- – मीना समुद्र
घराचे ‘घराणे’ बनते ते त्यातील व्यक्तींच्या कर्तृत्वातून, कर्तव्यनिष्ठतेतून, पराक्रमातून आणि कला-कौशल्यातून. घरातल्या एकमेकांबद्दलच्या प्रेम-जिव्हाळ्याने, ज्येष्ठांच्या आदराने घराच्या भिंती बळकट होतात; नुसत्या सिमेंट वा दगडविटांच्या भिंतींमुळे नव्हे! परस्परांशी सूर जुळवत, रेशिमबंध जपत अतिशय सुसंवादात्मकतेने सहजीवनाचा पाठ गिरवते ते घर खरे घर!
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेमजिव्हाळा, नकोत नुसती नाती
विमल लिमये यांची घराबद्दलची ही कविता आठवण्याचं कारण, एका गृहप्रवेशाला जाण्याचा योग आला होता. घर सुंदरच बांधले होते. रंगही मनभावन होते. सुंदर सजावटीने नटले होते. कलात्मक वस्तूंची मांडणी नजर खेचून घेत होती. फोटोफ्रेमस् आणि पेंटिंग्जनी भिंतींना आगळीच शोभा आली होती. मुख्य म्हणजे ते घर मातीवर बांधले होते आणि भोवतीच्या झाडापेडांनी समृद्ध वाटत होते. अंगण, तुळशीवृंदावन पाहूनच मन प्रसन्न झाले. रांगोळ्या-फुलांची सजावटही त्यात भर घालत होती. सुंदर वस्त्रालंकारांनी आभूषित झालेल्या स्त्री-पुरुषांची, बालगोपाळांची वर्दळ होती आणि सुहास्य मुद्रेने येणार्याचे स्वागत होत होते. नम्रपणाने ज्येष्ठांना वंदन होत होते. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेत असताना अतिथींना, पाहुण्याराउळ्यांना, परिचितांना आग्रह होत होता. वडीलमंडळींच्या आशीर्वादाने आणि पुण्याईने जीवनभराचे स्वप्न साकार झाल्याची कृतज्ञ भावना व्यक्त होत होती. झुल्यावर झुलताना दंगामस्ती करणार्या बच्चेकंपनीला प्रेमळ, कौतुकयुक्त शब्दांत दटावणी आणि समजावणीही मिळत होती. सगळीकडे आनंद, उल्हास आणि प्रसन्नता भरून राहिली होती. असाच आनंद, शांती, समाधान आणि समृद्धी सदैव या घरात नांदो अशी शुभेच्छा देऊन संतृप्त मनाने आम्ही घरी परतलो. स्वच्छ, सुंदर परिसर लाभलेले ते घर मनात कायमचे घर करून गेले.
खरोखरच ते घर कुणालाही ‘घर’ वाटावे असेच होते. घर म्हणजे काय असते? ते फक्त निवासस्थान नसते; डोके टेकण्याची जागा नसते. घर, घरटे, घरकुल, धाम, गृह, निवासस्थान, आलय अशी अर्थवाचक नामे घरासाठी असली तरी कधी ती त्याचे आकारमान, तर कधी हेतू व्यक्त करतात. घरकुल म्हटलं की छोट्याशा सुटसुटीत घराचा बोध होतो. घरटे सर्वसाधारणपणे पक्षी बांधतात आणि त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये त्यातून व्यक्त होतात. आलय हे औषधे, पुस्तके, अनाथांसाठी, विद्या शिकण्यासाठी बांधलेले घरच. सर्वसाधारणपणे आपण ‘घर’ म्हणतो ते सर्व माणसांना राहण्याचे ठिकाण असते. तिथे एकत्र किंवा विभक्त कुटुंबे नांदत असतात. घराचे घरपण जाणवते ते तिथे राहणार्या माणसांच्या स्वभावातून, त्यांच्या वर्तनातून, त्यांच्या नात्यांमधून आणि परस्पर संबंधांमधून. एखाद्या घराचे ‘घराणे’ बनते ते त्यातील व्यक्तींच्या कर्तृत्वातून, कर्तव्यनिष्ठतेतून, पराक्रमातून आणि कला-कौशल्यातून.
