शिंक

0
206

बंध रेशमाचे…

  • मीना समुद्र

शिंक ही काम थांबण्याचं लक्षण किंवा अशुभही असो वा नसो, माझ्या आयुष्यात मात्र माझ्या पुस्तक वाचनाची सुरुवात शिंकेमुळे झाली आणि आजही ते अखंड चालू आहे. सुंदर ठळक अक्षरातली आणि कोंबड्याचे हावभाव दाखवणारी सुंदर चित्रं असलेली ती ‘शिंके’ची गोष्ट वाचनाच्या कुतूहलाची, गोडीची नांदी ठरली एवढं खरं!

सुरेश घाईघाईने कामाला निघाला होता. आज त्याला उठायला अंमळ उशीरच झाला होता आणि त्यामुळे पुढचं सगळं टाईमटेबल बिघडून गेलं. आंघोळ, नाश्ता एकूणच सगळं खूप घाईघाईतच उरकलं आणि त्याच्या पत्नीने सुजाताने दिलेला डबा बॅगेत आणि पाकिट, रुमाल खिशात कोंबून बॅग पाठीला अडकवून तो बूट घालण्यासाठी वाकला. मोजे झटकून पायात घालताच जोरदार शिंक आली आणि तिच्यापाठोपाठ आणखी एक-दोन शिंका आल्या. तेव्हा त्याची आई आतून ओरडली, ‘‘अरे शिंकलास ना जाताना, आता दोन मिनिटं घरात टेकून जा.’’ ‘‘हो हो!’’ म्हणत तो तसाच निसटला.

‘‘दोन मिनिटं कुठली, दोन सेकंदांचीही फुरसत नाही थांबायला’’ तो मनाशी म्हणाला. आई आत स्वयंपाकघरात होती म्हणून बरं- त्याच्या मनात आलं. नाहीतर काहीतरी शास्त्र काढते. तेवढ्यात आणखी एक शिंक आली आणि खिशात कोंबलेला रुमाल नाकावर धरून तो लगबगीने बसथांब्यावर पोचला. एकदा बस मिळाल्यावर मात्र आता निवांत अर्धा तास होता ऑफिसला पोचायला. तेव्हा त्याचं विचारचक्र सुरू झालं… कामाला जाताना स्वतः ती व्यक्ती किंवा इतर कोणी शिंकलं तर काम होत नाही ही एक सार्वत्रिक समजूत आहे पण शिंक ही घाईत असतानाची स्वाभाविक प्रक्रिया आहे. मग टेकायचं. थोडं थांबायचं आणि मग बाहेर निघायचं.. हे कशासाठी? माणूस घाईत असला की त्याच्या लक्षात येत नाही पण झटकलेली धूळही नाकात जाऊ शकते. दार उघडून बाहेर जाताना घरातल्या ऊबदार वातावरणाच्या मानाने खुली थंड हवा आत येते आणि ती सहज श्‍वासोच्छ्वासाबरोबर आत जाते आणि शिंक येते. त्यामुळे असेल; थोडा विसावा घेऊन खोल श्‍वास घेऊन बाहेरच्या हवेशी मिळतंजुळतं घेऊन मग बाहेर जाणं किंवा कामाला सज्ज होणं चांगलं- म्हणजे आई म्हणते ते बरोबर आहे हे त्याला पटलं. जेवताना कधी कधी पाणी पिताना ठसका लागतो तेव्हाही ‘वर बघ तुझी सासु टांगली आहे’ असं सर्रास म्हटलं जातं (मग तो खाणारा किंवा पिणारा लग्न झालेला असो वा नसो!) यामागेही हेच कारण आहे. मुलं घाईघाईनं खातपीत असताना एखादा अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब चुकून श्वासनलिकेत गेला तर ती सहज अशी क्रिया शरीराकडून आपल्या नकळत घडते. वर पाहिले की नलिकांचे कार्य योग्य प्रकारे होऊन ठसका थांबतो. ‘सासु’ हा एकूणच चिडविण्याचा किंवा चेष्टेचा गमतीदार प्रकार. वर तोंड करुन पाणी पिताना सासु छताला टांगली आहे या कल्पनेनेच हसू येते आणि आपल्याला होणार्‍या त्रासाकडून दुसरीकडे लक्ष वेधले जाते हे मनोविज्ञान पूर्वीच्या गृहिणींनी जाणलेले असे.
बोलताना कोणी एखादं विधान केलं, त्याचवेळी कुणी शिंकलं तर ‘पहा सत्य आहे की नाही’ अशी शिंक सत्याची साक्षी किंवा पावतीही बनायची.

