लोजपच्या अध्यक्षपदी अखेर पशुपतीकुमार पारस बिनविरोध

0
98

बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष म्हणून पशुपतीकुमार पारस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी बिहारमध्ये दिवंगत रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षात फूट पडून पक्षाच्या ५ खासदारांनी बंडखोरी करत चिराग पासवान यांना पदावरून हटवल्याचे जाहीर केले होते. नंतर चिराग पासवान यांनीच ५ बंडखोर खासदारांना पक्षातून काढल्याचे जाहीर केले. याच दरम्यान, काल पक्षाची उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपतीकुमार पारस यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

लोकजनशक्ती पक्षाचे ६ खासदार असून त्यांचे पक्षीय नेते म्हणून याआधी चिराग पासवान यांचे नाव होते. पण काही दिवसांपूर्वी लोकसभेतील पक्षाच्या गटाने पक्षीय नेते म्हणून पशुपतीकुमार पारस यांचे नाव सादर केले. त्याला लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी मंजुरीही दिली. त्यामुळे नंतर चिराग यांनी पशुपतीकुमार पारस यांच्यासह त्यांना पाठिंबा देणार्‍या सर्व ५ खासदारांना पक्षातून निलंबित केल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी नितीशकुमार यांच्यावरही पक्षात फूट पाडल्याचे आरोप केले. मात्र कालच्या बैठकीत चिराग पासवान यांनी निलंबित म्हणून घोषित केलेले पशुपतीकुमार पारस हेच पक्षाध्यक्ष म्हणून निवडून आले.
पारस यांच्यासमोर इतर कुणीही पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला नव्हता.