहे. मला विश्वास आहे की, आपण या दिशेने पुढे जाऊ.

व्यावसायिक संधी

आज योग जगात एक मोठा आर्थिक व्यवसाय होत आहे. संपूर्ण जगात एक खूप मोठा पेशा म्हणून विकसित होत आहे. योग प्रशिक्षकांसाठी मागणी वाढत आहे. जगातल्या प्रत्येक देशात मागणी वाढत आहे. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या शक्यता आहेत. अब्जावधींचा व्यवसाय आज योग नावाच्या व्यवस्थेसह विकसित होत आहे. जगात अशा अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत, ज्या १०० टक्के योगासाठी समर्पित आहेत आणि त्या चालत आहेत. एक खूप मोठ्या व्यवसायाच्या रुपात हे विकसित होत आहे. योग ही उत्तम आरोग्याची हमी आहे. ही केवळ तंदुरुस्तीची नाही तर उत्तम आरोग्याची हमी आहे. जीवनाला जर समग्र विकासाकडे घेऊन जायचे असेल तर हा त्याचा उत्तम मार्ग आहे.