जयगडहून गोव्यात येणारी बार्ज बुडून ४ बेपत्ता, १ मृतावस्थेत

0
25

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक्सच्या उत्तरेला जयगडवरून गोव्याला निघालेले कृष्णा बार्ज समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना २ डिसेंबरची असून जवाद चक्रीवादळामुळे झालेल्या खराब हवामानाचा फटका या बार्जला बसला. कृष्णा बार्ज जेव्हा बुडाले तेव्हा त्यावर १० सदस्य होते. बार्ज बुडत असल्याने १० जणांनी समुद्रात उडी मारली. त्यातील ५ जणांना वाचवण्यात गोवा तटरक्षक दलाला यश आले तर, एकाचा मृतदेह मिळाला. अद्याप चार सदस्य बेपत्ता आहेत.

हे बार्ज वेंगुर्ला रॉक्सच्या परिसरात बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर गोवा तटरक्षक दलाने त्यांचे हेलिकॉप्टर आणि तीन जहाजे शोध आणि बचाव कार्यासाठी पाठवली. यावेळी केरळच्या तीन मासेमारी नौकांनी तिघांना वाचवले.