Home Featured उपराष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक; एनडीएच्या उमेदवाराचे पारडे जड

उपराष्ट्रपतिपदासाठी आज निवडणूक; एनडीएच्या उमेदवाराचे पारडे जड

0

उपराष्ट्रपतिपदासाठी आज (दि. 9) निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्य मतदान करतील. संसदेत सध्याचे संख्याबळ आणि राजकीय पक्षांची भूमिका यातून एक दिवस आधीच निकालाचे संकेत मिळत आहेत. संख्याबळाचे बोलायचे झाले, तर सत्ताधारी एनडीए आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचे पारडे जड मानले जात आहे. विरोधकांचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्या बाजूने सध्यातरी फार संख्याबळ नाही.

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी संसदेचे सदस्य गुप्त मतदान करणार आहेत. शिवाय यासाठी कुठलाही व्हिप जारी करण्याची तरतूद नाही. याचा अर्थ खासदार ज्याला वाटेल, त्या उमेदवाराला मर्जीने मतदान करू शकतात. परंतु सामान्यपणे खासदार त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या भूमिकांचे समर्थन करून मतदान करत असतात. त्याचबरोबर अशा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंतिम निकालाचा तंतोतंत अंदाज लावणे कठीण आहे. त्यातच एनडीए असेल वा इंडिया आघाडी यांच्या घटक पक्षात वेगवेगळे स्टँड घेतलेले दिसून येतात. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे.
सत्ताधारी पक्ष म्हणजेच एनडीएचे दोन्ही सभागृहात एकूण 425 खासदार आहेत. याशिवाय आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षानेही राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला आहे. वायएसआर काँग्रेसचे संसदेत 11 खासदार आहेत. याचा अर्थ एनडीएच्या समर्थनात 436 मते येऊ शकतात. त्यामुळे आकडेवारी पाहता राधाकृष्णन यांचा विजय निश्चित दिसत आहे.

संसदेतील 10 खासदार कोणत्या बाजूने झुकतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय लोकसभेत सात अपक्ष खासदार आहेत, ते कोणत्या बाजूने झुकतील हे स्पष्ट झालेले नाही. त्याचप्रमाणे अकाली दल आणि मिझोरामच्या झेडपीएमबद्दल अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. त्यांचे प्रत्येकी एक खासदार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्या मतांचा विचार केला तर कागदावर हा आकडा 324 च्या पुढे जात नाही. म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या 436 आणि विरोधी पक्षाच्या 324 मध्ये 112 मतांचा मोठा फरक आहे. जरी अकाली दल, झेडपीएम आणि सात अपक्षांची मते सुदर्शन यांच्या बाजूने पडली तरी ते जादुई आकड्यापेक्षा खूप मागे राहू शकतात. ही सर्व मत एकाच बाजूला जातील हे सांगणे खूप कठीण आहे. आता क्रॉस व्होटिंगवर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातही एनडीएला फक्त राज्यसभेतील राधाकृष्णन यांच्या बाजूने 150 खासदारांचे क्रॉस-व्होटिंग अपेक्षित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता सध्या तरी फार दूर वाटत आहे.

जिंकण्यासाठी 386 खासदारांची गरज
सध्या लोकसभेत 542 तर राज्यसभेत 239 खासदार आहेत, म्हणजे एकूण 781 खासदार मतदान करतील. या निवडणुकीत विजयासाठी 391 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यातच निवडणुकीच्या एक दिवस आधी बीजेडी पक्ष आणि भारत राष्ट्र समिती पक्षाने मतदानापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदान करणाऱ्या खासदारांची संख्या 770 इतकी झाली आहे. त्याचा अर्थ विजयी उमेदवाराला जिंकण्यासाठी 386 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

दोन पक्ष मतदानापासून दूर
उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीला केवळ एक दिवस शिल्लक असतानाच, देशातील दोन मोठ्या पक्षांनी या निवडणुकीपासून दूर राहण्याचा अथवा तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. एक म्हणजे, नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल (बीजेडी), तर दुसरा म्हणजे, के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस). महत्वाचे म्हणजे, राष्ट्रीय पातळीवर हे दोन्ही पक्ष सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीचा भाग नाहीत.