चीनचे गुजरातशी तीन करार

0
95
अहमदाबादेत चिनी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी पेंग लियुआन यांना कडे भेट देताना एक लोककलाकार. बाजूला राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी.

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा दौरा सुरू; साबरमती आश्रमास भेट
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग काल अहमदाबादेत दाखल झाले. आपला तीन दिवसांचा भारत दौरा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातपासून सुरू केला. दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी काल चीनने भारताबरोबर गुजरातविशिष्ठ असे तीन करार केले.
गुजरातला भेट देणारे शी हे पहिलेच चीनी नेते आहेत. त्यांचे काल लाल गालीचा अंथरून भव्य स्वागत करण्यात आले.
दरम्यान, दोन्ही देशांतील तीन करारांमध्ये ग्वांगझू आणि अहमदाबाद शहरात परस्परविकासाचा करार, गुजरातमध्ये औद्योगिक वसाहत उभारण्याचा करार व चीनच्या ग्वांगडॉंग प्रांत व गुजरात राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाण घेवाणीचा करार यांचा समावेश होता.
दरम्यान, इंडस्ट्रीज पार्क उभारण्याचा करार चीन विकास बँक आणि गुजरात सरकारच्या उद्योग विस्तार व्यूरो यांच्यात झाला. याद्वारे गुजरातमध्ये इलेक्ट्रानिक्स आणि इलेक्ट्रीकल वस्तूंचे उद्योग स्थापन होणार आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी पटेल व अन्य मंत्रिमंडळ सहकारी व राज्यातील उद्योगपती उपस्थित होते.
बैठकीनंतर मोदींसोबत चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी साबरमती आश्रमास भेट दिली व मोदींकडून ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. त्यानंतर शी यांच्या स्वागतासाठी मोदींनी साबरमती नदीकाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात गरबा व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतला.