चीनची माघार

0
103


भारत आणि चीन दरम्यानचा पँगॉंग सरोवराच्या परिसरातील सीमावाद तूर्त संपुष्टात आला असून दोन्ही देशांचे सैन्य आपल्या पूर्वीच्या ठाण्यांपर्यंत माघार घेण्यास राजी झाले आहे अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी काल संसदेत दिली. गेले वर्षभर ज्या प्रकारे भारत आणि चीन यांच्यात जवळजवळ रक्तरंजित संघर्ष उफाळलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर ही बातमी नक्कीच समाधानकारक आहे. चीनने सातत्याने सीमेवर भारताची कुरापत काढीत आलेला आहे. कधी दौलतबेग ओल्डी, कधी लडाख, कधी दोकलाम, तर कधी गलवान अशी ठिकाणे वेगळी असली तरी चीनची कुरापतखोरी एकाच धाटणीची राहिली आहे. गलवानमध्ये तर आपल्या निःशस्त्र सैनिकांवर लोखंडी सळ्यांनी हल्ला चढवून वीस जवानांना शहीद केले गेले. दोन्ही देशांदरम्यानचे हे तप्त वातावरण प्रदीर्घ लष्करी व राजनैतिक चर्चांच्या फेर्‍यांनंतर का होईना, थोडेफार निवळणार असेल तर ती चांगलीच बाब आहे.
सध्याच्या समझोत्यानुसार चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी पँगॉंग सरोवराच्या उत्तर किनार्‍यावरील फिंगर ८ ह्या ठिकाणाहून आपल्या पूर्वीच्या ठाण्यापर्यंत परत जाईल, तर भारतीय सैन्यदलेही आपल्या पूर्वीच्या धनसिंग थापा ठाण्यापर्यंत माघारी फिरतील अशी माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. ही पीछेहाट टप्प्याटप्प्याने, परस्पर समन्वयाने आणि खातरजमा करून केली जाईल असेही संरक्षणमंत्री संसदेत म्हणाले आहेत. दोन्ही देशांदरम्यान समझोता झालेला असला तरी तो खुल्या दिलाने झालेला नाही. अजूनही परस्परांप्रती उभय गटांना संशय आहे हेच यातून दिसून येते. विशेषतः चीनचा कावेबाजपणा सर्वज्ञात असल्याने अशा प्रकारच्या माघारीची आश्वासने डोळे झाकून विश्वास ठेवता येण्याजोगी नाहीत हे भारताला आजवरच्या पूर्वानुभवावरून पुरेपूर कळून चुकले आहे. त्यामुळे खरोखरच ही माघार घेतली जाते आहे याची खातरजमा करूनच त्यानुसार भारतीय जवानांना माघारी आणले जाणार आहे.
दरम्यानच्या काळामध्ये पुढील समझोता होईस्तोवर दोन्ही देशांच्या ठाण्यांमघील भागामध्ये कोणत्याही देशाचे सैनिक गस्त घालायला जाणार नाहीत असे कलमही या समझोत्यामध्ये घालण्यात आले आहे. हे महत्त्वाचे आहे, कारण अशा प्रकारच्या गस्तीच्या वेळीच पुन्हा चकमक झडण्याची मोठी शक्यता असते आणि त्याचे परिणाम पुन्हा भयावह होऊ शकतात. यापूर्वीही दोन्ही देशांचे सैनिक अशाच प्रयत्नात परस्परांना भिडले होते आणि त्यातून अत्यंत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. पँगॉंग सरोवराच्या उत्तर टोकावरील ठाण्यांबाबत हा समझोता जसा झाला तसा दक्षिण बाजूस कैलास पर्वतरांगांच्या दिशेनेही अशाच प्रकारे समझोता होऊन तेथील तणावही निवळेल अशी आशा उत्पन्न झाली आहे. पण केवळ पँगॉंग सरोवराच्या परिसरात दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघार घेतली म्हणजे उभय देशांतील दीर्घकाळचा तणाव निवळेल असे नाही. लडाखमध्ये अजूनही चीनची कुरापतखोरी सुरूच आहे, परंतु पँगॉंगमधील समझोता ही नुसती एक सुरूवात आहे आणि चीन आणि भारत यांच्यातील संवादातून दोन्ही देशांदरम्यानच्या नियंत्रण रेषेवरील तणावही हळूहळू निवळेल अशी आशा जागली आहे.
पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर गस्त आणि सैनिकी सज्जता या दोन्ही बाबतींमध्ये काही विवादित विषय आहेत, ज्यांची सोडवणूक गरजेची आहे. दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेचा आदर राखावा, जैसे थे स्थिती परस्पररीत्या बदलू नये आणि सर्व समझोत्यांचे पालन करावे अशी एक त्रिसूत्री काल संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी संसदेत घोषित केली. चीनकडूनही तिचे पालन होणे गरजेचे आहे. यावेळी भारताने चीनच्या कुरापतखोरीला डोळ्याला डोळा भिडवून प्रत्युत्तर दिले. नियंत्र रेषेवर पुन्हा आगळीक झाली तर ती मुकाट सोसली जाणार नाही हा इशारा भारताने या यशस्वी वाटाघाटींअंती चीनला नक्कीच दिलेला आहे.