जागल्या

0
136

निर्भीडपणा आणि परखडपणा काय असतो याचे उत्तम उदाहरण म्हणून ज्यांच्याकडे पाहावे असे हाडाचे शिक्षक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आणि लेखक श्री. र. वि. जोगळेकर आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांची वाणी आणि लेखणी या उतारवयातही अत्यंत रोखठोकपणे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कडाडायची. नुकतेच त्यांनी एका बड्या साखळी वर्तमानपत्राच्या प्रमुख संपादकांना शिंगावर घ्यायचे ठरवले होते आणि त्यांच्याविरुद्ध एक खणखणीत लेख लिहून तो प्रसिद्ध करण्याची विनंती फोनवरून करून लेख नवप्रभाकडे पाठविण्याची तयारी चालवली होती. परंतु लेख आमच्याकडे पोहोचण्यापूर्वीच जोगळेकर यांचे निधन झाले. लक्षात राहिली ती त्यांची शेवटपर्यंत टिकलेली तडफ आणि स्पष्टवक्तेपणा. वैयक्तिक लाभासाठी सत्ताधीशांची हांजी हांजी करण्याच्या आजच्या युगामध्ये जे आपल्या मनाला रुचेल आणि विचारांना पटेल ते स्पष्टपणे आणि बोचर्‍या, टोकदार शैलीत मांडणारे जोगळेकर सर हा त्यांचे परमदैवत असलेल्या लोकमान्य टिळकांनी वर्णिलेला समाजातील एक ‘जागल्या’ होता असेच म्हणावे लागेल. एका सदैव सजग, जागृत नागरिकाला आपण मुकलो आहोत. ते पेशाने शिक्षक. परंतु हा वसा पोटार्थीपणाचा नव्हता. विद्यादानाच्या क्षेत्रामध्ये केवळ अध्यापनाचे नव्हे, तर विद्यार्थी घडवण्याचे, उद्याचे नागरिक घडवण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे या प्रेरणेने त्यांनी या क्षेत्रात तळमळीने काम केले. आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये उत्तमोत्तम वक्त्यांना पाहुणे म्हणून आणून विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवण्याची त्यांची धडपड असे. आपले विद्यार्थी केवळ ‘विद्यार्थी’ राहू नयेत, तर ते ‘ज्ञानार्थी’ बनावेत अशी त्यांची तळमळ होती. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या आणि आकलनाच्या कक्षा रुंदावाव्यात यासाठी त्यांनी सदैव अविरत प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शारीरिकदृष्ट्याही मुले सुदृढ बनायला हवीत असा त्यांचा आग्रह असे. शारीरिक शिक्षणातील ते एक तज्ज्ञच होते. कबड्डीसारख्या देशी खेळांना गोव्यात लोकप्रिय करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. आपल्या या तळमळीपोटी देशी खेळांविषयीच्या अनास्थेविरुद्ध आणि राज्यातील पोहण्याच्या तलावांच्या दुःस्थितीबाबत ते सतत आवाज उठवीत आले होते. सामाजिक व राजकीय भान असल्याने जोगळेकर राजकारणातही सुरवातीच्या काळात सक्रिय होते. भारतीय जनसंघाचा दीपक गोव्यात तेजाळावा यासाठी ज्या मोजक्या व्यक्तींनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि सामाजिक अवहेलना सोसून निष्ठेने काम केले, त्यात जोगळेकर होेते. पुढे त्यांचे जनसंघातील इतर मंडळींशी काही तात्त्विक मुद्द्यांवरून बिनसले आणि मानहानीकारक स्थितीत त्यांनी पक्षालाच नव्हे, तर त्या विचारधारेलाही रामराम ठोकला. त्यांचे त्यावेळचे एक सहकारी माधव धोंड यांचे निधन झाले तेव्हा जोगळेकरांनी त्या दिवसांच्या आठवणींना नवप्रभेतून उजाळा दिला होता. दरवर्षी एक ऑगस्टला लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीदिनी नवप्रभेसाठी लोकमान्यांवर लिहिण्याचा परिपाठ त्यांनी अनेक वर्षे सुरू ठेवला होता. परंतु हे अशा प्रसंगी सहसा प्रसिद्ध होतात तसे केवळ टिळकांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट मांडणारे बाळबोध लेख नसायचे. कधी टिळकांनी चिरोल खटल्याच्या निमित्ताने तेरा महिने इंग्लंडला असताना ‘केसरी’साठी पाठवलेल्या बातमीपत्रांचा माग काढायचा, कधी कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणाची तथ्ये मांडायची, कधी टिळकांच्या ज्ञानप्रवासी वृत्तीचे विश्लेषण करायचे अशा लोकमान्यांच्या विविध अज्ञात पैलूंवर समग्र प्रकाश टाकणारे हे माहितीपूर्ण लेख असत. त्यावर येणार्‍या प्रतिक्रियांनाही ते सप्रमाण उत्तर देत. हा त्यांच्या विलक्षण अभ्यासूवृत्तीचा परिपाक होता. नवप्रभेच्या अग्रलेखांवर कौतुकाची प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी त्यांचे अधूनमधून आवर्जून फोन येत. अलीकडे वयोमानामुळे त्यांना फोनवर नीट ऐकू येत नसे. त्यांना लिहिण्याचाही त्रास होई, परंतु आपल्याला पूर्वीसारखे लिहिणे आता जमत नाही, हात कापतो ही खंत ते व्यक्त करीत असत. जोगळेकर सरांचे आजवरचे बहुतेक लेखनही बव्हंशी नवप्रभेतूनच झाले. त्याचा एक लेखसंग्रह प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस होता आणि त्यासंदर्भात त्यांचा काही दिवसांपूर्वीच फोनही येऊन गेला होता. आपण आजवर जे काही लिहिले, त्यातले थोडे फार तरी नव्या पिढीला वाचायला मिळावे या प्रेरणेने त्यांनी या पुस्तकात रस घेतला. लवकरच हे लेखांचे संकलन पुस्तकरूपानेही येईल. परंतु त्यावेळी जोगळेकर सर नसतील. समाजाच्या भल्यासाठी प्रसंगी कडू डोस पाजण्यासाठीही आपली लेखणी आणि वाणी चालवणार्‍या, परंतु इतरांशी मतभेद असले तरी मनभेद न ठेवणार्‍या या परखड समाजकार्यकर्त्याची उणीव या गोमंतकाच्या सामाजिक जीवनात काही काळ तरी नक्कीच जाणवत राहील.