एरवी शिंक म्हणजे वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आपल्या शरीरात असलेल्या प्रतिक्षित क्रियांसारखीच एक सहज स्वाभाविक क्रिया वा प्रतिक्रिया आहे. प्रतिकार जोराचा तेवढी शिंक जोराची. एका मैत्रीणीला अशाच जोरदार शिंका येत. स्वयंपाकघर लहान. त्यात मोरीच्या कठड्यावर हंड्या-तपेली पाण्याने भरुन ठेवलेली. तिची आई म्हणे, ‘‘अगं जरा हळू शिंक ना. सगळ्या भांड्यातून नाद घुमतोय.’’ पण शिंक अशी ठरवून थोपवता येते का? ती येऊन जाते आणि मगच तिचा जोर, तिचे लहान-मोठेपण कळते. तिला आपण कह्यात ठेवू शकत नाही पण सवय नसताना तंबाखूसारखे पदार्थ नाकात कोंबले किंवा रुमालाचे टोक नाकात घातले तर नाक हुळहुळून हुकमी शिंक येऊ शकते.

पूर्वी वाड्यात राहत असताना तिथल्या जमिनीत पुरलेल्या उखळात मिरच्या कांडण्याचा प्रकार चाले तेव्हा आसपास कुणी फिरकलं की हा एवढा खकाणा उसळे आणि शिंका येत. बराच वेळ नाक चुरचुरत सुरसुरत राही. म्हणून बायका तोंडावर पदर किंवा फडकं बांधत आणि पोरासोरांना तिकडे फिरकायला मज्जाव असे. मुलीचा मुलगा माझा नातू तान्हा असताना त्याला पाळण्यात दुसर्‍या खोलीत झोपवून मसाला बनवत असताना मिरच्या परतायला घेतल्याबरोबर त्या बाळाचं शिंकणं, खसखसणं आणि रडणं सुरु झालं तेव्हा त्याचा मामा (माझा लेक) एवढा चिडला होता, ‘‘हे सगळं बाहेर मिळतं तरी घरी कशाला करत बसता, तेही घरात बाळ लहान असताना’’, म्हणत त्याला घेऊन तो थोडा बाहेर थांबला होता. पूर्वी पापड घरीच करत बायका. तेव्हाही पीठ भिजवणारीला पापडखार आणि तिखटपूड किंवा मिरच्यांचं म पाणी ओतलं की अशाच सटासट शिंका येत.
कुणाकुणाला अगदी बारीक बारीक शिंका एकापाठोपाठ एक येतात तर कुणाला घर घुमवणार्‍या मोठ्या आवाजाच्या आणि जोराच्या. याबाबतीत एक गंमत आठवते ती म्हणजे केर काढताना वाकलं की माझ्या शिंका सुरू व्हायच्या त्याच सुमारास आमच्या खालच्या मजल्यावर राहणार्‍या शेजार्‍यांच्याही. तेव्हा लोक हसत म्हणायची, ‘‘सुरु झाली जुगलबंदी आई आणि काकांची!’’. सात-आठ अशा एकापाठोपाठ २-३दा येऊन गेल्या की शिंका थांबायच्या. तशा पूर्वी शिंका आणि सर्दी अगदी पाचवीला पुजल्यासारखी महिन्या-दोन महिन्यातून एकदा असायचीच. मग गवती चहा, तुळस, मिरी, लवंग, दालचिनी, खडीसाखरेचा काढा; ते ३-४ दिवस घसा शेकत गरम पाणी असे उपाय चालायचे. कुणीतरी थंड पाण्याने आंघोळीचा (कोणत्याही ऋतूत) उपाय सुचवलेला. तोही करुन पाहिला. थोडीबहुत काबूत आली मात्र. एरवी शिंक म्हणजे सर्दी-पडसे, डोकेदुखी- घसादुखी, खोकला, ताप अशा चढत्या क्रमाने येणार्‍या रोगांची नांदीच म्हणायला हवी. पण तरी ती काही वेळा निरुपद्रवी असते.

आजच्या काळात हल्ली या महामारीच्या रोगाचे सुरुवातीचे लक्षण म्हणूनही शिंकेकडे गांभीर्याने, संशयाने पाहण्याची शक्यता आहे; किंबहुना ते तसे पाहिले जाते. तेव्हा शिंक, सर्दी, खोकला, ताप याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. रोगजंतूंचा संसर्ग होऊ नये म्हणून आपण मुखावरण घातलेच पाहिजे ही जागृती समाजात नाना प्रकारे होत आहे. तिचा अवलंब केलाच पाहिजे. अशक्तता किंवा प्रतिकारशक्ती कमी असल्याचेही शिंक हे एक लक्षण असू शकते.

