चैत्राविष्कार

0
286
  • मीना समुद्र

निसर्गाकडून प्रेरणा घेऊन सदैव त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणारा, जाणीव ठेवणारा ‘चैत्रांगण’ हा चैत्राविष्कार मनाला संतुष्ट करणारा, परिपुष्ट करणारा, नृत्य-नाट्य-संगीतादी माणसाच्या कला जाणिवा उन्नत करणारा आहे खास! चैतन्याचा हा कलाविष्कार!

हां हां म्हणता चैत्र महिना निम्माशिम्मा उलटून गेलाही. आपल्या सार्‍या वृत्ती-प्रवृत्तींना चेतवणारा, चित्ताला चैतन्य देणारा हा महिना. सृष्टीचे राजस रूप पाहावे ते याच महिन्यात आणि तिचे सालस रूप घ्यावे तेही याच चैत्र मासात.

नवपालवीने सजलेली, नाना रूप-रस-रंग-गंधांनी नटलेली ही सृष्टी; पुष्पफलांकित झाल्याने रसरसलेली ही सृष्टी; सृजनाची लगबग सजग करणारी ही सृष्टी; आपल्याच नादलयीत तन्मय होऊन झुलणारी ही सृष्टी… सृष्टीची ही अनोखी रूपं रेखाटत वसंतागम होतो. याच ऋतूत अशा सृष्टीशी मन एकतान, एकरूप न झाले तरच नवल! सर्वत्र झालेला प्रफुल्लतेचा फुलोरा; लालुस पोपटी पालवीतून होणारा नवतेचा प्रसन्न शिडकावा; रंग-गंधाने आकृष्ट होऊन जीवमात्रांत सृजनाच्या इच्छेला फुटणारा धुमारा आणि सतत सृष्टीचं सौंदर्य दाखवणारा आगळा चैत्राविष्कार. तापत्या अग्निदाहातही कोमलता फुलवणारा आणि सृष्टीला जीवनरस पुरवणारा, वृक्षवेलींवर वसंतवैभव डोलविणारा आणि झुळूझुळू वाहणार्‍या वार्‍यावर रामविजयाची सुगंधवार्ता वाहून आणणारा, ठायीठायी सृजनाची चाहूल देणारा आणि त्या नादलयीवर झुलणारा, झुलवणारा हा चैत्राचा मनभावन चैतन्याविष्कार!
वसंत वनात जनात हासे| सृष्टीदेवी जणू नाचे उल्हासे
गातात सृष्टीचे सौंदर्य भाट| चैत्रवैशाखाचा ऐसा हा थाट

  • असंच या चैत्राच्या हास्याचं आणि लास्याचं वर्णन कवीनं केलं आहे ना!
    ऋतुराज वसंताचे शुभागमनी पाऊल पडते ते चैत्राच्या सुरुवातीला. आंब्याचा मोहर, कोकिळेची मधुर तान, वार्‍याचं वादन, मदनाचे बाण, अचेतनाच्या बासरीत फुंकले जाणारे चैतन्याचे प्राण. वसंत होऊन जातो मधुमास. लंकाविजयाची गोड सुवार्ता कानी सांगत येणारा हा मधुमास. त्याच्या स्वागतासाठी घराघरांच्या अंगणातून सडे शिंपून, रांगोळ्या घालून दारादारांत आनंदाच्या गुढ्या उभ्या झाल्या. रेशमी भरजरी वस्त्रे, माळा, सूर्यनारायणाचे कोवळे किरण स्वतःत साठवून ती ऊर्जा वितरित करणारे तांब्याचे कलश, आरोग्यमंत्र देणार्‍या अमृतवृक्षाचा कडुलिंबाचा डहाळ… सारेच किती आनंददायी. आणि गुढीच्या जागी काढलेले चैत्रांगण म्हणजे तर स्त्रियांचा, गृहिणींचा कलाविष्कार, चैत्रमासानिमित्त घडणारा लोककलेचा विस्तार.

