चोवीस तास पाणी पुरवठ्याचा निर्धार : पर्रीकर

0
112

राज्यातील जनतेला चोवीस तास अखंडितपणे पाणीपुरवठा करण्याचा आमचा जो निर्धार आहे त्याला मूर्त रूप देता यावे यासाठी राज्यातील पाणी पुरवठ्यासाठीच्या साधनसुविधांमध्ये काही उणीवा आहेत काय, हे पाहण्यासाठी सरकारने या साधनसुविधांचा नकाशा तयार करण्याचे काम हाती घेतले असून सल्लागाराचीही नेमणूक केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत दिली.

प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी विचारलेल्या पाणी पुरवठ्यासंबंधीच्या तारांकित प्रश्‍नाचे उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली. वीज पुरवठा खंडित झाला की पाणी पुरवठाही खंडित होत असतो, असे नेरी यांनी यावेळी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. अशा वेळी वेगळी व्यवस्था हवी, अशी सूचनाही त्यांनी केली होती.

यावेळी बोलताना पर्रीकर यांनी त्यावर लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. तसेच जुन्या झालेल्या जलवाहिन्यांमुळे पाण्याची गळती होण्याचे प्रकार घडू लागल्याने जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. म्हैसाळे, अस्नोडा, चांदेल, काणकोण, पोडोशे, साळ, पर्वरी, गिरी आदी ठिकाणी नवे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ते कार्यरत झाले की राज्याला अतिरिक्त १६७ एमएलडी पाणी मिळू शकेल. एका तिसवाडी तालुक्यालाच अतिरिक्त २७ एमएलडी पाण्याचा डिसेंबर २०१९ पर्यंत पुरवठा होऊ शकेल. अस्नोडाची क्षमता ३० एमएलडी इतकी वाढणार असल्याचेही पर्रीकर म्हणाले.