चिलीला इंग्लंड तिखट

0
94

फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेतील रविवारी झालेल्या ‘एफ’ गटातील सामन्यात इंग्लंडने चिलीला ४-० असे पराजित केले. खेळाच्या प्रत्येक विभागात इंग्लंडने सरस खेळ दाखवून ‘चिली’ झोंबणार नाही याची दक्षता घेतली. जेडन सांचो याच्या वेगवान खेळाला चिलीच्या संघाला चोख प्रत्युत्तर देणे शक्य झाले नाही. दक्षिण अमेरिकेन स्पर्धा विजेत्या चिलीच्या संघाला आपल्या युरोपियन प्रतिस्पर्ध्यासमोर नैसर्गिक खेळ करता आला नाही. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला जेडन सांचो याने चिलीच्या दोन बचावपटूंना गुंगारा देत चेंडू कॅल्लम हडसन ओडोई याच्याकडे पास केला. केवळ गोलरक्षकाला चकविण्याचे सोपे काम करत कॅल्लम याने जेडनने रचलेली चाल सार्थकी लावत संघाला १-० अशा आघाडीवर नेले. यानंतर काही धोकादायक चाली रचूनही इंग्लंडला मध्यंतरापर्यंत एका गोलच्या आघाडीवरच समाधान मानावे लागले. बोरुशिया डॉर्टमंडचा विंगर सांचो याने गोलरक्षकाच्या चुकीचा लाभ उठवत ५१व्या मिनिटाला स्वतःचा पहिला व संघाचा दुसरा गोल केला. चिली संघाचा गोलरक्षक ज्युलियो बोर्केस याने रियान ब्रिवस्टर याचा क्रॉस थेट सांचोकडे सोपविल्यानंतर सांचोने चेंडूवर ताबा राखत गोल झळकावला. सामना वेगवान होत असताना ६०व्या मिनिटाला जॉर्ज मॅकईरनच्या पासवर सांचोने संघाचा तिसरा गोल केला. चिलीचा गोलरक्षक बोर्केससाठी हा सामना विसरण्याजोगा ठरला. बॉक्सबाहेर असलेल्या ब्रिवस्टरला अवैधरित्या पाडल्याप्रकरणी रेफ्रींनी त्याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखविला. गोलरक्षकाला बाहेर हाकलण्यापूर्वीच चिलीने तिन्ही ‘बदली‘ खेळाडूंचे पर्याय वापरल्याने मध्यरक्षक ब्रांको प्रावोस्ते याला गोलरक्षकाची भूमिका बजवावी लागली. इंग्लंडचा बदली खेळाडू अँजेल गोम्सने ८१व्या मिनिटाला संघाचा चौथा गोल करत संघाचा विशाल विजय साकारला. साखळी फेरीत चिलीचा पुढील सामना इराकशी तर इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे.