एका भरकटलेल्या प्रवाहपतीत जीवनाची कहाणी

0
201

एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू

हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सदैव वादग्रस्त ठरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय दत्त. त्याची व्यसनाधीनता, त्यातून बरे होणे, अंडरवर्ल्डशी व मुंबई बॉम्बस्फोटमालिकेशी त्याचा संबंध जोडला जाणे, त्याच्या जीवनातील कौटुंबिक वादळे या सार्‍याची एक ‘केस स्टडी’ म्हणून चिकित्सा करणार्‍या नव्या पुस्तकाविषयी…

सदैव विवादांच्या वावटळीत सापडलेला, वारंवार भरकटलेला, परंतु तरीही आपल्या चाहत्यांच्या मनातील स्थान न गमावलेला बॉलिवूडमधील स्टार पुत्र म्हणजे संजय दत्त. त्याच्या चाहत्यांचा लाडका ‘संजू बाबा’. सुनील दत्त – नर्गीस यांचे हे पुत्ररत्न नेहमीच वादग्रस्त राहिले. आधी अमली पदार्थ सेवनामुळे, वेगवेगळ्या अभिनेत्रींशी आलेल्या कथित संबंधांमुळे, मुंबई बॉम्बस्फोट मालिकेशी नाव जोडले गेल्याने आणि एके – ४७ जवळ बाळगल्यामुळे. दोन विवाह फसल्यानंतर गोव्यात येऊन केलेल्या तिसर्‍या विवाहामुळे, नंतरची प्रदीर्घ न्यायालयीन लढाई, येरवड्यातला तुरुंगवास, त्यात मिळालेला आणि वारंवार मुदत वाढवली गेेलेला पॅरोल, सुटकेनंतर राजकुमार हिरानीने बनवलेला त्याचा बायोपिक… एक ना अनेक कारणांनी संजय दत्त नेहमीच चर्चेत राहिला. मध्यंतरी त्याच्यावर यासीर उस्मान लिखित चरित्रात्मक पुस्तकही येऊन गेले. संजयने त्यातील अनेक गोष्टी नाकारल्या आणि स्वतःच आपल्या आठवणी शब्दांकित करण्याचा संकल्पही सोडला. परंतु यावेळी संजय दत्तच्या वादळी जीवनावर आणखी एक पुस्तक आले आहे, ज्याचे नाव आहे, ‘संजय दत्त ः वन मॅन, मेनी लाइव्ह्ज्.’ रामकमल मुखर्जी लिखित हे कोरे करकरीत पुस्तक नुकतेच आपल्यासमोर आले आहे.

दर आठवड्याला आपण एकेका धाटणीच्या नव्या कोर्‍या पुस्तकाचे अवलोकन करीत आहोत. यावेळी आपण पाहणार आहोत या पुस्तकात काय दडलेय! स्वतः लेखक म्हणतो त्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे संजय दत्तचे आणखी एक चरित्र नव्हे. ही ‘केस स्टडी’ आहे. संजय आणि त्याच्याशी संबंधित असलेल्यांच्या आठवणी, मुलाखती, तत्कालीन कात्रणे आदींवर आधारलेले आणि त्याच्या वागण्याचा अर्थ लावू पाहणारे, लेखकाच्या मते या ‘मोस्ट मिसअंडरस्टूड मॅन’ला समजून घेऊ पाहणारे हे एक लक्षवेधी पुस्तक आहे.

संजय दत्त हा बॉलिवूडचा पहिला रॉकस्टार! सेलिब्रिटी मात्यापित्याच्या पोटी जन्मलेला. नर्गीस – सुनील दत्तचा हा मुलगा. नर्गीस म्हणजे त्या काळची विख्यात गायिका जद्दनबाईची कन्या, बेबी रानी. जद्दनबाईला कोलकाता सोडून मुंबईत स्थलांतर करावे लागले आणि नर्गीस नावाचे फूल हिंदी चित्रपटसृष्टीला लाभले.
सुनील दत्तचे खरे नाव बलराज दत्त. फाळणीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबातून आलेला. रमेश सैगलच्या ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ चित्रपटात त्याला नलिनी जयवंतसोबत भूमिका मिळाली आणि नशीब पालटले. पुढच्याच वर्षी बी. आर.चोप्रांच्या ‘एक ही रास्ता’ ने हिंदी चित्रपटसृष्टीचा रस्ता त्यांच्यासाठी खुला केला.

