छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात २२ जवान शहीद

0
158

छत्तीसगडमधील बस्तरच्या बीजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाले. बीजापूरच्या जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवाद्यांनी जवळपास ७०० जवानांना घेरून गोळीबार सुरू केला. ही चकमक चार तास सुरू होती. या चकमकीत ९ नक्षलवादीही ठार झाले. यात जवळपास ३२ जवान जखमी झाले आहेत. तर २२ जवान शहीद झाले असून एक जवान बेपत्ता आहे.

जोनागुडाच्या डोंगरांमध्ये नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर शुक्रवारी रात्री कोब्रा कमांडो, बस्तरिया बटालियन आणि स्पेशल टास्क फोर्सच्या दोन हजार जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू केली होती. पण नक्षलवाद्यांनी ७०० जवानांना घेरत तीन बाजूंनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. नक्षलवाद्यांनी यावेळी जवानांची दोन डझनहून अधिक शस्त्रे लुटली.

घटनास्थळी जवळजवळ ४०० नक्षलवादी होते. नक्षलवादी दोन ट्रॅक्टरमध्ये मृतदेह घेऊन गेल्याची माहिती मिळाली असल्याचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले.
नक्षलवादी जवानांवर मोठा हल्ला करणार अशी शंका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना आधीच होती. यामुळेच संपूर्ण भागात नक्षलवाद्यांविरोधात कारवाईसाठी २ हजारांहून अधिक जवानांना उतरवण्यात आले होते.

पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा इशारा
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त करत कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त केली. यासोबतच पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी नक्षलवाद्यांना गंभीर इशाराही दिला.

नक्षलवाद्यांविरोधातील मोहीमेत जवान शहीद झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. जवानांची बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आणि ते विसरणारही नाही. माझ्या सहवेदना छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जावानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. तर शूर जवानांच्या बलिदानाची आहुती दिली. त्यांचे बलिदान हा देश विसरणार नाही. आम्ही शत्रूविरोधात कारवाई सुरूच ठेवू, असा गंभीर इशारा अमित शहांनी नक्षलवाद्यांना दिला आहे.

नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या ७ जवानांची प्रकृती आता चांगली आहे. पण अद्याप २१ जवान बेपत्ता आहेत आणि त्यांच्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिली.