रातराणी

0
1125
  •  पौर्णिमा केरकर

अवखळ, चंचल, मुसमुसणारे तारुण्य अंगप्रत्यंगातून सळसळून वाहात असलेली एखादी यौवना
सहवासात यावी, तिच्या नुसत्या दर्शनानेच घायाळ होऊन उठावे आणि मनाला गंधित श्‍वासांची धुंदी चढावी… ‘रातराणी’ खरंच रात्रीची राणीच!

बालपणी मी अनुभवलेले अंगण विविध प्रकारच्या सुगंधित फुलझाडांनी भरलेले होते. गुलाब, जाई, जुई, मोगरी, भुईचाफा अशी कितीतरी फुले होती. इतरही गंधहीन फुलझाडांचा आकर्षक डौल अंगण सुशोभित करायचा. या सर्व फुलझाडांच्या गोतावळ्यात एक झाड, तेसुद्धा अतितरल, काहींना तर एकदमच मादक गंधाचे वाटणारे. ते मात्र नव्हतेच. त्यामुळे कुठेतरी कसली तरी कमतरता आहे, हे मनाला सतत जाणवायचे. ते झाड होते रातराणीचे!

सगळेच सहज उपलब्ध असलेल्या फुलझाडांनी अंगण भरलेले, पण रातराणीच का नसावी? प्रश्न तर बर्‍याच वेळा पडायचा. विचारले की उत्तर मिळायचे, रातराणीला अंगणात स्थान नाही. कारण तिचा सुगंधच एवढा तीव्र की त्याचा मागोवा घेत घेत जहरी साप कधी येऊन तिला विळखा घालेल हे नाही सांगता येणार! जिथे जिथे रातराणी फुलते तिथे तिथे साप हमखास येतोच. आणि या एका भीतीनेच आमचे कायमच फुलांनी बहरलेले अंगण रातराणीचा बहर मात्र अनुभवू शकले नाही. त्यावेळी खूप वाईट वाटायचे. पण नंतर नंतर मनाची समजूत घालून घेतली. फुलांच्या ओढीने रात्रीच्या अंधारात कोणी घरातील व्यक्ती फुलं तोडण्यासाठी गेली आणि तिला सापाने दंश केला तर…? त्यापेक्षा नकोच ते झाड, असे म्हणून बळेबळेच मनाला शांत केले. तरीही त्या मादक तीव्र गंधाने अजूनही साथ सोडली नाही.

रातराणी फुलली की तिचा शोध मुद्दाम घ्यावा लागतच नाही. इतर सुगंधित फुलांपेक्षा कितीतरी दूर अंतरावर ती आपल्या गंधित श्वासाने रसिक मनाला घायाळ करून सोडते.

फुलांची, त्यातही सुगंधित फुलांची एक धुंदी रसिक मनावर असतेच असते. रातराणीच्या झाडाला सापाच्या विळख्याची भीती असल्याने बर्‍याच जणांची अंगणे या नाजूक फुलांच्या झाडापासून वंचित राहिली असावी. अन्यथा एवढी नाजूक फुले… तिचा एकूणच रुबाब सर्वांना हवाहवासा वाटणारा होता. असे असले तरी कुठेतरी एखाद्या टुमदार घराच्या आखीव रेखीव बागेत मात्र हे झाड हमखास दिसणार. रातराणी गंधाची सम्राज्ञी… फुले बारीक. पांढर्‍या रंगाची. नाजूक चणीची. सडपातळ बांध्याची तरुणी जशी. तिन्हीसांजा होऊ लागलेल्या आहेत. नुकताच बरसून गेलेला पाऊस, वातावरणातील ओलावा तनामनाला वेढून एक श्रांतता देतो. काळोख तर आताच कोठे जाई, जुई, मोगर्‍याच्या सुगंधाला सोबतीला घेऊनच घरात प्रवेशतो. ती वर्दी असते, तिन्हीसांजा झाल्या याची. आता रात्र होणार. दुपारपासून वातावरणात काहीसा आळशीपणा भरून राहिलेला असतो. आळसाची ती पेंग भेदून टाकीतच हे नाजूक सुगंध हलके हलके उंबरठ्याच्या आत आपला शिरकाव करून घेतात. फुलांना जन्म देणार्‍या झाडांना तसेच फुलांचे अप्रूप घेऊन वावरणार्‍या पानांना यावेळी मुद्दाम अनुभवायचे. खूप अभिमान जाणवतो त्यांना अशा फुलांना जन्म दिला याचा. तिन्हीसांजेला घरादाराला वेढून राहिलेला हा सुगंध सगळ्यांनाच सुगंधित करून टाकतो हे मात्र नक्की! जाई, जुई, मोगरीचा गंधच असा अलवार की तो अगदी स्पर्शून जातो तनामनाला.

