‘‘संस्कार’’

0
393

– स्वप्नील पर
जीवन जगताना अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. राग, लोभ, मत्सर, असूया अशा अनेक भावनांच्या विळख्यात आपण अडकून पडतो. पण प्रत्येक प्रसंगात मनावर उमटलेले हे ओरखडे किती काळ आपल्यासोबत राहतील हा साधासा विचार आपल्याला सुचत नाही. राग राग करताना किंवा चिडचिड करताना संयम धरून ठेवता येत नाही. आपल्या जिवाचे, आपल्या भावकोषाचे आपण कायमस्वरूपी असं काही नुकसान करतो आहोत का? हा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. आपल्यातले जे पालक आहेत किंवा कोणा लहान मुलांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, असे लोक जागरूक असणं जास्त महत्त्वाचं. शाळा शिक्षक, कला शिक्षक, सिने-दिग्दर्शक यांनीदेखील विचार केला पाहिजे की, ङ्गार उन्मत्त हिरो, त्याचा टोकाचा तिरस्कार इत्यादींचं चित्रीकरण सादर होतं, तेव्हा हिरोचं अयोग्य वागणं हेच शेवटी लहान मुलांसाठी रोल मॉडेल बनते आहे का? पूर्वी टीव्हीवर ‘शक्तिमान’ ही मालिका लागायची. ती इतकी लहान मुलांत प्रसिद्ध होती, की जेवण खाणे सोडून ती मालिका बघितली जात होती. शक्तिमान उंचच उंच इमारतीवरून उड्या टाकायचा, आणि क्षणात गायब व्हायचा. संकटात सापडलेल्यांना तो सोडवायला यायचा. आमच्याकडच्या बंड्यावर त्याचा भारी प्रभाव पडला. शक्तिमान सोडवायला येईल, म्हणून त्याने चक्क बांधलेल्या उंचच उंच टाकीवरून खाली उडी टाकली. पायाचे हाड मोडले पण शक्तिमान काही सोडवायला आला नाही, पण बापाने शक्तीमानाचे रूप धारण करून पाठीवर आणखी चार धपाटे घातले. घरातील बायकांना तर सिरियल बघण्यापलीकडे काही कामच नसते. सिरियलसाठी त्या जेवण पटापट आटोपतात. ‘होणार सून मी…,’ ‘जावई विकत घेणे…’, ‘कां रे दुरावा…’, वगैरे वगैरे…
या मालिकांत त्या एवढ्या रममाण होतात, की त्यांच्यावर तेच संस्कारच होतात. काही मालिकांतील मुख्य भूमिका करणारे त्यात चार वेळा मरतात, पुन्हा जिवंत होतात, कसे, कुणास ठाऊक! एका प्रामाणिक मुलीचा जर त्याच मालिकेत छळ होत असेल तर, बघणार्‍या आमच्या बायकांच्या डोळ्यांत अश्रू दाटतात. एकवेळ नवर्‍याला काही झालं तर रडणार नाही, पण या मालिका बघून त्या खूप भावुक होतात. तेव्हा नवीनच ‘माहेरची साडी’ चित्रपट आला होता. मी आणि माझी आजी आणि शेजारचे दोघे मित्र असे मिळून थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यास गेलो होतो. चित्रपट ऐन रंगात आलेला. सासू अलका कुबलला वांझोटी म्हणून हिणवते. त्यानंतर विहिरीत ढकलते. या सिनेमाला आमच्याबरोबर आलेल्या आजीबाई एवढ्या रडल्या की त्यांना गप्प करण्यात अर्धा तास गेला. त्या धाय मोकलून रडत होत्या. आम्हांला मात्र हसू आवरत नव्हतं. चित्रपट संपल्यावर ‘अशी सासू कुणाला मिळू नये,’ म्हणत त्या भूमिका साकारणार्‍या व्यक्तीलाच शिव्याशाप देत आजीबाई बाहेर पडल्या. ती सासूची भूमिका करणारी अभिनेत्री आज दुसर्‍या कुठल्याही कार्यक्रमात जरी चांगल्या भूमिकेत असली तरी आमची आजी तिला शिव्याच देते.
