कोरगाव येथे एक बांगलादेशी नागरिक मागच्या दोन महिन्यांपासून एका भाड्याच्या खोलीत कुठलीही कागदपत्रे नसताना केवळ आधार कार्डद्वारे बेकायदेशीर वास्तव्य करून रहात होता. यावर कारवाई करत अब्दुल रहमान (34) या नागरिकाला पेडणे पोलिसांनी अटक केली. ठिकठिकाणी बेकायदा वास्तव करून राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध पेडणे पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून त्याचाच एक भाग म्हणून सदर बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. संशयित बांगलादेशी व्यक्तीकडे कसल्याच प्रकारची कायदेशीर कागदपत्र उपलब्ध झाली नाही.
अब्दुल हा बांगलादेशी नागरिक फोंडा माशेल या भागात वास्तव्य करून होता. त्यानंतर तो कोरगावात राहू लागला. तो मूळचा बांगलादेशातील गोपाळ गंज येथील रहिवासी असून पेठेचा वाडा कोरगाव येथील भाड्याच्या खोलीत रहात होता. पोलीस निरीक्षक नितीन विष्णुदास हळर्णकर यांच्या देखरेखेखाली उपनिरीक्षक साहिल नाईक या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.