घरगुती, व्यावसायिक वीज दरात वाढ

0
16

>> आठवडाभरात अधिसूचना जारी; वीजमंत्र्यांची माहिती; १० कोटींचे वीज साहित्य खरेदी करणार

राज्यातील घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या वीज दरात वाढ केली जाणार आहे. घरगुती वीज दरात प्रति युनिट ५ ते १० पैसे वाढ केली जाईल, तर व्यावसायिक वापराच्या वीज दरात प्रति युनिट १० ते ४० पैसे वाढ अपेक्षित आहे. येत्या आठवडाभरात याविषयीची अधिसूचना जारी केली जाणार आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

वीज नियमन आयोगाने राज्यातील वीज दरात वाढ करण्याची सूचना केली आहे. इतर राज्यांत विजेच्या दरात वाढ करण्यात आलेली आहे; मात्र गोव्यात अजूनपर्यंत वीज दरात वाढ करण्यात आलेली नाही. वीज नियमन आयोगाच्या सूचनेचे पालन करणे बंधनकारक असल्याने विजेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी वीज दरवाढीच्या विषयावर चर्चा करण्यात आली असून, वीज दरवाढीबाबत आठवडाभरात अधिसूचना जारी केली जाणार आहे. शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांपेक्षा गोव्यात वीज दर कमी आहेत, असेही मंत्री ढवळीकर यांनी नमूद केले.

राज्यातील व्यावसायिक वापराच्या वीज दरात देखील वाढ केली जाणार आहे. ही वाढ प्रति युनिट दहा ते चाळीस पैसेपर्यंत वाढ होऊ शकते. खुल्या बाजारातून वीज खरेदीला मान्यता मिळाल्याने वीजटंचाईची समस्या दूर झाली आहे. काही भागात वीज उपलब्ध होत नसल्यास वेगळी कारणे असू शकतात, असेही ढवळीकर यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

वीज खात्याकडे साहित्य उपलब्ध नसल्याने दुरुस्तीच्या कामात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वीज खात्याला सुमारे १० कोटी रुपयांचे वीज साहित्य खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वीज साहित्य खरेदीच्या ३० प्रस्तावांना एका आठवड्यात मान्यता देण्यात आली आहे. अवकाळी पावसादरम्यान झाडांच्या पडझडीमुळे वीज खात्याचे मोठे नुकसान होत आहे. वीज तारा, विजेचे खांब व इतर उपकरणांची हानी होत आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.

२४ तास पाणीपुरवठा अशक्य ः नीलेश काब्राल
राज्यात सद्यःस्थितीत नागरिकांना २४ तास पाण्याचा पुरवठा करणे शक्य नाही. नागरिकांना दिवसा ४ ते ५ तास पाण्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून नागरिकांना पाणी साठवून ठेवण्यासाठी पाण्याच्या टाक्या देण्याची योजना आखण्याचा प्रयत्न करणार आहे, असे काब्राल यांनी सांगितले.