आजकाल मुलांवर आपण काय संस्कार करतो? ती रडली की टीव्ही लावून देतो. पैशापुढे आपल्याला त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळच नसतो. आजकाल एवढे अश्‍लील चित्रपट आलेले आहेत, की राजरोसपणे ते टीव्हीवर दाखवितात. आणि विशेष म्हणजे असे चित्रपट सहकुटुंब, सहपरिवार पाहतात. मग मुलेही तोकड्या कपड्यांची मागणी करतात. जीन्स आणि अर्धवट फाटलेल्या कपड्यांचे आकर्षण एक फॅशन म्हणून असते. बिअर आणि सिगरेट हे प्रत्येक चित्रपटात दिसणारे हमखास दृश्य. यामुळे मुलांवर विपरीत परिणाम होतातच. जाहिरातींचाही पगडा किती असतो बघा, ‘अरे भैय्या ये दिवार टूटती क्यो नहीं…?’ ही जाहिरात बघून आमच्या बंड्याने चार पाच मुलं गोळा केली आणि एक लाकडी ओंडका घेऊन आमच्या मांगराच्या भिंतीवर मारला. आधीच भिंत पडायला आली होती, त्यात जोर दिल्यावर ती भिंत कोसळली. नशीब त्याखाली कुणी सापडलं नाही!! टीव्हीमुळे संस्कार काही प्रमाणात नष्ट झाले, या मताशी मी सहमत आहे. आज मुलांवर काय संस्कार असतात, त्यांच्यातील हुशारी, रूबाबदारपणा, ऐशआरामी जीवन आणि अहंकारी वागणं यातून संस्कार कुठच्याकुठे लोप पावले आहेत. पारंपरिक रूढी आणि बंधनात आजची पिढी राहू शकत नसली तरी त्यांच्यातील चांगल्या संस्कारांचा अंगीकार करू शकते. आज मुलांना शाळेत जाण्यासाठी गाडी पाहिजे. खर्चासाठी पैसे. पूर्वी प्राथमिक शाळेत गुरुजींचा धाक असायचा. आज ‘मास्तर तुम्ही सुद्धा’ असे म्हणण्याची पाळी आली आहे. काही ठिकाणी मास्तरच मस्तीखोर असतो. शिस्तीसाठी एखादी काठी हातावर मारली की पालक संघ जागा होतो. मास्तरांची बदली करण्यासाठी बैठका लावतात. ही शिस्त मुलांना लावताय की शिक्षकांना? आजकाल घरून काय अभ्यास करून आणलाय हे मुलांना विचारायलाच नको, ती डायरेक्ट शिवीगाळच देतील. हे संस्कार कुणी केले? आईबापांनी लाडात वाढवलेली पोरं शाळेत संस्कारांची पायमल्ली करताना दिसतात. दिवस ढकलायचे, आपल्याला काय पगार मिळतोय म्हणून शिक्षक गप्प बसतात. मग शिक्षकच चांगले नाहीत… अशी ओरड होते. आपल्या मुलांना कुणी दोषी धरत नाही. आज काल पाचवीत मुलगा गेला की त्याला मोबाईल पाहिजे. नाहीतर आकाशपाताळ एक करेल तो. २ जीबी किंवा ४ जीबीचं मेमरी कार्ड घालायचं आणि मस्त कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत बसायचं. कुठली तर ती रोमॅन्टीक गाणी. मित्र, मैत्रिणींचे फोननंबर टाकायचे, त्यांना मिसकॉल करायचा, असे करता करता दहावीपर्यंत त्यांचे ‘नेटवर्क’ जुळलेलेच असते. मग मुलांना आवरणे कठीणच असते. अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही. शिक्षकांनी जर सांगितले, ‘उद्या शाळेत येताना आई किंवा वडिलांना घेऊन ये’. पण आजकाल ते दोघेही रिकामे थोडेच असतात. त्यांना याचा राग येतो. ते उलट शिक्षकालाच बोलताना दिसतात. आमच्या गावातील हायस्कुलात गणित विषय शिकविण्यासाठी एक शिक्षिका आल्या होत्या. तशा त्या शिकविण्यात ‘स्मार्ट’च होत्या. दिसायलाही सुंदर. त्यांची शिस्त कडक होती. अभ्यासात कुणी हयगय केली तर वेतीच्या काठीने बडवायच्या. हातावर वळ उठायचे. डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहायचे नाहीत. गणित काही चुकायचे नाही. पण गावात आंबटशौकीन विद्यार्थी होतेच. आजकाल गुरुजनांचा मान राखला जातोय कुठं? ‘गुरु परमात्मा परेशू’ हे पुराणात झालं. कलियुगात गुरूला काहीच स्थान राहिलेलं नाही. चार – पाच विद्यार्थ्यांनी बाईंना ‘घरी क्लास घेता काय..? विचारलं. बाई तयार झाल्या. पण त्यांची बुद्धीच भ्रष्ट. पालकांना वाटले मुलं सुधारली. म्हणून स्वखुशीने महिन्याची फी काढून दिली. पण मुलांचे लक्ष बाईंच्या रूपावर! तिथे जाऊनसुद्धा त्यांना काही येईना. रोज वेताच्या काठीचा मार बाईंच्या घरीही खात होते आणि शाळेतही. एक दिवस त्यातील दहावीच्या एका मुलाने बाईंवर लाइन मारली. त्याला बाईंनी असे बदडले, दोन दिवस तो इस्पितळात ऍडमिट होता. शेवटी बाईंनाच गाव सोडावे लागले. म्हणजे संस्कार करणार्‍यांवर वाईट संस्कार होण्याची पाळी आज आली आहे. खरं तर जीवनक्रमामध्ये बदल आणण्याची आज गरज निर्माण झाली आहे. पुन्हा एकवार मूल्यशिक्षण, खरेखुरे संस्कार आणि आपल्यातील जीवन शक्तीचं संगोपन यावर आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये भर देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नाहीतर शरीर सुटेल परंतु राग, लोभ, मत्सर, असंतुष्टता हे मात्र आपली पाठ सोडणार नाहीत!!