चोवीस तासांत ६ मृत्यूंसह २५४ कोरोनाबाधित

0
81

>> नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण ८.६० टक्के

राज्यात नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १० टक्क्यांच्या खाली आले आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ८.६० टक्के एवढे नोंद झाले आहे. तसेच, मागील दोन महिन्यांतील सर्वांत कमी कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत नवे २५४ रुग्ण आढळून आले असून आणखी ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या ३ हजार ८२४ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या २,९६९ झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात चोवीस तासांत ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोमेकॉमध्ये ३ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात १ रुग्ण, बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात १ रुग्ण आणि दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

३ बळींची उशिरा नोंद
दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळाने ३ कोरोना रुग्णांची उशिरा नोंदणी केली आहे. १५ ते २३ मे २०२१ या काळात ह्या मृत्यूची नोंद झाली आहे.

चोवीस तासांत २५४ रुग्ण
चोवीस तासांत २९५३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २५४ नमुने बाधित आढळून आले आहेत. चोवीस तासांत इस्पितळांमधून ४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार ६१२ एवढी झाली आहे.
फोंडा येथे सर्वाधिक ३१६ सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या आहे. मडगाव २३५, राजधानी पणजी २५१, चिंबलमध्ये २२०, कांदोळी येथे १११ रुग्ण, कुठ्ठाळी येथे १४५, कासावली १११ रुग्ण, पर्वरी १३४ रुग्ण, साखळी १४९ रुग्ण, कुडचडे येथे १०१ रुग्ण, वास्को येथे १४४ रूग्ण, खोर्ली येथे १२७, शिरोडा येथे १३४ रुग्ण, सांगे येथे १०९ रुग्ण, धारबांदोडा येथे १०३ रुग्ण, काणकोण येथे ११७ रुग्ण आहेत.

२४ तासांत २८ जण इस्पितळांत
राज्यातील इस्पितळात दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. चोवीस तासांत नव्या २८ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत.

४६८ जण कोरोनामुक्त
कोरोनाबाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधित आणखी ४६८ रुग्ण काल बरे झाले. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५६ हजार ८१९ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८५ टक्के आहे.