Home Featured डोक्याला चेंडू लागून हॉकीपटू मुलीचा मृत्यू

डोक्याला चेंडू लागून हॉकीपटू मुलीचा मृत्यू

0

मोंत द गिरी येथील एका माध्यमिक शाळेच्या मैदानावरील घटना

बार्देश तालुक्यातील मोंत द गिरी येथील एका माध्यमिक शाळेच्या मैदानावर हॉकीचा सराव करत असताना काल एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सदर मुलीच्या डोक्याच्या मागील बाजूस चेंडू लागल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रुईशा सुधीर खर्सेल (रा. साळगाव-सांगोल्डा) असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

सविस्तर माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी 9.30 वाजता घडली. रुईशा सुधीर खर्सेल ही आपल्या सहकारी खेळाडूंसोबत शाळेच्या मैदानावर हॉकीचा सराव करत होती. सरावादरम्यान अचानक एक चेंडू वेगाने तिच्या डोक्याच्या मागील बाजूस लागला. या जोरदार प्रहारामुळे ती जागीच कोसळली. तिला तातडीने उपचारासाठी म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

रुईशा ही एक उत्तम हॉकीपटू होती. आगामी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून तिचे आपल्या सहकाऱ्यांसोबत शाळेच्या मैदानावर सराव सत्र सुरू होते. काल सरावाचा शेवटचा दिवस होता, मात्र दुर्दैवाने याच दिवशी काळाने तिच्यावर घाला घातला.

रुईशा ही एक अत्यंत उत्साही आणि गुणी खेळाडू म्हणून ओळखली जात होती. तिच्या अकाली निधनामुळे सांगोल्डा परिसर आणि क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. साळगाव पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉमध्ये पाठवण्यात आला आहे.