नर्गीस – सुनील दत्तचे प्रेमप्रकरण ‘मदर इंडिया’ च्या वेळी फुलले हे सर्वज्ञात आहे. विशेष म्हणजे नर्गीस त्या चित्रपटात त्याच्या आईच्या भूमिकेत होती! या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी एका आगीच्या दृश्यात त्याने तिला वाचवले आणि ती त्याच्या प्रेमात पडली असे लेखक म्हणतो. काही असो, या सेलिब्रिटी दांपत्याच्या पोटी जन्मलेली मुले म्हणजे नम्रता, संजय आणि प्रिया. या मुलींनी आपल्या आईवडिलांवर ‘मि. अँड मिसेस दत्त ः मेमॉयर्स ऑफ अवर पॅरंटस्’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांच्या बालपणावर प्रकाश पडतो. रामकलम मुखर्जींनी या पुस्तकात त्यातील आठवणींनाही उजाळा दिला आहे.

संजयच्या वाट्याला पित्याचे दुर्लक्ष आले आणि त्याची परिणती व्यसनाधीनतेत झाली. अमली पदार्थांपर्यंत त्याची मजल गेली. ‘रेश्मा और शेरा’ मध्ये बारा वर्षांचा संजय कव्वाली गायकाच्या भूमिकेत प्रथम पडद्यावर झळकला. पित्यासाठी तो कठीण काळ होता. पस्तीस लाखाचे कर्ज डोक्यावर होते. तरीही इंदिरा गांधींच्या सांगण्यावरून त्यांनी संजयला बोर्डिंग स्कूलमध्ये घातले. वाईट संगत सुटावी म्हणून पालकांनी आपल्याला बोर्डिंगमध्ये घातले, पण शाळेच्या मागेच अफूची लागवड व्हायची हे त्यांना ठाऊक नव्हते असे संजयने एका मुलाखतीत सांगितल्याचा दाखला मुखर्जी देतात.
नर्गीस ८० साली (पर्रीकरांप्रमाणेच) स्वादूपिंडाच्या कर्करोगाने आजारी पडल्या. त्यांना उपचारार्थ न्यूयॉर्कला नेण्यात आले. (त्याच इस्पितळात पर्रीकरांवरही उपचार झाले) तेथे सुनील दत्त आपल्या दोघा मुलींसह भाड्याचे घर घेऊन नर्गीसची रात्रंदिवस काळजी वाहण्यासाठी चार महिने राहिले. नर्गीस त्या उपचारांती काही काळ बर्‍या झाल्या. त्यांना ‘मिरॅकल लेडी’ म्हटले गेले, परंतु नंतर कोमात गेल्या आणि शेवटी ३ मे ८१ रोजी मरण पावल्या. लेखकाने त्यावेळचा एक विचित्र योगायोग नमूद केला आहे. ३ तारखेला नर्गीस वारल्या आणि ७ तारखेला संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट ‘रॉकी’ प्रदर्शित झाला. त्या प्रिमियर शोला सुनील दत्तनी नर्गीससाठी आपल्या शेजारची खुर्ची रिकामी ठेवली होती!
प्रसिद्धीच्या झगमगाटात आलेल्या संजयला व्यसनाधीनतेने घेरले. शेवटी टेक्सासच्या पुनर्वसन केंद्रात पाठवले गेले. तेथून तो बराही झाला. येथे त्याच्या आयुष्यातले एक पर्व संपते.