फाल्गुनाच्या शेवटी चापूनचोपून केलेल्या अंगणात गेरू (काव) किंवा शेणाचे सारवण करून पांढर्‍याशुभ्र रांगोळीने हे चैत्रांगण काढले जाते. निसर्गातल्या सृजनोत्सवाचं प्रतीकरूप अशी चिन्हं अत्यंत जिव्हाळ्याने येथे रेखाटली जातात. कधी ठिपके तर कधी रेघा, तर कधी मुक्त रीतीने ही रांगोळी सुबकपणे रेखाटतात. या रांगोळीचे वैशिष्ट्य काय? तर भारतीय संस्कृतीत सर्वमान्य झालेली शुभचिन्हे यात असतात. त्यांची संख्या कधी ५६ तर कधी ६४ अशी असते. कालानुरूप कमी-जास्त चिन्हांचा समावेश यात होतो. आंब्याच्या तोरणाखाली ‘श्रीराम प्रसन्न’ लिहिण्याचे कारण म्हणजे रामनवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. कधी इष्टदेवता किंवा कुलदेवतेचे नावही लिहिलेले आढळते. ॐ, श्री, श्रीगणेश, स्वस्तिक, कलश; देव्हारा- त्यात शिव-पार्वती, लक्ष्मी-नारायण किंवा सखी पार्वती स्वरूप दोन बाहुल्या काढतात. गौरीचे दोहन म्हणजे दोहाळे पुरवण्यासाठी फळे, फुलांचा साजशृंगार, हळदकुंकवाचे करंडे, आरसा, फणी, झुलण्यासाठी झुला, दाह शमविण्यासाठी पंखा, पाण्याचा कलश हे सर्व असते. गायीची, लक्ष्मीची पवित्र पावले रेखाटली जातात. सूर्य, चंद्र, चांदण्या, बासरी, मोरपीस, कमळ, आंबा, केळी अशी फळे; तुळशीवृंदावन, दिवा, झाडे, फुले, पाने, पक्षी, त्रिशूळ, धनुष्यबाण, डमरू, सनई, चौघडा, नागयुगुल, हत्ती, घोडा, गाय-वासरू, मासा, कासव, शंख, चक्र, गदा, पद्म, बेलपान, तुळस, दुर्वा ही सारी प्रतीकं आहेत समृद्धीची, संपन्नतेची, सुरक्षिततेची, पावित्र्याची, शुभाची, सौंदर्याची, गतीची, चैतन्याची, सकारात्मक उर्जेची, भूमातेला कलात्मकतेने सजविण्याची आणि आनंद, उल्हासातही संयम, नीतिमूल्ये शिकवणारी.
भारतीय मन निसर्गपूजक आहे. निसर्गभजक आहे. निसर्गाकडून प्रेरणा घेऊन सदैव त्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणारा, जाणीव ठेवणारा ‘चैत्रांगण’ हा चैत्राविष्कार मनाला संतुष्ट करणारा, परिपुष्ट करणारा, नृत्य-नाट्य-संगीतादी माणसाच्या कला जाणिवा उन्नत करणारा आहे खास! चैतन्याचा हा कलाविष्कार!

