धारगळ येथे बस उलटून २१ प्रवासी जख

0
104

>> खड्डेमय रस्त्यामुळे दुर्घटना

>> दैव बलवत्तर म्हणून प्रवासी बचावले

महाखाजन, धारगळ येथे महामार्गावर हरमल-पेडणे मार्गावरील जीए-०२-टी-४७४६ क्रमांकाची बस उलटून झालेल्या भीषण अपघातात सुदैवाने २१ प्रवासी जखमी होऊन बचावले. हा अपघात काल दुपारी १२ वाजता झाला. जखमींपैकी दोघाजणांवर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू असून इतरांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. रस्त्यावरील खड्‌ड्यांमुळे समोरील दुचाकीचालकांना वाचविण्याच्या प्रयत्नात बसला अपघात झाला. या दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग – १७ वरील वाहतूक दीड तास खोळंबली होती.
महाखाजन – धारगळ ते कोलवाळ पुलापर्यंत महामार्गाला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने रस्ता वाहतुकीला धोकादायक बनला आहे. उतरणीवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून समोरून दोन दुचाकी वाहने खड्डे चुकवत येत होती. त्यांना वाचवण्याच्या नादात प्रवासी बस रस्त्याच्या कडेला गेली आणि घळीत उलटली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे बसमधील प्रवाशांनी एकच आरडाओरड सुरू केली. बसला अपघात घडताच जवळपासचे रहिवासी तातडीने मदतीला धावून आले. त्यांनी जखमी प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचे मदतकार्य सुरू केले. स्थानिकांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केल्याने प्रवाशांना थोडा धीर आला. काही युवकांनी आपत्कालीन १०८ व अग्निशमन दलाला फोन करून बोलाविले. त्यानंतर १०८ रुग्णवाहिका व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
बसमधील प्रवासी जखमी
या दुर्घटनेत बसमधील प्रवासी वसंत नीळकंठ नाईक (अमेरे पेडणे), परेश उत्तम परब, अलका अमेरकर (खारेबंद – पेडणे), ताहिरा, प्रीतम केसरकर (बांदा), शर्मिला सावळ (केरी – पेडणे), सोनिया नार्वेकर (न्हईबाग – पेडणे), नितीन गवंडी (देवसू – कोरगाव), योगिता रेडकर (सातार्डा), सारिका तांबोस्कर (नागझर), चैत्राली देसाई (भिरोणे – पेडणे), राजेंद्र कोनाडकर (ओशेलबाग धारगळ), यामिनी गावडे (मयडे – म्हापसा), प्रतिमा गोसावी (देवूलवाडा – कोरगाव), ओमकार फडते (सातार्डा – महाराष्ट्र), सरूबाई (महाराष्ट्र), पूजा तळकर, प्रतिभा केसरकर (बांदा), वामन रावळ (कारवार), बासुदास चव्हाण (पोरस्कडे) व स्वप्निल पाटील हे जखमी झाले.
लमाणी महिलांचा चोरीचा प्रयत्न
दुर्घटनाग्रस्त बसमध्ये सहा लमाणी महिला प्रवास करीत होत्या. अपघात झाल्यानंतर प्रवाशांचे किमती सामान, भ्रमणध्वनी ऐसपैस पडले होते. ते गोळा करून बसमधील लामाणी महिला प्रवासी पळण्याच्या तयारीत होत्या. स्थानिकांच्या लक्षात हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लमाणी महिला प्रवाशांना पकडून पोलिसांच्या हवाली केले.
अग्निशमन दलाची तत्परता
या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक महेश गावकर सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्परता दाखवीत जखमींना दुर्घटनाग्रस्त बसमधून बाहेर काढत इस्पितळात नेण्यास मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलीच धाव घेत जखमींना बाहेर काढले. अपघातानंतर सुमारे दीड तास राष्ट्रीय महामार्ग १७ वरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. सर्वांना जाण्याची घाई त्यात भर म्हणून रस्त्याला खड्डे पडल्याने त्यातून मार्ग काढताना वाहतूक कोंडीत आणखी भर पडली होती. शेवटी पोलिसांना दीड तासांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.