मुंबई बॉम्बस्फोट मालिकेशी त्याचे नाव जोडले जाणे, त्याचे गुन्हेगारी विश्वाशी उघड झालेले संबंध, एके ४७ जवळ बाळगणे आणि त्याला ‘टाडा’ लागल्या नंतरच्या सार्‍या घडामोडींचे आपण साक्षीदार आहोत. त्या सगळ्या वादळी पर्वाचे अभ्यासपूर्ण चित्रण रामकमल मुखर्जींनी या पुस्तकात केले आहे. संजय दत्तचे ते प्रकरण घडताच कॉंग्रेस पक्षाने सुनील दत्त यांना कसे झिडकारले, नेत्यांनी कसे ताटकळत ठेवले तेही लेखकाने नमूद केले आहे. संजयला लागलेला टाडा, झालेली पाच वर्षांची शिक्षा, येरवड्यातील कारावास, पॅरोलला मिळालेल्या मुदतवाढीविरुद्ध न्यायालयाचे ठोठावले गेलेले दरवाजे, प्रदीर्घ न्यायालयीन लढाईअंती त्याच्यावरील हटलेला दहशतवाद्यांची साथ दिल्याचा कलंक ह्या सगळ्या घटनाक्रमाची चिकित्साही लेखक करतो.
संजयच्या खासगी आयुष्यातील प्रेमप्रकरणे, त्याचे वादळी वैवाहिक जीवन, रिचा शर्मा, रिया पिल्ले आणि शेवटी दिलनवाज शेखचे मान्यता दत्तमध्ये झालेले रुपांतर ह्या सगळ्याची चर्चाही पुस्तकात होणे अपरिहार्य होते आणि तशी ती झाली आहे, परंतु तिला सवंगपणाचा वास नाही. केवळ चरित्रनायकाच्या जीवनाचा भाग म्हणूनच ह्या घडामोडींची चर्चा लेखकाने केली आहे.

संजय दत्त हा नावाजलेला अभिनेता होता, तसाच तो एका वलयांकित दांपत्याचा मुलगा होता, त्यात वडील राजकारणाशी जोडले गेलेले. त्यामुळे प्रसारमाध्यमांतून त्याच्या प्रत्येक कृतीची चिरफाड होणे स्वाभाविक होती आणि तशी ती झालीही. त्याच्या जीवनातील त्या सर्वाधिक वादग्रस्त आणि गंभीर कालखंडातील घटनाक्रमाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.

मुंबई बॉम्बस्फोट मालिका प्रकरणाशी आणि अंडरवर्ल्डशी नाव जोडल्या गेलेल्या संजय दत्तला निरपराधी म्हणता येईल की नाही हा अर्थातच वादाचा विषय आहे. लेखकाने त्याच्याविषयी सहानुभूती वाटावी असा अट्टहास या पुस्तकात दाखवलेला नाही हे उल्लेखनीय आहे. आपल्या कृत्याच्या गंभीर परिणामांची जाणीव नसायला संजय दत्त म्हणजे काही कुक्कुले बाळ नव्हता. त्यामुळे निर्मात्याने सहज विचारले की ‘तुला गन हवीय?’ याने होकारार्थी उत्तर दिले आणि अबु सालेमने रियाज सिद्दिकीकरवी शस्त्रे घरपोच पाठवली! शस्त्र म्हणजे तरी कसले? एके – ४७. हा पोरखेळ निश्‍चितच नव्हता. शिवाय अशा प्रकारे शस्त्रांशी खेळ मांडण्याची ही काही त्याची पहिलीच वेळही नव्हती. अब्दुल कयुम अब्दुल करीम शेखकडून त्याने दुबईत पिस्तुल घेतले होते. छोटा शकीलशी त्याच्या झालेल्या संभाषणाचा तपशील ‘आऊटलूक’ साप्ताहिकाने २००० साली प्रसिद्ध केलेला होता. त्यामुळे पुस्तकाने काहीही म्हटले असते तरी, त्याच्या या अशा बेजबाबदार कृतींचे समर्थन होऊही शकणार नाही. फक्त तो असा बेजबाबदारपणे ठायीठायी का वागला या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न लेखकाने या सार्‍या ‘केस स्टडीज’च्या माध्यमातून केला आहे. तिला त्याची वकिली म्हणता येणार नाही. अर्थात, निष्कर्ष शेवटी वाचकांनीच काढायचे आहेत. हा सारा चरित्रपट शेवटी एका महत्त्वाच्या वाक्याशी येऊन थांबतो. ‘‘संजय दत्त स्वतःला भले एक उज्ज्वल भविष्यकाळ देऊ इच्छित असेल, परंतु त्याचा भूतकाळ हा त्याच्या कहाणीतला सर्वांत रोचक भाग राहील!’’ असे लेखक म्हणतो! त्याचा भूतकाळ ‘रोचक’ आहे की नाही हा भाग अलाहिदा, परंतु हा भूतकाळ त्याची पाठ सोडणार नाही हे मात्र निश्‍चित!