जपून पावले टाका

0
116

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतून आपण अजून पुरते बाहेर पडलेलो नाही, तरी देखील ज्या प्रकारे अक्षम्य बेफिकिरी गोव्यात, देशात आणि संपूर्ण जगातच पाहायला मिळते आहे, ती पाहिली तर पुन्हा एकवार दुसर्‍या लाटेच्या भीषण पुनरावृत्तीकडे तर आपण जाणार नाही ना ही चिंता प्रत्येक सजग नागरिकाच्या मनात सतावू लागलेली आहे. न्यायालयाच्या कृपेने गोव्याच्या सीमा बेबंद प्रवेशाला बंद आहेत. सरकारच्या आदेशानुसार कोविड चाचणी करूनच परराज्यातील व्यक्तींना प्रवेश घेता येतो. त्यामुळे अद्याप पर्यटकांचे लोंढे फार मोठ्या प्रमाणात येथे उतरू शकलेले नाहीत, परंतु ज्या प्रकारे आज देशातील थंड हवेच्या ठिकाणांवर ते धडकत आहेत, ते पाहिले तर चिंता वाटते. सिमल्याचा माल रोड पर्यटकांनी भरून वाहतो आहे, मनाली, रोहतांगवर पाय ठेवायला जागा नाही, मसुरीच्या धबधब्यांवर पर्यटकांचा प्रवाह वाहतो आहे. हे सगळे ज्या बेफिकिरीने चालले आहे ते पाहिले तर सर्वांत आधी आपण गोवा उच्च न्यायालयाचे आणि त्याचे दरवाजे ठोठावणार्‍या दक्षिण गोवा वकील संघटनेचे शतशः आभार मानले पाहिजेत, ज्यांच्यामुळे गोव्यातील बेबंद प्रवेशावर निर्बंध आले आणि पर्यटकांचे लोंढे अन्यत्र वळले. अन्यथा हाच धांगडधिंगा गोव्याच्या समुद्रकिनार्‍यांवर आणि रस्त्यारस्त्यांतून पाहायला मिळाला असता.
केंद्र सरकारने नुकतेच ज्याला ‘रिव्हेंज ट्रॅव्हल’ संबोधले, असा आजवरच्या लॉकडाऊनवर सूड उगवण्यासाठी म्हणून केला जाणारा अनावश्यक प्रवास एकीकडे आणि दुसरीकडे कोरोना विषाणूची उदयाला येणारी नवनवी रूपे असे विपर्यस्त चित्र आज आहे. गोव्यात दुसर्‍या लाटेत हाहाकार माजवलेल्या ‘डेल्टा’ नंतर देशाच्या काही भागांत आणि अगदी शेजारच्या महाराष्ट्रात देखील त्याहून घातक असा ‘डेल्टा प्लस’ अवतरला आणि आता जगभरातून ‘लांबडा’, ‘कप्पा’ असल्या चित्रविचित्र नावांची त्याची आणखी नवी रूपे समोर येऊ लागली आहेत. केरळमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. देशातील अर्धे अधिक रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आहेत. ८० टक्के रुग्ण ९० जिल्ह्यांत आहेत.
कोरोना लसीकरणानंतर ही महामारी संपुष्टात येईल असे आशादायक चित्र वैज्ञानिकांनी आपल्यापुढे उभे केलेले होते, परंतु दुर्दैवाने आता ह्या विषाणूच्या नवनव्या रूपांवर लशीची मात्राही पुरेशा प्रमाणात चालत नसल्याचे दावे केले जात असल्याने सामान्य माणूस चक्रावून गेलेला आहे. ही अशी महामारी आहे, जिथे एखाद्या व्यक्तीची बेफिकिरीदेखील भोवतालच्या शेकडो लोकांना भोवू शकते. दुसर्‍या लाटेमध्ये एकाच कुटुंबातील दोन दोन, तीन तीन व्यक्तींचा बळी गेलेला आपण पाहिला. गोव्यातील एकही व्यक्ती अशी नसेल जिच्या नात्यातील वा परिचयातील एक तरी व्यक्ती आजवर राज्यात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या तीन हजारांवर दुर्दैवी लोकांमध्ये नव्हती. आपल्या परिचयाची, नात्यातली, जवळची माणसे आपण ह्या दुसर्‍या लाटेमध्ये गमावली, परंतु जराशी परिस्थिती काय निवळली, पुन्हा आपण बेफिकिरीवर कसे काय उतरलो? प्रत्येकाने स्वतःला आणि इतरांना हा प्रश्न विचारायला हवा. कोरोनातून आपण अद्याप पार झालेलो नाही. कधी होऊ हे आपल्याला माहीत नाही अशा परिस्थितीत अशी बेफिकिरी आणि वर उल्लेखलेला ‘रिव्हेंज ट्रॅव्हल’ पुन्हा मृत्यूचे तांडव माजवणार्‍या संभाव्य तिसर्‍या लाटेकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतो.
राज्य सरकार पुन्हा एकवार संचारबंदी आणखी आठवडाभरासाठी वाढवण्याच्या विचारात आहे. तसे पाहिले तर ती नावालाच आहे, परंतु तरीही किमान काही निर्बंध जनतेवर राहिले आहेत. आज सर्वांत आवश्यकता आहे ती राज्याच्या सीमा तूर्त परराज्यांतील प्रवाशांना खुल्या न करण्याची. लसीकरण झालेल्यांना प्रवेश देऊ असे म्हणणे आता उपयोगाचे नाही, कारण कोरोना विषाणूच्या नव्या रूपांवर लसही प्रभावी ठरत नसलेली दिसते आहे. त्यामुळे सावधपणे एकेक पाऊल टाकणेच अपरिहार्य आहे. मात्र राज्यात सरकारच गर्दी खेचणारे सार्वजनिक कार्यक्रम करताना दिसते आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ‘लाडली लक्ष्मी’ साठी लोकांना रांगा लावायला लावायचे कारणच काय? या महामारीने माणसे पोळली गेली आहेत. हवालदिल झालेली आहेत. असे असताना इंधनापासून वीज बिलापर्यंत दरवाढीचा वणवा लागलेला आहे. महामारीने माणसे होरपळत असताना विजेच्या बिलांत सरकार दरवाढ कशी काय अमलात आणू शकते? नवी भरारी घेण्याइतकी माणसे अजून समर्थ झालेली नाहीत. त्यांना अजून वेळ हवा आहे. अशा वेळी पुन्हा एखादी लाट जर आपण ओढवून घेतली तर त्यातून सावरणे मग कोणालाही शक्य होणार नाही!