धूळ, उष्णता, थंडी, कोणताही तीव्र गंध (फुले वा अत्तर), उग्र वास मग तो घामाचा, फोडणीचा, तिखटाचा असो त्यामुळे आपल्या नेहमीच्या श्‍वासलयीत खंड पडतो. त्यामुळे त्यांना प्रतिकार करणारे हातरुमाल, ओढणी, पदर, मास्क, नीलगिरि, विक्ससारखी औषधे किंवा इन्‌हेलर ठेवले तर त्याचा प्रभाव सौम्य वा नष्ट करण्यास मदत होते.

‘हिच्या शिंकेला तर काही कारणच लागत नाही’, असं माझी बालमैत्रीण म्हणायची. तिला अगदी एकदोन फुसक्या शिंका कधीतरी यायच्या. शिंका सर्दी पडसं असं काहीतरी आपल्याला व्हावं म्हणजे डोकं घट्ट बांधून लाल नाक पुसत गरम काढा पिऊन मस्त गुरफटून झोपी जावं असं तिला फार वाटायचं. सर्दी नाही तरी तिचा घसा वरचेवर बसायचा. बसायचा म्हणजे कसा तर आठ दिवस तो जागचा हलायचाच नाही आणि मग तिचा जो काही गंमतशीर आवाज यायचा बोलताना की कधीकधी ती काय बोलतेय तेच कळायचं नाही आणि कधी शिरा ताणून बोलली तरी तो बसका चिरका आवाज आमची हसून हसून मुरकुंडी वळवायचा. पण… ‘शिंकशिंकुनी अति मी दमले, थकले रे देवराया’ अशी माझी अवस्था होत असताना ‘हं आणखी एक, आणि एक’ अशा माझ्या शिंका मोजत ती हसायची. माझं ‘आक्षीऽऽ आक्‌शीऽऽ’ थांबलं की ‘है भले शाब्बास’ म्हणायची. शिंका आणि सर्दीनं हैराण झाल्यावर ‘नाक तोडून टाकावंसं वाटतंय’ असा वैताग बोलून दाखवला की ‘त्यापेक्षा व्हिक्स चोपड ना जाहिरातीत दाखवतात तसं, ते सोपं. नाकबिक तोडलंस तर कशी दिसशील कल्पना कर’, म्हणायची आणि मग दोघी खूप खदखदायचो.

शिंक ही काम थांबण्याचं लक्षण किंवा अशुभही असो वा नसो, माझ्या आयुष्यात मात्र माझ्या पुस्तक वाचनाची सुरुवात शिंकेमुळे झाली आणि आजही ते अखंड चालू आहे… असं सांगितलं तर कुणाला खरं वाटणार नाही पण असं घडलं खरं! ३री, ४थीत असेन मी त्यावेळी. सांगलीच्या आमच्या ‘बापट बालशिक्षण मंदिर’ या शाळेत आम्हाला वाचनाचा तास असे. एका खोलीत छान छान चित्रांची मोठ्या अक्षरातली पुस्तकं ठेवलेली असत, काही बालमासिकं असत. वाचनाच्या तासाला एकदा एका टेबलावरच्या मासिकात ‘आई, मी शिंकू?’ या शीर्षकाची गोष्ट मी वाचली. अचानक पाऊस आल्यावर अंगणात पिलांसह फिरणारी कोंबडी घरात येते आणि तेवढ्यात कुत्रा आल्याची चाहूल लागल्याबरोबर एका उघड्या मडक्यात पिलांना गुपचुप बसायला सांगून स्वतः पंख पसरून त्यावर बसते. तेवढ्यात कुत्रा जवळ येत असतानाच आतलं पिल्लू ‘आई मी शिंकू?’ विचारतं आणि उत्तर मिळायच्या आत जोरदार शिंकतं. त्याबरोबर ते मडकंही फुटतं आणि आवाजाने आणि अचानक घटनेने दचकून कुत्रा पळून जातो आणि शिंकेमुळे सगळ्यांचे प्राण वाचतात. सुंदर ठळक अक्षरातली आणि कोंबड्याचे हावभाव दाखवणारी सुंदर चित्रं असलेली ती ‘शिंके’ची गोष्ट मग वाचनाच्या कुतूहलाची, गोडीची नांदी ठरली एवढं खरं!