जिवंत वीजतारेच्या स्पर्शाने सत्तरीत दोघांचा मृत्यू

0
124

खोडये-अडवई (सत्तरी) येथील एका ऊसाच्या बागायतीत तुटून पडलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने त्याच्या धक्क्याने तेथील दोन कामगारांचा मृत्यू झाला. काल सकाळच्या या दुर्घटनेत रामू नाईक (वय ५३, हळकर्णे-महाराष्ट्र) व सुनिता आपाजी नाईक (वय ४१, निपाणी-कर्नाटक) या दोघांचे निधन झाले. सुनिता नाईक ही या बागायतीत गेली दहा वर्षे काम करीत होती. तर रामू नाईक हा अलीकडेच तेथे कामासाठी आला होता.

ऊस बागायतीत रानडुक्कर येत असल्याने त्यांना बागायतीतून हाकलण्यासाठी सकाळी फटाके लावले जात होते. काल सकाळीही फटाके लावण्यासाठी कामगार गेले असता ही घटना घडली. ऊस बागायत प्रसाद गाडगीळ यांच्या मालकीची असून त्या बागायतीतून ३३ केव्ही वीजवाहिनी गेली आहे. त्या वीजवाहिनीची वायर तुटून ऊस बागायतीत पडली होती. ती वायर त्या दोघांनाही न दिसल्यामुळे त्यांना त्या ३३ केव्ही वीजवाहिनीचा धक्का बसला व त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. रात्री ती वायर तुटल्यामुळे पुढील गावांना वीजपुरवठा बंद होता.
काल सकाळी वीजपुरवठा खंडित असल्यामुळे वीज कर्मचारी त्या ठिकाणाहून जात असताना त्या दोघांचे मृतदेह दिसले व त्यानंतर त्याची माहिती वरिष्ठ वीज अधिकार्‍यांमार्फत पोलिसांना देण्यात आली. वाळपईचे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाळणी यांनी पंचनामा केला. त्यानंतर वीज खात्याचे मुख्य अभियंता नीळकंठ रेड्डी उपअभियंता ए. पी. जॉन सहाय्यक अभियंता सालेलकर यांनी त्या ठिकाणी भेट दिली. मृतदेह त्यानंतर गोमेकॉत पाठविण्यात आले.

वीज वाहिन्या तुटणे चिंताजनक
सत्तरी-तालुक्यात ज्या वीजवाहिन्या आहेत त्या गेल्या अनेक वर्षांपूर्वी घालण्यात आल्या आहेत. त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात त्या अनेक ठिकाणी तुटून पडतात. ती गोष्ट अत्यंत चिंताजनक असून त्या बदलण्याची अत्यंत गरज आहे.