बलाढ्य फ्रान्सने अंडर १७ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेला झोकात प्रारंभ करताना विश्वचषकातील पदार्पणवीर न्यू कॅलेडोनियावर ७-१ असा दारुण पराभव लादला. पहिल्या सत्रात गोलांचा पाऊस पाडताना फ्रान्सने ६ गोल लगावले.
इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर झालेल्या या सामन्याची सुरुवात धक्कादायक झाली. फ्रान्सच्या खेळाडूचा फटका बाहेर ढकलण्याच्या प्रयत्नात न्यू कॅलेडोनियाच्या बर्नार्ड इवा याच्या स्वयंगोलामुळे पाचव्या मिनिटाला फ्रान्सने १-० अशी आघाडी घेतली. अमीन घौरी याने १९व्या मिनिटाला फ्रान्सचा पहिला मैदानी गोल झळकावत आघाडी २-० अशी फुगवली. या गोलांनंतर न्यू कॅलेडोनियाने पुढील काही मिनिटे मध्यमैदानात चेंडू खेळता ठेवून दबाव झुगारण्याचा प्रयत्न केला. परंतु, क्लाऊडियो गोम्स (तिसावे मिनिट) व अमीन घौरी (३३वे मिनिट) यांनी लागोपाठ गोल लगावून न्यू कॅलेडोनियाच्या बचावफळीतील हवाच काढून टाकली. चार गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतर न्यू कॅलेडोनियाच्या खेळाडूंनी खांदे पाडले. ४०व्या मिनिटाला मॅक्सेन कॅकरेट याने फ्रान्सचा पाचवा गोल लगावून बचावफळीच्या ठिकर्या उडविल्या. मध्यंतर जवळ येत असताना न्यू कॅलेडोनियाच्या कियाम वानेसे याच्या स्वयंगोलाने फ्रान्सचा सहावा गोल फलकावर लावला. दुसर्या सत्रात मात्र न्यू कॅलेडोनियाने जिगरबाज खेळ दाखवला. त्यांचा गोलरक्षक उने केसिने याने कॅकरेट याचा पेनल्टी फटका रोखतानाच अजून काही सुरेख फटके अडविले. सिदरी वादेंजिस याने ९०व्या मिनिटाला न्यू कॅलेडोनियाचे खाते उघडले. फिफाच्या स्पर्धेतील त्यांचा हा पहिला गोल ठरला. फ्रान्सच्या इजिदोर (९०+ १) याने अतिरिक्त वेळेत फ्रान्सचा सहावा गोल करून संघ सहा गोलांच्या फरकाने विजय मिळवेल याची दक्षता घेतली.