Home Featured चतुर्थीपर्यंत पर्वरीतील उड्डाणपूल खुला होणार

चतुर्थीपर्यंत पर्वरीतील उड्डाणपूल खुला होणार

0

साबांखामंत्री दिगंबर कामत यांची माहिती; हॉटमिक्स डांबरीकरणास सुरुवात

पर्वरी येथील सहापदरी उड्डाणपुलाचे काम येत्या गणेश चतुर्थीपर्यंत (सप्टेंबर 2026 मध्यापर्यंत) पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी काल दिली. पर्वरी येथे काल सहापदरी उड्डाणपुलाच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
पर्वरीतील उड्डाणपुलाचे काम नोव्हेंबर-डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल, असे लक्ष ठेवण्यात आले होते; परंतु कंत्राटदाराने कामाला गती दिल्याने येत्या गणेश चतुर्थीपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो, असे मंत्री कामत यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री तथा स्थानिक आमदार रोहन खंवटे यांच्याकडून पर्वरी उड्डाणपुलाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. कंत्राटदार आणि सरकारी अधिकारी पुलाच्या कामाकडे गंभीरपणे लक्ष देत आहेत. उड्डाणपुलाच्या कामाचा दर्जा सुध्दा राखला जात आहे. सुमारे 5.15 किलोमीटर लांबीच्या ह्या उड्डाण पुलावर 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जात आहे, असेही कामत यांनी नमूद केले.

सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते व विविध विकासकामांसाठी 3 हजार कोटींचा वार्षिक योजना आराखडा केंद्रीय महामार्ग खात्याकडे पाठविला आहे, अशी माहिती देखील कामत यांनी दिली.
यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार केदार नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग विभागाचे अधिकारी व इतरांची उपस्थिती होती.