तिसर्‍या लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य सरकारकडे कृती आराखडा नाही : कामत

0
96

या घडीला जर राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर तिचा सामना करण्यासाठी गोवा सरकारकडे कसलाच कृती आराखडा तयार नसल्याचा आरोप काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला. गोवा सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरानाच्या दुसर्‍या लाटेने आतापर्यंत राज्यात ३०२२ जणांचे प्राण गेल्याचे कामत यांनी म्हटले आहे.

एकेकाळी देशात लावलेल्या आणीबाणीचा विषय उगाळण्याचा प्रयत्न करून लोकांची दिशाभूल करण्याचा भाजप प्रयत्न करीत असून याच भाजपने देशात अघोषित आणीबाणी लावली असल्याचा आरोपही कामत यांनी केला आहे.

प्रमोद सावंत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य आता दिवाळखोरीकडे गेले आहे. सरकारकडे खाण व्यवसाय सुरू करण्याची कोणतीच ठोस अशी योजना नसून दिशाहिन सरकारने पर्यटन व्यवसायाचीही वाट लावल्याचा आरोप कामत यांनी यावेळी केला. कोविड महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब लोकांसाठी पॅकेज देण्यास सरकारला पूर्ण अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

असंवेदनशील भाजप सरकारने दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करून भय निर्माण केले आहे. किनारी व्यवस्थापन आराखडा जनसुनावणीत सहभागी होणार्‍या लोकांना भीती घालण्यासाठी हा कायदा लागू करण्याचे कृत्य सरकारने केले असल्याचे कामत यांनी म्हटले आहे.
लोकांनी बेजबाबदार भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आता पुढे येणे गरजेचे असून गोव्याची अस्मिता, पर्यावरण व वन्यजीव यांचे रक्षण करण्यासाठी लढा देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.