घरातल्या एकमेकांबद्दलच्या प्रेम-जिव्हाळ्याने, ज्येष्ठांच्या आदराने घराच्या भिंती बळकट होतात; नुसत्या सिमेंट वा दगडविटांच्या भिंतींमुळे नव्हे! परस्परांशी सूर जुळवत, रेशिमबंध जपत अतिशय सुसंवादात्मकतेने सहजीवनाचा पाठ गिरवते ते घर खरे घर. ‘मोठे घर पोकळ वासा’ अशी त्याची स्थिती नसते. कारण एकमेकांच्या ठाम विश्वासाच्या पायावर ते बळकटपणे उभे असते आणि त्याला सावरणारे छायाछत्र आणि वासेही प्रेमविश्वासाचेच असतात. अशा घरातून, अशा घरट्यातून आकांक्षांचे पंख लेवून पिल्लू आकाशभरारी घेते तरी त्या उंबरठ्यावर त्याची भक्ती असते. खेड्यामधले गावाकडचे घर भलेही कौलारू असो, त्याच्याकडे परतायची ओढ त्याच्या मनी सदैव वसत असते. कुठेही गेलं तरी घरी परत आल्यावर त्याच्या जिवाला हुश्श होतं. घर हे असं ‘विश्रामधाम’ असतं. कष्टकर्याची भलेही झोपडी असो; खोपटी असो- ती त्याला प्यारी असते. कारण त्याची वाट पाहणारे डोळे असतात, कौतुकभरला मायेचा पाठीवर फिरणारा हात असतो, गुणांची चाड असते. घरट्यातसुद्धा ऊब, काळजी, माया, प्रेम, जबाबदारीची जाणीव असते. कवी अनिल ‘घराकडे जाता’ या कवितेत अशाच भावना व्यक्त करताना दिसतात. दिवसाचे सारे श्रम संपवून थकूनभागून घराकडे जाताना दुरून पाहूनच चित्त खुलते. इंदिरा संतांना ‘मावळतीला दार घराचे शिणल्या जीवा कधी विसावा| उभे राहुनी देहलीवरी, नक्षत्रांना निरोप द्यावा’ यात समाधान वाटते.
एखादं जुनाट पडीक घर असेल तर ते कचराकुंडी होऊन बसतं. माणसांनी नांदतं-गाजतं घर जिवंत वाटतं. चैतन्य भरून राहिलेलं असतं. तिथेच शांती आणि समाधानाचा वास असतो. एरव्ही खोर्याने पैसा ओढण्याइतकी समृद्धी असली, गाड्याघोडे, नोकरचाकर सारे काही असूनही ते अनारोग्य, घुसमट, द्वेष, मत्सर, मोह, त्यापायीची भांडणं अशांनी ग्रस्त असेल तर त्यात फटी तयार होतात. नात्याला सुरुंग लागतो, जीवनमूल्ये पायदळी तुडवली जातात आणि घर दुभंगतं. एवढेच नव्हे तर ते शतशः विदीर्ण होतं, जमीनदोस्त होतं.
घर म्हणजे काय, ते कसे असावे याबद्दल अनेकांनी लिहिले आहे. कवी श्रीनिवास शिंदगी ‘ते केवळ घर’ या आपल्या कवितेत ‘प्रीतीच्या छायेत नांदती जेथे निर्मळ नाती’ असं लिहितात. सुख-दुःखाचे तोरण, हासू-आसूचा खेळ तिथे असणारच. निःस्वार्थपणे प्रपंच करून परमार्थ साधावा, मनोमंदिरी माणुसकीचा देव असावा. त्यांनी गरिबांना, म्हातार्याकोतार्यांना, अंध-अपंगांना, लहान बालकांना मदत करावी. श्रद्धा ठेवून भक्तिभाव जागवावा. गृहलक्ष्मीने आणि इतर सर्वांनीही नीतिमूल्ये जपावीत. उणिवा नाहीशा करण्याचा, कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करावा. चूक, अपराधाला क्षमा असावी. सुसंवादाने सारे काही शक्य होते. माया, प्रेम, जिव्हाळ्याने सार्या फटी सांधाव्यात. अज्ञानीपणाने किंवा जाणूनबुजून केलेल्या अपराधाला, चुकीला क्षमा करून समजावणीचे धागे घेऊन वस्त्र रफू करावे. वर्तणूक सुधारण्याची संधी द्यावी. शापालाही देवादिकांनी उःशापाचा उपचार ठेवलेला आहे. पुण्याई ही तेजस्वी सूर्यासारखी असते. घराची पुण्याई टिकविणे प्रत्येकाच्याच हाती असते. स्नेहबंध हे आप्तेष्ट, शेजारीपाजारी आणि इतर व्यक्तींशी दृढ करावेत. घराचे सुख-समाधान, शांतीसाठी हे सौहार्द आवश्यक आहे.
‘असावे घर ते अपुले छान’ ही प्रत्येकाचीच जीवनभराची इच्छा असते. तिला अनेक स्वप्नांचे धुमारे असतात. ‘जगावेगळे असेल सुंदर ते माझे घर, ते माझे घर’ अशी आशा-आकांक्षा आणि मनीषा माणसाच्या मनात तेवत असते. हा शुभ-लाभ घडावा म्हणून माणूस जीवनभर झटत असतो. हे जीवनसाफल्य प्रत्येक कुटुंबाला प्राप्त होवो.