जय शहांच्या प्रकरणाची सखोल चौकशी हवी : कॉंग्रेस

0
81

भ्रष्टाचाराच्या विरोधात झिरो टॉलरन्सचा नारा देणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या मालमत्ता प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडले पाहिजे, असे प्रतिपादन कॉँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्‌या प्रियांका चतुर्वेदी यांनी कॉँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल केले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबत कॉँग्रेस पक्षाकडून देशपातळीवर जनजागृती केली जात आहे. ह्या जनजागृतीचा एक भाग म्हणून चतुर्वेदी यांनी ही पत्रकार परिषद घेतली. जय शहा यांच्या मालमत्तेचे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. सरकारी पातळीवरून जय शहा यांची पाठराखण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असा आरोप चतुर्वेदी यांनी केला. शहा यांची पाठराखण करणार्‍या केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचीही चौकशी केली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

जय शहा यांच्या कंपनीने २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५० हजारोंचा नफा कमावला होता. त्याच कंपनीचा २०१५-१६ या वर्षातील व्यवहार ८०.५ कोटी रूपयांवर पोहचला आहे. व्यवसायातीलही वाढ १६ हजार पट एवढी आहे. जय शहा यांच्या कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. उलट, या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप चतुर्वेदी यांनी केला. भाजप सरकारकडून विरोधकांची तोंडे बंद करण्यासाठी दडपशाहीचा वापर केला जात आहे. भाजप नेत्याचा कथित सहभाग असलेल्या व्यापम व इतर प्रकरणाच्या तपासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचे भ्रष्टाचार प्रकरण देशभर गाजले आहे, असेही चतुर्वेदी यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
धावला शहांच्या मदतीला

भाजपाध्यक्ष अमित शहापुत्र जय शहा यांच्या सध्या गाजणार्‍या कंपनीच्या भरभराटप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची येथे पाठराखण करणारे निवेदन केले. संघाची राष्ट्रीय बैठक काल येथे झाली. त्यानंतर संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की कोणावरही आरोप करावयाचे झाल्यास त्यासंबंधी पुरावे देणे आवश्यक आहे. एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यास त्याची चौकशी व्हायला हवी. मात्र हे आरोप कोणत्या आधारावर केले आहेत त्याचे पुरावे आरोप करणार्‍याने द्यायला हवेत.