सीझेडएमपी जनसुनावणी नव्याने घ्या

0
103

>> नागरिकांची मागणी, गोयकारांचो एकवोटचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

किनारा व्यवस्थापन आराखड्याची जनसुनावणी गुरूवारी रात्री उशिरापर्यंत घेऊन ती संपली असल्याचे दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केले. हा खरे तर नागरिकांच्या मतस्वातंत्र्यावर घाला आहे असा आरोप करत ही जनसुनावणी रद्द करून ती पुन्हा घ्यावी अशी मागणी काल मडगावात करण्यात आली. गोयकारांचो एकवोटचे निमंत्रक अभिजित प्रभुदेसाई यांनी या संदर्भात दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली व त्यांना या संदर्भातील एक निवेदनही सादर केले.

जिल्हाधिकार्‍यांनी ही जनसुनावणी रद्द करण्याचा अधिकार आपणास नसून त्या संदर्भात पर्यावरण संचालकांना अधिकार आहे. हे पत्र आपण पर्यावरण संचालकांना पाठवतो असे सांगितले.
या आराखड्याबद्दल कोणाला काही सूचना करायच्या असतील किंवा हरकती सादर करावयाच्या असतील तर त्यांनी त्या येत्या दि. १५ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात द्याव्यात असे जिल्हाधिकार्‍यांनी केवळ तोंडी सांगितले. या संदर्भात त्यांनी कोणतेही पत्र किंवा लेखी स्वरूपात काहीही दिलेले नाही असे श्री. प्रभुदेसाई यांनी यावेळी सांगितले.

गोव्यातील पंचायतींनी जो आराखडा तयार करून दिला होता तो गोव्याच्या हिताचा होता. मात्र तो आराखडा डावलून गोव्याबाहेरील खासगी कंपनीला आराखडा बनवण्याचा ठेका देण्यात आला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. या कंपनीच्या कोणत्याच अधिकार्‍याने या आराखड्यासंदर्भात गोव्यातील पंचायती वा इतर कोणाशीही संपर्क साधला नाही. त्यामुळे सरकारने गुरूवारी घेतलेली ही सुनावणी आम्हाला मान्य नाही. ही सुनावणी सरकारने रद्द करून ती पुन्हा नव्याने घ्यावी अशी मागणी यावेळी प्रभुदेसाई यांनी केली. तसेच यावेळी त्यांनी ही जनसुनावणी नव्याने न घेतल्यास सरकारला जनतेच्या रोषाला कारणीभूत व्हावे लागेल असा इशाराही दिला.

पणजीत गदारोळ
गुरूवारी कांपाल पणजी येथे परेड मैदानावर उत्तर गोव्यासाठी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. तर, दक्षिण गोव्यातील नागरिकांसाठी मडगाव येथे जनसुनावणी ठेवण्यात आली होती. पावसामुळे कांपाल पणजी जनसुनावणीला उपस्थित राहणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या दोन्ही ठिकाणी सुनावणीचवेळी गोंधळाचे वातावरण होते. ही जनसुनावणी मान्य नसल्याचे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी सांगितले. पर्यावरण प्रेमी, गावातील नागरिकांकडून सीझेडएमपी आराखड्याच्या वैधतेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले गेले. मडगावमध्य रात्री उशिरापर्यंत ही सुनावणी सुरू होती. मात्र संध्याकाळी ६ नंतर या जनसुनावणीवर उपस्थित नागरिकांनी बहिष्कार घातला व ते तेथून निघून गेले. तरीही जिल्हाधिकार्‍यांनी ही जनसुनावणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती व रात्रीच संपली असे जाहीर केले.

नागरिकांच्या प्रश्‍नांना नीट उत्तरेही अधिकार्‍यांकडून मिळाली नाहीत. चेन्नई येथील संस्थेने सीझेडएमपी आराखडा तयार केला आहे. या संस्थेला गोव्याची काहीच माहिती नाही, अशी तक्रार यावेळी नागरिकांनी केली.

सलग सुनावणी अशक्य ः काब्राल
पर्यटनमंत्री नीलेश काब्राल यांनी सीझेडएमपीबाबत सलग सुनावणी घेणे अशक्य असल्याचे म्हटेल आहे. याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना तसेच आक्षेप येत्या १५ जुलैपर्यंत सादर करावेत असे म्हटले आहे. तसेच जनसुनावणीचे रोकॉर्डिंग वेबसाईटवर टाकण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री काब्राल यांनी काल दिली.

मडगावात गुरूवारी उपस्थित नागरिकांनी या जनसुनावणीला प्रखर विरोध केला होता.