शांतचित्ताने या गंधाना आत आत पुरते मुरवून घेताना वेळेकाळाचे भान राहताच नाही. अशावेळी मग सडसडून जाग येते ती सर्वच नाजूक सुगंधांना मागे सारून धसमुसळेपणाने रस्त्यावरून जाणार्‍याना, घरातल्यांना, आसपासच्या परिसरातल्याना आपल्या शुभ्र फिक्या उत्तेजित गंधाने घायाळ करून प्रवेषणारा रातराणीचा गंध एक झटक्यात स्वतःकडे लक्ष वळवून घेतो. रातराणी छोटेखानी झुडुपावर विराजमान होणारी. जाई-जुईची कोमलता तिच्यात नाही. तिची फुले जुईच्या फुलांशी जरी साम्य दाखवीत असली तरीही नाही. बकुळीचा गंध मनाला मोहिनी घालतो तो खानदानी अदब ठेवूनच. मोठ्या वृक्षांची छोटीशी चांदणफुले… निगर्वी, सहजपणे ओघळणारी, मातीत मिसळून माती सुगंधित करणारी. ओंजळीत धरली की ओंजळीला भरभरून सुगंधित दान देणारी. पण कसला माज नाही की कोठेही अरेरावी नाही. सहजपणे जीवनाचा स्वीकार केलेली. हा खानदानी संस्कारही रातराणीकडे नाही. शेवंतीचे सदासतेज असणे, अबोलीची शालीनता या सर्वच गुणांपेक्षा रातराणी थोडीशी नखरेलच वाटावी. अर्थात तिचा नखरा हेच तर तिचे असे खास वेगळे पण आहे. म्हणून तो खपूनही जातो. या अनिवार गंधाला स्वतःची एक धुंदी आहे. तो मत्त गंध बेहोष करतो. धुंदीत राहायला लावतो. बर्‍याच जणांना हा गंध आवडत नाही. तिच्या उन्मत्त सुगंधाने मस्तक भणाणून जाते. खरं तर खूप नाजूक असतात ही फुले… माळायची म्हटली तरी ती माळता येत नाहीत. छोट्या फुलांचा गंध मात्र मादक. सहजपणे पाठ न सोडणारा. अवखळ, चंचल, मुसमुसणारे तारुण्य अंगप्रत्यंगातून सळसळून वाहात असलेली एखादी यौवना
सहवासात यावी, तिच्या नुसत्या दर्शनानेच घायाळ होऊन उठावे आणि मनाला गंधित श्‍वासांची धुंदी चढावी… रातराणी खरंच रात्रीची राणीच! हे मनाला पटलेच. त्या रसिकमनाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे ज्याने या फुलझाडाचे नाव रातराणी ठेवले. त्याच्या रसिकत्वाची दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.
रात्रीच्या चंदेरी दुनियेत या फुलांचा सुगंध जीवनच खूप आनंदी करून टाकतो. मसाल्यातील लवंगाचा जसा आकार तशाच प्रकारे पण जरा आकाराने मोठी असलेली ही फुले टवटवीत हिरवेपणावर पांढुरक्या गुच्छाने बहरून येतात. बहरण्याचा कार्यकाळ तिन्हीसांजेचा.

वाढती रात्र सुगंधाला सोबत घेऊनच सर्वत्र पसरते. चढत्या रात्रीतसुद्धा हा सुगंध एखाद्या विश्वासू सारथ्याप्रमाणे सोबत करतो. दुधाळ रंगाची ही कोवळी नाजूक फुले कधीकधी तर फिकट पिवळा रंग घेऊन गंधाशी साम्य साधीत रात्रीला रंगेल रसिकत्वाची देणगी देते. सरळ देठ, त्यावरचे टपोरे फुल रात्रीच्या निबिड काळोखातही पटकन नजरेत भरून उरते. रातराणी गंधाचे फवारेच उधळत असते. ती योजनगंधा… प्रमत्त, कामिनी, स्वतःवरच लुब्ध झालेली… चांदण्याचे चिरतारुण्य तिला लाभलेले. आभाळ लक्ष लक्ष नक्षत्रांनी जेव्हा भरून जाते तेव्हा रातराणीकडे पाहावे. नक्षत्रेसुद्धा क्षणिक निर्जिव भासतील पण ही फुले मात्र तुम्हाला आतून आतून साद घालतील. फुलं अशी कशी कोण जाणे, सतत ओढ लावतात, खेचून घेतात, धुंदीत, स्वतःच्या मस्तीत कसे मस्त जगावे हे शिकवतात. कविवर्य विष्णू वाघ यांनी पर्यटकांना गोव्यातील संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही गोव्यात या असे कवितेतून निमंत्रित केलेले आहे. बरेच पर्यटक गोव्यात येतात, परंतु इथली मूळ संस्कृती न
अनुभवताच गोव्याला बदनाम करतात. म्हणूनच कवी आपल्या मैत्रिणींना कवितेतून आवाहन करताना रातराणीचा संदर्भ देत म्हणतात-
संस्कृतीशी तुझी कायमची नाळ जुळावी
अन् या मातीतले संपूर्ण सत्त्व तुझ्या रक्तात रुजावे
तुझ्या ओठावर फुलून याव्यात धालांच्या ओव्या
अन् फुगडीची गाणी, नि तुझ्या शब्दाला लगडावी रातराणी
अशी ही रातराणी सळसळणार्‍या चैतन्याला मन मुक्तपणे कवटाळणारी.