बारावीच्या निकालासाठी मंडळाचा मसुदा तयार

0
115

>> मागील तीन वर्षांतील कामगिरी पाहून निकाल

>> माहितीसाठी आज वेबिनारचे आयोजन

गोवा राज्य शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठी मसुदा जाहीर केला आहे. बारावीचा निकाल तयार करण्यासाठी ३०ः३०ः४० टक्के असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांतील शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेऊन बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी काल दिली.

बारावीचा निकाल तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बारावी इयत्तेतील कामगिरीसाठी ४० टक्के, अकरावी आणि दहावीच्या कामगिरीसाठी प्रत्येकी ३० टक्के गुण निश्‍चित केले आहेत. यासंबंधीचे परिपत्रक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी काल जारी केले आहे.

आज वेबिनारचे आयोजन
राज्यातील सर्व विद्यालय प्रमुख आणि समितीच्या सदस्यांनी निकाल तयार करण्याचे मसुद्याचे सविस्तर वाचन करावे. या निकाल तयार करण्याच्या मसुद्याची माहिती देण्यासाठी शाळा प्रमुखांसाठी खास वेबिनार घेतला जाणार आहे. २६ जून रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत उत्तर गोव्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी वेबिनार घेण्यात येणार आहे. याच दिवशी दुपारी १२ ते दुपारी १ वाजेपर्यंत दक्षिण गोव्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी वेबिनार घेण्यात येणार आहे. प्राचार्य मंचाच्या सदस्यांनासुद्धा वेबिनारमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. बारावीचा निकाल तयार करताना दहावीतील जास्त गुण असलेले तीन विषय विचारात घेतले जाणार आहेत. अकरावी आणि बारावीचा निकाल उच्च माध्यमिक विद्यालयाकडून तयार केलेला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून या परीक्षेचा निकाल तयार करताना कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी योग्य दक्षता घेतली जात आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.

निकाल समितीची स्थापना
प्रत्येक उच्च माध्यमिक विद्यालयाने निकाल समितीची स्थापना केली पाहिजे. या समितीमध्ये प्राचार्य आणि चार ज्येष्ठ प्राध्यापकांचा समावेश असला पाहिजे. तसेच, शेजारी उच्च माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाचा समितीमध्ये समावेश केला पाहिजे. विद्यालय समितीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे २०० रुपये मानधन दिले जाणार आहे.