राज्यात ‘स्वाइन फ्लू’मुळे यंदा ८ जणांचा मृत्यू

0
92

जानेवारी ते चालू ऑगस्ट महिन्यापर्यंत राज्यात ‘स्वाइन फ्लू’मुुळे ८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य संचालनालयातील साथीच्या रोगांचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी काल दिली. वरील काळात स्वाईन फ्लूचे १७३ रुग्ण राज्यात आढळल्याचे ते म्हणाले. मृत्यूमुखी पडलेले वरील ८ रुग्ण सोडल्यास अन्य सर्व रुग्ण औषधोपचारानंतर बरे झाल्याचे डॉ. बेतोडकर यांनी सांगितले.
गेल्या शनिवारी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी ‘स्वाइन फ्लू’मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. तोपर्यंत जानेवारी ते १८ ऑगस्टपर्यंत स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७ एवढी होती, असे त्यांनी नमूद केले. निरोगी लोकांना स्वाईन फ्लूपासून धोका नसल्याचे सांगताना ते म्हणाले की, मधुमेही, दम्याचे रुग्ण तसेच फुफ्फुसांचे आजार व अन्य गंभीर आजारांमुळे प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्तींना जर स्वाइन फ्लू झाला तर त्यांच्या जीवाला धोका असतो. सर्दी व स्वाईन फ्लूची लक्षणे सारखीच असल्याचे सांगून त्यामुळे सर्दी झालेल्या व्यक्तींनी स्वाईन फ्लूसाठी तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. संशयित रुग्णाचे रक्ताचे नमुने काढून ते तपासणीसाठी मंगळुरू येथील एमसीयूआर प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
औषधांचा मुबलक साठा
‘स्वाइन फ्लू’च्या औषधांचा मुबलक साठा गोमेकॉ, जिल्हा इस्पितळे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. खासगी इस्पितळांनाही या औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. खासगी फार्मसीतही गोळ्या उपलब्ध आहेत. गेल्या महिन्यात औषधांचा थोडासा तुटवडा होता. मात्र, आता मुबलक साठा उपलब्ध आहे, असे डॉ. बेतोडकर यांनी स्पष्ट केले.
मृतांपैकी ६ जणांना अन्य आजार
जे ८ जण स्वाइन फ्लूमुळे दगावले त्यांपैकी ६ जणांना अन्य गंभीर आजार होते. त्यामुळे कमी प्रतिकार शक्ती असल्याने ते दगावले, असे डॉ. बेतोडकर यांनी सांगितले. दरवर्षी जून ते सप्टेंबर या काळात पावसामुळे तापमान खाली येत असते व त्याच दरम्यान स्वाइन फ्लू डोके वर काढीत असतो. सप्टेंबर महिना संपल्यानंतर स्वाइन फ्लू नाहीसा होतो, असेही त्यांनी नमूद केले. ५ वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांचाही स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होण्याचा धोका असतो, असे डॉ. बेतोडकर यांनी स्पष्ट केले.