तलवार दांपत्याची निर्दोष मुक्तता

0
99

नोएडातील आरूषी तलवार व हेमराज या दुहेरी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरूषीचे आई-वडील राजेश व नुपूर तलवार यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी काल एका निवाड्याद्वारे निर्दोष सुटका केली.

सीबीआय न्यायालयाने तलवार दांपत्याला २००८ सालच्या या हत्याकांडप्रकरणी जन्मठेप ठोठावली होती. कालच्या निवाड्यानंतर सीबीआयने या संबंधीची प्रत मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली. न्या. बालकृष्ण नारायण व न्या. मिश्रा यांच्या खंडपीठाने काल वरील निवाडा जाहीर केला. सीबीआय न्यायालयाने जन्मठेप ठोठावल्यानंतर तलवार दांपत्याने त्या निवाड्याविरुध्द अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआयच्या गाझियाबाद येथील विशेष न्यायालयाने २६ नोव्हेंबर रोजी तलवार दांपत्याला शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सध्या ते गाझियाबादमधील तुरुंगात शिक्षा भोगत होते. राजेश व नुपूर तलवार यांना त्यांची मुलगी आरूषी व नोकर हेमराज यांच्या हत्येबद्दल दोषी ठरविण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर १ ऑगस्ट २०१७ रोजी सुनावणी सुरू झाली होती. आरोपपत्रातील विसंगतीमुळे या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले होते.

घटनेची पार्श्‍वभूमी
मे २००८मध्ये नोएडातील जलवायू विहार भागात १४ वर्षीय आरूषी हिचा मृतदेह गळा चिरलेल्या स्थितीत घरात सापडला होता. प्रथमदर्शनी संशय नोकर हेमराजवर होता. मात्र दोन दिवसानंतर घराच्या गच्चीवर त्याचाही मृतदेह सापडला होता.