केकेआरचा सुपर विजय; फर्ग्युसन प्रभावी

0
285

न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याच्या भेदक मार्‍याच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. उभय संघांनी १६३ धावा केल्याने निर्धारित षटकांत सामना बरोबरीत सुटला होता. इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या मोसमातील हा ३५वा सामना अबुधाबी येथे झाला.

धावांचा पाठलाग करताना मध्यफळीत अनुभवी फलंदाजाला ठेवण्याच्या उद्देशाने हैदराबादने केन विल्यमसन व जॉनी बॅअरस्टोवसह डावाची सुरुवात करत वॉर्नरला मधल्या फळीत उतरवले. केन व जॉनी यांनी पहिल्या गड्यासाठी ६ षटकांत ५८ धावा चोपत विजयासाठी भक्कम पाया रचला. फर्ग्युसनने विल्यमसनला बाद करत ही जोडी फोडली. तिसर्‍या क्रमांकावरील प्रियम गर्ग (४) याला फारशी चमक दाखवता आली नाही. कोलकाताप्रमाणेच हैदराबाद संघाची धावगती पॉवरप्लेनंतर मंदावली. गडी बाद झाल्याने दबावही वाढला. दहाव्या षटकानंतर ३ बाद ७४ अशा स्थितीत त्यांचा संघ होता. कुलदीप यादवने टाकलेल्या डावातील ११व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कार्तिकने वॉर्नरला यष्टिचीत करण्याची संधी गमावली. मनीष पांडे, विजय शंकर यांनी केवळ संघावर अधिक दबाव वाढविण्याचे काम केले. वॉर्नरने दुसर्‍या टोकाने साथ लाभली ती समद याची. समदने १५ चेंडूंत २३ धावा करत धावगती वाढवण्यास मदत केली. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी १८ धावांची आवश्यकता होती. पूर्ण तंदुरुस्त नसताना रसेलने हे षटक टाकत १७ धावा दिल्याने सामना बरोबरीत सुटला. वॉर्नरने या षटकात तीन चौकार ठोकले. रसेलच्या एका नो बॉल नंतरही हैदराबादला विजयी वेस ओलांडणे शक्य झाले नाही.

तत्पूर्वी, त्रिपाठी व गिल यांनी केकेआरच्या डावाची सुरुवात केली. दुसर्‍याच षटकात राशिदने थंपीच्या गोलंदाजीवर गिल याचा सोपा झेल सोडला. यावेळी गिलने नुकतेच खाते खोलले होते. या संधीचा पुरेपूर लाभ उठवत गिलने त्रिपाठीसह पहिल्या गड्यासाठी ४८ धावांची भागीदारी रचली. ६ षटकांत १ बाद ४८ अशा सुस्थितीनंतर कोलकाताची धावगती धोडीशी मंदावली. पुढील आठ षटकांत त्यांना केवळ ४८ धावा जमवणे शक्य झाले. या कालावधीत गिल व नितीश राणा यांना देखील त्यांनी गमावले. १४व्या षटकाअखेर ३ बाद ९६ अशी दोलायमान स्थिती त्यांची झाली होती. शेवटच्या चार षटकात केकेआरने खर्‍या अर्थाने टी-ट्वेंटीला साजेशी फलंदाजी केली. शेवटच्या चार षटकांत त्यांनी ५२ धावा चोपल्या. दिनेश कार्तिकने १४ चेंडूंत २९ व मॉर्गनने २३ चेंडूंत ३४ धावा करत संघाला ५ बाद १६३ पर्यंत पोहोचविले.

हैदराबादने या सामन्यासाठी आपल्या संघात दोन बदल करताना फलंदाजी मजबूत केली. अब्दुल समदला स्थान देत त्यांनी शहाबाज नदीमला बाहेर बसवले तसेच खलिल अहमदला वगळून बासिल थंपीला यंदाच्या मोसमात प्रथमच संधी दिली. कोलकाताने ख्रिस ग्रीन व प्रसिद्ध कृष्णा यांना बाहेरचा रस्ता दाखवत लॉकी फर्ग्युसन व कुलदीप यादव यांना संघात सामावून घेतले.

धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ः शुभमन गिल झे. गर्ग गो. राशिद ३६, राहुल त्रिपाठी त्रि. गो. नटराजन २३, नितीश राणा झे. गर्ग गो. शंकर २९, आंद्रे रसेल झे. शंकर गो. नटराजन ९, ऑईन मॉर्गन झे. पांडे गो. थंपी ३४, दिनेश कार्तिक नाबाद २९, अवांतर ३, एकूण २० षटकांत ५ बाद १६३
गोलंदाजी ः संदीप शर्मा ४-०-२७-०, बासिल थंपी ४-०-४६-१, थंगरसू नटराजन ४-०-४०-२, विजय शंकर ४-०-२०-१, राशिद खान ४-०-२८-१
सनरायझर्स हैदराबाद ः जॉनी बॅअरस्टोव झे. रसेल गो. वरुण ३६, केन विल्यमसन झे. राणा गो. फर्ग्युसन २९, प्रियम गर्ग त्रि. गो. फर्ग्युसन ४, डेव्हिड वॉर्नर नाबाद ४७, मनीष पांडे त्रि. गो. फर्ग्युसन ६, विजय शंकर झे. गिल गो. कमिन्स ७, अब्दुल समद झे. गिल गो. मावी २३, राशिद खान नाबाद १, अवांतर १०, एकूण २० षटकांत ६ बाद १६३
गोलंदाजी ः पॅट कमिन्स ४-०-२८-१, शिवम मावी ३-०-३४-१, वरुण चक्रवर्ती ४-०-३२-१, आंद्रे रसेल २-०-२९-०, लॉकी फर्ग्युसन ४-०-१५-३, कुलदीप यादव ३-०-१८-०

एकतर्फी सुपर ओव्हर, हैदराबादची शरणागती

सुपर ओव्हरमध्ये थरार अपेक्षित होता. परंतु, लॉकी फर्ग्युसन याने हैदराबादला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. फर्ग्युसन याने पहिल्याच चेंडूवर हैदराबदचा कर्णधार वॉर्नरच याचा त्रिफळा उडवला. दुसर्‍या चेंडूवर अब्दुल समद याने दोन धावा घेतल्या. फर्ग्युसनने तिसर्‍या चेंडूवर समदच्या यष्ट्या वाकवत हैदराबादला २ बाद २ असे रोखले. केकेआरने यानंतर विजयासाठी घाई केली नाही. पहिल्या तीन चेंडूंनंतर केवळ बिनबाद १ अशी स्थिती झाल्यानंतर चौथ्या चेंडूवर दोन लेग बाईजच्या मदतीने कोलकाताने विजय साकार केला.