Home Featured गौतम खट्टरच्या भावाला हरिद्वारमध्ये अटक

गौतम खट्टरच्या भावाला हरिद्वारमध्ये अटक

0

गोवा पोलिसांची कारवाई; आक्षेपार्ह भाषण बनवून दिले; व्हिडिओ बनवला आणि प्रसारित केल्याचा माधववर आरोप; गौतमविरुद्ध लुकआऊट नोटीस

सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरणामध्ये गोवा पोलिसांनी गौतम खट्टर याचा भाऊ माधव खट्टर याला हरिद्वार-उत्तराखंड येथे काल अटक केली. गौतम याच्या भाषणाचा व्हिडिओ माधव यानेच रेकॉर्ड आणि नंतर प्रसारित केला होता. तसेच भाषणही त्यानेच तयार करून दिले होते. दुसऱ्या बाजूला गौतम खट्टर याचा कसून शोध घेतला जात आहे; मात्र अद्याप तो पोलिसांना सापडू शकलेला नाही. दरम्यान, गुन्हा शाखेने मुख्य संशयित आरोपी गौतम खट्टर हा देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस परिपत्रक जारी केले असून, ते इमिग्रेशन ब्युरोला पाठवले आहे.

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरणाच्या तपासाला कालपासून प्रारंभ केला. या प्रकरणामध्ये गौतम खट्टर याच्याबरोबरच त्याचा भाऊ माधव खट्टर याला सहआरोपी केले आहे. गोवा पोलिसांचे एक पथक हरिद्वार येथे गौतम खट्टर याचा शोध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी ह्या पथकाने त्याचा भाऊ माधव खट्टर याला अटक करण्यात यश मिळविले. माधव खट्टर याला गोव्यात आणण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी काल दिली.

आणखी एकाविरोधात तक्रार दाखल
गोवा प्रदेश युवक काँग्रेसने सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी पवन विजय याच्याविरोधात रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण शाखेकडे काल तक्रार दाखल केली.
सेंट फ्रान्सिस झेवियरबाबत वास्को येथील एका कार्यक्रमात गौतम खट्टर याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ माजलेली असताना आता, पवन विजय याने सेंट फ्रान्सिस झेवियरबाबत केलेली वादग्रस्त टिप्पणी उघडकीस आली आहे. गौतमने केलेल्या आक्षेपार्ह विधानाला पवन विजय याने प्रोत्साहन आणि प्रसिद्धी दिल्याचा दावा युवक काँग्रेसने केला आहे.

गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अर्चित नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. यावेळी कुशावती जिल्हाध्यक्ष राजेश वेरेकर, अमित पालेकर, समिल वळवईकर, जनार्दन भंडारी, विकास प्रभुदेसाई, चिराग नाईक आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडविण्याच्या प्रकारांचा निषेध केला जात आहे, असे नाईक म्हणाले.

आयोजकांची चौकशी
वास्को येथे भगवान परशुराम जयंती कार्यक्रमाच्या आयोजकांची गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी रायबंदर येथील कार्यालयात काल चौकशी केली.

गौतमला 51 हजारांचे मानधन
या कार्यक्रमात गौतमच्या उपस्थितीसाठी समन्वय आणि लॉजिस्टिक्सच्या व्यवस्थेकरिता माधवशी बोलणी केली होती. विमान तिकीट, निवास आणि 51 हजार रुपये या अटींवर माधवने गौतमच्या उपस्थितीला संमती दिली होती, असेही आयोजकांनी पोलिसांना सांगितले.

गौतमसोबत आला होता माधव
आयोजकांच्या चौकशीतून असे निष्पन्न झाले की, माधव खट्टर हा वास्को येथील कार्यक्रमासाठी गौतम खट्टर याच्यासोबत आला होता.

रात्रभर पाळत ठेवत माधवला अटक
गोवा पोलिसांच्या पथकाने हरिद्वारमध्ये गौतम खट्टर याच्या घरावर रात्रभर पाळत ठेवल्यानंतर माधव खट्टरला अटक करण्यात यश मिळविले. दुसऱ्या बाजूला गुन्हा अन्वेषण शाखेची पथके मुख्य संशयित आरोपी गौतम खट्टर याचा शोध घेण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये कार्यरत आहेत.

माधवने तयार केले होते भाषण
गौतम खट्टर याचे भाषण त्याचा भाऊ माधव खट्टर याने तयार करून दिले होते. जे गौतमने सादर केले आणि माधवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यासाठी रेकॉर्ड केले, असेही चौकशीत उघड झाले. त्यामुळे या प्रकरणात माधव खट्टर याला सहआरोपी बनवण्यात आले आहे.

गौतमक डून भाषणाचा व्हिडिओ व्हायरल
तसेच, गौतमने सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ त्यानेच रेकॉर्ड करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला होता, असेही चौकशीत स्पष्ट झाले.