चोवीस तासांत ५ बळींसह २२२ बाधित

0
104

राज्यात नवीन कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ७.३३ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन २२२ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आणखी ५ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या २ हजार ६६७ एवढी खाली आली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३०२७ झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात चोवीस तासांत ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोमेकॉमध्ये ३ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

चोवीस तासांत २२२ रुग्ण
राज्यात गेल्या काही दिवसांत स्वॅबच्या नमुन्यांच्या तपासणीच्या संख्येत घट झाली आहे. चोवीस तासांत केवळ ३२०६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २२२ नमुने बाधित आढळून आले आहेत. चोवीस तासांत इस्पितळांमधून ४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ६४८ एवढी झाली आहे. फोंडा येथे सर्वाधिक २१० सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १७५ एवढी झाली आहे. राजधानी पणजी परिसरात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १२५ रुग्ण, कांदोळी येथे १३७ रुग्ण, पर्वरी १०१ रुग्ण, साखळी १३५ रुग्ण, कुडचडे येथे १०३ रुग्ण, काणकोण येथे १४१ रुग्ण आहेत. इतर भागांतील सध्याच्या रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी आहे.

२४ तासांत २२ जण इस्पितळांत
राज्यातील इस्पितळात दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. त्यामुळे दोन इस्पितळे कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. चोवीस तासांत नव्या २२ रुग्णांना इस्पितळांत दाखल केले आहे.

२७७ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाबाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधित आणखी २७७ रुग्ण काल बरे झाले. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५९ हजार ९५४ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५६ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २०० रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.