चैत्रातल्या फुलांच्या सौंदर्यउधळणीत दोन रंग प्रामुख्याने आढळतात. लाल आणि पिवळा. यातल्या अनेक छटा संपन्नतेने मिरवत असल्या तरी हे दोन रंग नजरेत भरतात. सृष्टीत जास्वंद, गुलमोहर, सावरी, पांगारा, पलण, बाहवा, बाभुळ असे हळदीकुंकवाचे करंडे भरलेले असतात. स्त्रियांनाही असे हळदीकुंकू स्वतःच्या घरात साजरे करावेसे वाटल्यास नवल नाही. शिवाय वसंत हा उदारात्मा आहे. त्यामुळे औदार्याचा आविष्कारही या चैत्रात घडतो. चराचराचे जीवन सुखी करणे हे निसर्गाचे ब्रीद चैत्र फार निष्ठेने पाळतो. स्त्रियांच्या दयाळू अंतःकरणातही ही उदारता झिरपते जणू आणि उन्हाच्या तलखीने ग्रस्त झालेल्या आयाबहिणींना, मैत्रिणींना बोलवून, त्यांचे पाय धुवून, त्यांच्यावर गुलाबपाणी शिंपडून गुलाब, केवडा, मोगरा असे कोणते तरी सुखदसुगंधी अत्तर लावून, हळदकुंकू लावून त्यांचे आगतस्वागत करतात. गौरीचे डोहाळे पुरविण्यासाठी तिला हिंदोळ्यावर झुलविले जाते. तिच्याभोवती सृष्टीतल्या पानाफुलांची आरास केली जाते. निरनिराळे प्राणी, पक्षी, मूर्ती, बाहुल्या ठेवल्या जातात. फळे, पदार्थ ठेवले जातात. थंडगार पन्हे आणि केळीच्या किंवा वडाच्या पानावर आंब्याची डाळ ठेवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. आंब्याची डाळ म्हणजे हरभर्‍याची भिजवलेली डाळ भरड कुटून किंवा वाटून त्यात कैरीचा कीस, मीठ, किंचित साखर, ओल्या खोबर्‍याचा चव, कोशिंबीर यांचे मिश्रण करून त्यावर जिरे-मोहरी, हिंग, कढीलिंबाच्या पानांची, ओल्या-सुक्या मिरचीची खमंग फोडणी देऊन केलेला पदार्थ. कैरीचे पन्हे (उकडलेल्या कैरीच्या गरात पाणी, गूळ/साखर, वेलची-जायफळ पूड घालून केलेले शीतल पेय) दिले जाते. भिजवलेल्या हरभर्‍यांनी ओटी भरली जाते. या कृतीने ग्रीष्मातला मनाला मिळणारा गारवा म्हणजे सुखद चैत्राविष्कार.

सुंदर जरीकाठी ठेवणीतली वस्त्रे आणि अलंकार घालून खूप छान, आनंदी वृत्तीने मुलीबाळींसकट हौसेने केले जाणारे हळदीकुंकू म्हणजे समानतेचा, एकोप्याचा मंत्रजागर आणि घरातील पुरुष-स्त्रियांच्या सहभागाने, सहकाराने केलेला सांस्कृतिक कलाविष्कारच होय. लहानपणचे गुलमोहर, बहावा अशा झाडाफुलांनी सजावट आणि प्रत्येक घरातल्या सजावटीचे वेगळेपण आजही आठवते. भरजरी साड्यांनी गौर उभी करण्याच्या जागेची सजावट केल्याने नजाकत आणखी वाढत असे. रोजच्या विजेच्या बल्बच्या जागी वडील जास्त प्रकाशाचा बल्ब लावून देत. रात्री त्यांच्या मित्रांनाही मेजवानी असे. दिवसभरच्या श्रमाने दमलेल्या आईच्या चेहर्‍यावर या समारंभाने तृप्त, शांत भाव विलसत असे. ही चैत्रागौर चैत्र शुद्ध तृतीयेपासून ते वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत म्हणजे अक्षयतृतीयेपर्यंत अशी घरोघरी महिनाभर चालत असे.
चैत्र शुद्ध नवमीला श्रीरामजन्म सोहळा आणि चैत्रपौर्णिमेला साजरी होणारी श्रीहनुमान जयंती हे माणसाचे मन सुसंस्कृत, सुशील, सुशांत, सुरक्षित आणि विनम्र सेवाभावाचे संस्कार करणारे चैत्राविष्कार आहेत. चैत्रपालवी, फुलांचा बहर, मोहर, वार्‍याची शीतल सुगंधी लहर, सृष्टीत भरलेले संगीत, ओठावर येणारे गीत, यामुळे माणसाचे मनच मंतरलेले चैत्रवन झाल्यास नवल ते काय?