प्रादेशिक अस्मितेला कौल

0
150

भारतीय जनता पक्षाचे बंगाल काबीज करण्याचे स्वप्न पार उद्ध्वस्त करीत ममता बॅनर्जी यांनी त्या राज्यात झोकात केलेले पुनरागमन हा कालच्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा कळसाध्याय आहे. भाजपाने ह्या निवडणुकीत बंगाल त्यांच्या हातून हिरावून घेण्यासाठी अक्षरशः आकाश-पाताळ एक केले होते. पंतप्रधान, गृहमंत्र्यांपासून बड्या बड्या नेत्यांच्या लाखोंच्या गर्दीतील प्रचारसभा, देशभरातील कसलेल्या कार्यकर्त्यांची बंगालमध्ये उतरवण्यात आलेली फौज, खुद्द तृणमूल कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली फोडाफोडी, सीबीआयपासून ईडीपर्यंतच्या केंद्रीय यंत्रणांचा ममता आणि अभिषेक बॅनर्जींविरुद्ध झालेला मुक्त वापर, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधून यावेळी मोदी बंगाल जिंकणार असल्याची निर्माण करण्यात आलेली मोठी हवा, ह्या सगळ्या प्रयत्नांना अक्षरशः धुळीला मिळवत बंगालच्या जनतेने ममतांच्या पाठीशी राहून भाजपच्या आक्रमक आणि सूडाच्या राजकारणाला जोरदार थप्पड लगावली आहे.
चवताळलेली जखमी वाघीण जसा निकराने प्रतिकार करते, तशाच प्रकारे ऐन निवडणुकीत जखमी झालेल्या ममता बॅनर्जींनी एकटीने, परंतु अत्यंत निकराने भाजपाची येऊ घातलेली लाट फार मोठी आघाडी घेत थोपवलीच नव्हे, तर परतवून लावली आहे. भाजपच्या जागा गेल्या वेळच्या तीनवरून दोन अंकी जरूर झालेल्या आहेत, परंतु ‘अबकी बार दोसौ पार’ चा जो काही फार मोठ्या यशाचा ढोल पिटला जात होता, तो किती पोकळ होता हे निकाल सिद्ध करीत आहेत. जखमी ममतांविरुद्धच्या जहरी प्रचारामुळे त्यांच्याप्रती बंगालच्या जनतेमध्ये निर्माण झालेली सहानुभूती, भाजपसारख्या बाहेरच्या पक्षाविरुद्ध बंगाली अस्मितेची जागी झालेली भावना, भाजपने जाणूनबुजून निर्माण केलेल्या हिंदुत्वाच्या वातावरणाविरुद्ध मुस्लीम व सेक्युलर मतांचे ममतांच्या सोबत झालेले ध्रुवीकरण, निवडणुकीच्या शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये ठळक झालेले कोरोना हाताळणीतील मोदी सरकारचे ढळढळीत अपयश ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून भाजपला बंगालने नाकारले आहे. गेली दहा वर्षे सत्तेत असल्याने निर्माण झालेली अँटी इन्कम्बन्सीही ममतांना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखू शकलेली नाही हे खरोखरच त्यांचे मोठे यश आहे. भाजपने ऐन निवडणुकीपूर्वी हिरावून विरोधात उभ्या केलेल्या सुवेंदु अधिकारी यांच्याकडून व्यक्तिश: ममता पराभूत झाल्या असल्या तरी पक्षाच्या महाविजयापुढे हा पराभव छोटाच आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या साथीने बंगालला ‘डबल इंजिन’ सरकार देण्याचे आणि ‘शोनार बांगला’ बनवण्याचे भाजपने दिलेले आश्वासन बहुसंख्य जनतेने दुर्लक्षिल्याचे दिसते. डावे आणि कॉंग्रेसने मिळून ‘दीदीमुक्त बंगाल आणि मोदीमुक्त भारत’ च्या दिलेल्या घोषणेला तर जनतेने किंमतच दिलेली नाही.
आसाममध्ये पुन्हा भाजप, केरळमध्ये पुन्हा डावी आघाडी हे निकाल तर समस्त मतदानोत्तर पाहण्यांच्या अंदाजांबरहुकूम लागले आहेत. त्यामध्ये त्या दोन्ही राज्यांच्या सरकारांनी केलेल्या विकासकामांचा वाटा मोठा आहे. बंगालप्रमाणे येथे आसामी अस्मितेचा मुद्दा वरचढ ठरला आहे. केरळमधील विजय हा डाव्या विचारांचा विजय नव्हे. तो खरे तर मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या कार्यक्षमतेचा विजय आहे. केरळचा पूर, कोरोनाची पहिली लाट त्यांनी ज्या समर्थपणे हाताळली, त्याला जनतेने दिलेली ती पोचपावती आहे.
आसाममध्येही केंद्र सरकारच्या साथीने सर्वानंद सोनोवाल सरकारने केलेल्या देदीप्यमान विकासाची पावती जनतेने त्यांना दिली आहे. आसाममध्ये यावेळी राहुल गांधी – प्रियांका गांधींनी जातीने लक्ष दिले होते. चहाच्या मळ्यांतील कामगारांमध्ये मिसळणे काय, त्यांना दुप्पट रोजंदारीचे, पाच लाख नोकर्‍या, महिलांना दरमहा मानधनाचे दिलेले आश्वासन काय, कॉंग्रेसच्या मदतीला त्यातले काहीही येऊ शकले नाही. बद्रुद्दिन अजमलच्या एआययूडीएफशी कायम राखलेली साथ किंवा नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी न करण्याचे आश्वासनही निकामी ठरले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या मर्यादा तर पुन्हा स्पष्ट झाल्या आहेत. दक्षिणेत तामीळनाडूकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. तेथेही मतदानोत्तर पाहण्यांच्या अंदाजानुरूप द्रमुक – कॉंग्रेस आघाडीचे सत्तेत आगमन झाले आहे. करुणानिधींचा उत्तराधिकारी म्हणून स्टालीन यांचे नेतृत्व ह्या निवडणुकीतून दृढमूल होईल. जयललितांच्या पश्चात् भाजपची साथ असूनही अभाअद्रमुकला आपली सत्ता राखता आलेली नाही. बंगाल असो, आसाम असो, तामीळनाडू असो, सर्वत्र प्रादेशिक अस्मिताच वरचढ ठरली आहे. अवघा देश भाजपमय करण्याचे मोदी – शहांचे स्वप्न ह्या निकालांतून आणखी दुरावले आहे!