इडीएमसाठी पर्यटन खात्याकडे दोन अर्ज

0
113

>> सुकाणू समिती घेणार निर्णय

गोवा पर्यटन खात्याकडे डिसेंबर महिन्यात ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिवल’ (ईडीएम) आयोजनासाठी दोन अर्ज आले आहेत. या दोन्ही अर्जावर राज्य पातळीवरील सुकाणू समितीकडून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

राज्यात नवीन वर्षांच्या स्वागतानिमित्त डिसेंबर महिन्यात गेल्या काही वर्षापासून ईडीएमचे आयोजन केले जात आहे. या ईडीएममध्ये सहभागी होण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र, गत २०१६ मध्ये सरकारच्या कडक भूमिकेमुळे ईडीएमचे आयोजन होऊ शकले नाही. ईडीएममध्ये अमलीपदार्थाचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने जलस्त्रोतमंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी ईडीएम आयोजित करण्यास विरोध केला. त्यानंतर पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी अमलीपदार्थ मुक्त ईडीएम आयोजित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा खुलासा केला. ईडीएम आयोजित करण्यासाठी कुणालाही मान्यता दिलेली नाही. तर ईडीएम आयोजकांकडील थकबाकी वसुलीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे, असे पर्यटन मंत्री आजगावकर यानी जाहीर केले. त्यानंतर ईडीएमच्या आयोजनावरून उलट सुलट चर्चेला उधाण आले. पर्यटन व्यवसायाला बळकटी देण्यासाठी अमलीपदार्थ मुक्त ईडीएम आयोजनावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झाले.

दरम्यानच्या काळात परराज्यातील एका कंपनीने डिसेंबर महिन्यात ईडीएम आयोजित करण्यासाठी वृत्तपत्रातून जाहीरात प्रसिध्द करून तिकीट विक्रीला सुरूवात केली होती. ईडीएमसाठी कायदेशीर मान्यता न घेता तिकीट विक्री सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य पातळीवरील सुकाणू समितीने सदर कंपनीला तिकीट विक्री बंद करण्याचा आदेश दिला आहे. या वर्षी ईडीएमच्या आयोजनासाठी संबंधिकांनी आत्तापासून लॉबिंग करण्यास सुरूवात केली आहे.