चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स या दोन खराब फॉर्ममध्ये असलेल्या संघांमध्ये आज सोमवारी सामना होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद व किंग्ज इलेव्हन पंजाब या सहा पराभव स्वीकारलेल्या संघांच्या यादीत चेन्नई व राजस्थान यांचादेखील समावेश होतो. फरक एवढाच की पंजाबने एक सामना कमी खेळला असून त्यांचे दोन गुण देखील कमी आहेत. या सर्व संघांमुळेच ‘प्ले ऑफ’ची स्पर्धा एकतर्फी होत आहे, असे वाटत असून आजच्या विजयासह चेन्नई व राजस्थान यांच्या पैकी एक संघ आपल्या मोहिमेली नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहे. कर्णधार धोनीचे अपयश चेन्नईला भोवत आहे. ११, १०, २१, ०३ अशा धावा धोनीने आपल्या मागील चार सामन्यांत केल्या आहेत. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याचे यष्टिरक्षणही गचाळ झाले होते. चेन्नईची संघ निवडही भुवया उंचावणारी ठरली आहे.
स्पर्धेतील अर्ध्याहून अधिक सामने संपलेले असताना इम्रान ताहीर व मिचेल सेंटनर यांना चेन्नईने ‘बेंच’वरून अजून उठवलेले नाही. दुसरीकडे राजस्थानला आपल्या यापूर्वीच्या लढतीत बंगलोरकडून पराभव पत्करावा लागला होता. एबी डीव्हिलियर्सने उनाडकटला झोडपल्याने राजस्थानवर विजयाच्या स्थितीतून पराभवाची नामुष्की ओढवली होती. परंतु, चेन्नईविरुद्ध विजय मिळवून गाडी पुन्हा रुळावर आणण्याची संधी त्यांच्याकडे आहे. चेन्नईचा संघ देखील आपल्यातील उणिवा दूर करून प्ले ऑफच्या शर्यतीत चुरस निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.