सांडपाणी नदीत सोडणे ठरणार दखलपात्र गुन्हा

0
109

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

सांडपाणी नदीत सोडणे हा दखलपात्र गुन्हा करण्याबाबत सरकार विचार करीत आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले. साळ नदीच्या प्रदूषणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण लवकरच एक बैठकही घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बरेच लोक सांडपाण्यासाठीच्या जोडण्या घेत नाहीत आणि सांडपाणी नदीत सोडीत असतात. याच कारणामुळे सासष्टी तालुक्यातील ‘साळ’ ही नदी प्रदूषित झाली आहे, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार विल्फ्रेड डिसा यांनी ‘साळ’ नदीच्या पाण्यासंबंधीचा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावेळी बोलताना पर्रीकर यांनी वरील माहिती दिली.

यावेळी पुढे बोलताना पर्रीकर म्हणाले की, साळ नदी वेर्णे ते बेतुल या दरम्यान पूर्णपणे प्रदूषित झालेली आहे. हे प्रदूषण कशामुळ झाले आहे, असा प्रश्‍न यावेळी डिसा यांनी विचारला असता लोक आपली संडासाची सगळी खाण या नदीत सोडत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. ‘फेकल कॉलिफाम’मुळे ही नदी अतिप्रदूषित झालेली आहे. या नदीत फेकल कॉलिफामची मात्रा तब्बल २४ हजार एवढी असून ती मर्यादेपेक्षा खूपच जास्त असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या नदीतील ‘तिसर्‍या’ प्रदूषित झाल्या असल्याचे दिसून आले होते, अशी माहितीही पर्रीकर यांनी दिली.